जरी विविधता, परि राष्ट्रीय एकात्मता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


१३० कोटी लोकसंख्येचा 'भारत' हा वैदिक संस्कृतीचे वरदान लाभलेला जगातील सर्वोत्तम देश! वर्तमानयुगीन लोकशाहीचा अंगिकार केलेल्या या राष्ट्राचाच विचार केल्यास इथे विविध भाषा बोलणारे, नाना विचारांचे, मत-पंथांचे नागरिक राहतात.


जनं बिभ्रती बहुधा विवाचसं नानाधर्माणं पृथिवी यथौकसम्।

सहस्त्रं धारा द्रविणस्य मे दुहां ध्रुवेव धेनुरनपस्फुरन्ती॥

(अथर्ववेद-१२/१/४५)

 

अन्वयार्थ

 

(विवाचसम्) विविध प्रकारच्या भाषा बोलणाऱ्या (नानाधर्माणम्) नानाविध विचार, तत्त्वे, कार्यपद्धती व सिद्धांत बाळगणाऱ्या (बहुधा) मोठ्या प्रमाणात निरनिराळे आकार-प्रकार, रंग-रूपे धारण करणाऱ्या (जनम्) लोकांना, जनसमुदायांना (यथा) ज्याप्रमाणे (औकसम्) एखादे घर, कुटुंब धारण करते... म्हणजेच एकाच घरात वरील लहानथोर सदस्य आनंदाने राहतात, त्याप्रमाणे (बिभ्रती) निरनिराळ्या उत्तम गोष्टींना धारण करणारी (पृथिवी) मातृभूमी (राष्ट्र, देश)... (अन् अपस्फुरन्ती) हालचाल न करता, अगदी स्थिरपणे (ध्रुवा) निश्चितच अशा स्थैर्याने उभ्या राहिलेल्या (धेनु इव) एखाद्या गाईप्रमाणे (द्रविणस्य) द्रव्य, धनसंपदा, अन्न, धान्य, फळे, फुले, सोने, चांदी, तांबे, लोखंड, तेल इत्यादींची (सहस्रं धारा) हजारो पटीने धारा (दुहाम्) प्रवाहित करीत राहो.

 

विवेचन

 

वेदांची 'राष्ट्र' ही संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. मानवनिर्मित देशोदेशींच्या सीमारेषांची कुंपणे ओलांडून समग्र मानवांकरिता विस्तारलेली भूमी म्हणजे खऱ्या अर्थाने एक विशाल राष्ट्र होय. पण, मन व बुद्धीची संकुचित वृत्ती वाढली की, स्वार्थाला प्रारंभ होतो. याच क्षुद्र स्वार्थातून मानवाने या भूमातेची वेगवेगळ्या खंड, द्वीप, देश, प्रांत अशा लघु स्वरूपात वाटणी केली. पण, उदारहृदयी सत्पुरुष मात्र समस्त भूमातेलाच आपले कुटुंब मानून 'राष्ट्र' या संकल्पनेचा विस्तार करताना दिसतात-

 

'उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्।'

 

जेव्हा 'स्व' तत्त्वाचा व्यापक स्वरूपात विस्तार होऊन त्याचे सम्रग वैश्विक स्तरावर रूपांतरण होते, तेव्हाच देश-विदेश, उच्च-नीच, जात-पंथ असे दुजाभाव नाहीसे होतात आणि मग संतांच्या भाषेत 'हे विश्वचि माझे घर' हा सद्विचार रूजावयास मदत मिळते. आज वेदांची ही उदात्त राष्ट्रीय भावना मोठ्या प्रमाणात लुप्त होत चालली आहे. मानवी मने अरुंद होत आहेत. असे असले तरी ज्या भौमिक सीमांच्या मर्यादित भूप्रदेशांची 'राष्ट्र' किंवा 'देश' म्हणून गणना केली जाते, अशा विद्यमान सर्व देशाकरिता प्रस्तुत मंत्र किमान मौलिक विचार देणारा व दिशादर्शक ठरणारा आहे. अथर्ववेदाचे बारावे कांड 'भूमिसूक्त' म्हणून ओळखले जाते. यातील एकूण ६२ मंत्र 'पृथ्वी'ला सुजलाम्-सुफलाम् बनविण्यासाठी उपदेश करतात. प्रत्येक देश सर्व दृष्टीने सुविकसित कसा व्हावा? यावर केलेले विवेचन हे सर्वविषयानुग्राही असे आहे. राष्ट्रीय प्रगतीसाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? कोणकोणत्या उत्तम तत्त्वांचे पालन करावे? जेणेकरून राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत मिळेल? या सर्व बाबी या सूक्तात वर्णिल्या आहेत.

 

