३५ वर्षांनंतर कोकणात 'भारतीय धाविक' पक्ष्याचे दर्शन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019   
Total Views |

tiger_1  H x W:

 

अलिबागच्या वरसोली समुद्रकिनाऱ्याजवळ नोंद

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - सामान्यत: गवताळ माळरानांवर अधिवास करणारा 'इंडियन काॅर्सर' (भारतीय धाविक) हा पक्षी पक्षीनिरीक्षकांना अलिबाग किनारपट्टीक्षेत्रात आढळून आला आहे. रायगड जिल्ह्यात या पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. कोकण पट्यामधील मुंबई शहरात १९८४-८६ च्या दरम्यान भारतीय धाविकाचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता ३५ वर्षांनी पक्षीनिरीक्षकांनी या पक्ष्याची पुन्हा नोंद केली आहे.

 
 

थंडीची चाहूल लागल्याने राज्यात देश-विदेशातील स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होत आहे. यामधील काही पक्ष्यांनी स्थानिक स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. सामान्यत: कोकणातील किनारपट्टीनजीक न आढळणाऱ्या 'भारतीय धाविक' पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन अलिबाग येथील पक्षीनिरीक्षक तुषार भागवत यांना घडले आहे. गेल्या आठवड्यात रविवारी भागवत अलिबाग जवळील वरसोली समुद्र किनाऱ्याजवळ पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. यावेळी त्यांना 'पॅसिफिक गोल्डन प्लाॅवर' (सोन चिखल्या) जातीच्या पक्ष्यांचा थवा दिसला. थव्यामध्ये २५ ते ३० च्या संख्येत असणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करताना एका पक्ष्याचे पंख थोडे वेगळे दिसले. त्याचे जवळून निरीक्षण केले असता हा पक्षी 'भारतीय धाविक' असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती भागवत यांनी दिली. डोक्याच्या पाठीमागे असणारा पांढऱ्या रंगाचा पट्टा हे 'भारतीय धाविक' पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. भागवतांनी या भागाचे छायाचित्र टिपल्याने त्याची ओळख पटण्यास मदत झाली.

 

tiger_1  H x W: 
 

'भारतीय धाविक' पक्ष्यांचा अधिवास हा प्रामुख्याने माळरान आणि गवताळ प्रदेशांमध्ये असल्याची माहिती प्रसिद्ध पक्षीअभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली. मात्र, कोकण पट्ट्यामधील मुंबई शहरात १९३० साली अंधेरीतील ग्रिल्बर्ट हिलवर आणि १९८४-८६ च्या दरम्यान चारकोपमध्ये या पक्ष्याच्या थव्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर कोकणातून या पक्ष्याची नोंद न झाल्याचे त्यांनी सांगितले. दिवासागणिक हौशी पक्षीनिरीक्षकांची संख्या वाढत आहे. शिवाय पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने ही मंडळी कानकोपऱ्यात फिरत असल्याने विशिष्ट प्रदेशात न आढळणाऱ्या पक्ष्यांचीही नोंद होत असल्याचे, शिवकर यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत भागवत वरसोली किनाऱ्यावर या पक्ष्याच्या जोडीदाराचा शोध घेणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@