देश असो की प्रांत! तेथील नागरिकांमध्ये 'भिन्नरुचिर्हि लोक:' यानुसार विविधता असणारच. आचार-विचारांचे वेगळेपण किंवा निरनिराळ्या आवडीनिवडी असल्या तरी राष्ट्रासंदर्भात आपला दृष्टिकोन मात्र एक असावा. माणसां-माणसांतील मतभिन्नता ही देशाकरिता मारक ठरता कामा नये. माणूस किंवा एखादा समाज वा समूह म्हटले की, त्यांच्यात वैविध्यताही आढळतेच. विचारांचे प्रवाह भिन्न-भिन्न असणारच. पण, असे निराळेपण असले तरी 'राष्ट्र' या संकल्पनेसाठी सर्वांमध्ये एकता असलीच पाहिजे. जसे की आपले घर... 'यथा औकसम्।' इथे निवडलेले घराचे उदाहरण अतिशय समर्पक ठरते. आपण नेहमीच घर व घरातील सदस्यांची काळजी घेतो. पण, कुटुंबातील सदस्यांमध्ये बऱ्याच बाबतीत मतभिन्नता मात्र असतेच! प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असला तरी जेव्हा घराच्या सर्वंकष उन्नतीचा मुद्दा उपस्थित होतो, जेव्हा आपणास आपला स्वार्थपूर्ण विचार त्यागून सर्वग्राही व सर्वमान्य निर्णयास पाठिंबा द्यावाच लागतो आणि आपणास एकजूट दाखवावी लागते. तद्वतच समग्र पृथ्वीरूप राष्ट्राच्या प्रगतीचे ध्येय समोर ठेऊन सर्वांना आपल्या मतांना वा आग्रहांना तिलांजली द्यावी लागेल, तर वैश्विक स्थैर्य नांदण्यास मदत मिळेल. विविध देश ही पृथ्वीचीच खंडप्राय रूपे. ज्या कारणांमुळे आम्ही पृथ्वीची देशदेशांतरात विभागणी केली. किमान अशा विभाजित राष्ट्रांनी तरी आपले अखंडत्व अबाधित राखण्यासाठी आपल्यातील मतवैभिन्नाचा त्याग करावा. देशात निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक असतात. तसेच नाना प्रकारचे विचारप्रवाह, तत्त्वप्रणाली, सिद्धांतनिष्ठा बाळगणारे समूहदेखील असतात. प्रचलित व्यवस्थेत आपण त्यांना मानवनिर्मित मत-पंथ किंवा संप्रदाय व जाती-वर्ग म्हणू शकतो. या मतभिन्नतेच्या अनिष्ट वृत्ती राष्ट्र कल्याणाकरिता अडसर बनत असतील, तर त्यांचा त्याग करावयास मागेपुढे का म्हणून पाहावे? अन्यथा, जसे एकसमान विचारांअभावी घरांची धूळधाण होते व कुटुंबात उभी फूट पडते, त्याचप्रमाणे त्या-त्या देशाचीदेखील फाटाफूट होऊन ते राष्ट्र नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

 

१३० कोटी लोकसंख्येचा 'भारत' हा वैदिक संस्कृतीचे वरदान लाभलेला जगातील सर्वोत्तम देश! वर्तमानयुगीन लोकशाहीचा अंगिकार केलेल्या या राष्ट्राचाच विचार केल्यास इथे विविध भाषा बोलणारे, नाना विचारांचे, मत-पंथांचे नागरिक राहतात. 'विवाचसा:, नानाधर्माणा:, बहुधा:' अशा मंत्रोक्त विशेषणांनी परिपूर्ण असलेला हा देश. संकीर्णतेच्या मार्गाने चालला आहे. पण, वेदांचा एकात्मतेचा संदेश मात्र इथे स्वीकारला जात नाही. खरे तर ही राष्ट्रमाता या सर्वांचे पालनपोषण करते. सर्वांचे हित साधते... पण अधूनमधून इथे कधी सांप्रदायिक दंगली उसळतात, तर कधी भाषिक व प्रांतिक भांडणे होतात. कधी शासनाच्या विरोधात आंदोलने होतात, तर कधी धार्मिक संघर्ष उफाळून येतो. असे घडण्याचे कारण म्हणजे या सर्वांकडून राष्ट्राच्या पूर्ण हिताबाबत झालेले दुर्लक्ष! आपल्यापेक्षा राष्ट्र व राष्ट्रीय भावना मोठी आहे आणि त्याही पलीकडे समग्र पृथ्वीचे सर्वहित सर्वाधिक मोठे आहे. या विचारांची जोपासना प्रत्येकाकडून व्हावयास हवी, मग ती कोणतीही भाषा बोलणारी असो की कोणत्याही मत-पंथाची(धर्माची)! देशहितापुढे आपला स्वार्थ गौण आहे. तो सर्वांनीच त्यागावयास हवा. राष्ट्राच्या सर्वांगीण उत्थानात आपली मतभिन्नता अडसर ठरत असेल, तर तिला लगेचच दूर सारावयास हवे. हा राष्ट्रसमृद्धीचा शाश्वत विचार प्रत्येकाने अंगिकारल्यास मग ही राष्ट्रमाता आपल्या पुत्रांवर अमृतधारांचा वर्षाव करण्यास तत्पर होईल. 'भूमी' ही रत्नगर्भा आहे. तिच्या उदरात विविध अन्नधान्य, फळे-भाज्या, यासोबतच मौल्यवान खनिज व रत्नसंपदा दडल्या आहेत. जशी गोठ्यात उभी असलेली एखादी दुभती गाय दुग्धामृताच्या धारांनी यजमान गोपालकांस व त्यांच्या कुटुंबांना सुखी करते. राष्ट्रमातेस गायीची दिलेली उपमा अतिशय उपयुक्त आहे. गाय ही निष्पाप, करुणायुक्त व परोपकारी आहे. तशीच भूमीमातादेखील सर्वांवर दया व दातृत्त्वाची सावली देणारी आहे. तिच्या आश्रयाखाली सर्वजण आनंदाने जगतात. तिची पण काळजी घेणे प्रत्येक भूमिपुत्राचे कर्तव्य आहे. अनेक बाबींची विविधता व मतभिन्नता जरी असली तरी या भारतमातेच्या व अन्य राष्ट्राच्या एकात्मतेसाठी हा उदात्त मंत्राशय सर्वांच्या अंगी रुजो, हीच कामना!

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@