रामराज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


f_1  H x W: 0 x

 

आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल, एवढीच चिंता त्यांना नाही तर, ही प्रजा बौद्धिक पातळीवर समाजमन सुसंस्कारित करणारी आहे. स्नान-संध्या इत्यादी क्रियांनी शुचिर्भूत होऊन जागोजागी मठ, पर्णशाळा, ऋषिआश्रम या ठिकाणी वेदशास्त्र, धर्मशास्त्र यावर चर्चा घडवून आणणारी ही प्रजा आहे.

 

म्लेंच्छांच्या अत्याचारी व हिंदू धर्म विध्वंसक कारवायांविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मोठी क्रांती केली, यात शंका नाही. समर्थ रामदास स्वामींच्याही मनात धर्म-संस्कृती रक्षणार्थ हिंदवी राज्य हवे होते. 'धर्मरक्षी' राजाच्या शोधात त्यांनी केलेली बारा वर्षांची पायपीट समर्थ चरित्रकारांनी वर्णन केली आहे. रामदासांना असा 'धर्मरक्षी' राजा शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाल्याने त्यांना आनंद झाला. या हिंदवी स्वराज्यासाठी रामराज्याची पार्श्वभूमी तयार केली पाहिजे म्हणजेच धर्मस्थापना केली पाहिजे, असे रामदासांचे अंगीकृत कार्य होते. दुर्जनांचा संहार करण्यासाठी व भक्तजनांना आधार देण्यासाठी रामकथा सर्व जगभर नेली पाहिजे, असे रामदासांचे त्यांच्या शिष्यांना सांगणे असे. 'रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी।' रामचरित्राला व रामायणातील पात्रांना प्राचीन व आधुनिक सर्व आध्यात्मिक गुरूंनी मोठ्या परमानंदाने सानुकूल प्रतिसाद दिला आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, “राम म्हणजे पुरातन आदरणीय व प्रिय वीर पुरुष आहे. तो सत्याचा आदर्श, नैतिकतेचा आदर्श, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदर्श राजा आहे. हे सर्व रामचरित्रांतून अभ्यासता येते.” आपल्या संस्कृती इतिहासात, त्याच्या अभ्यासात रामकथेचे व रामाच्या आदर्शाचे किती महत्त्व आहे, याची आजच्या पिढीला कल्पना नाही. या संस्कृती ठेव्याला आजच्याच नव्हे, तर भावी काळातही आपल्या उन्नतीसाठी परमोच्च स्थान द्यावे लागेल. सहज मनात विचार आला की, सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा वाद निकालात काढल्यावर भव्य राम मंदिर एवढाच चर्चेचा विषय झाला. रामराज्याच्या आदर्शाबद्दल बोललेले ऐकायला मिळाले नाही. तथापि, रामराज्याच्या आदर्शाची कल्पना समजून घेतली पाहिजे. रामदासांनी आपल्या काव्यसंभारात रामराज्याचे सुरेख वर्णन केले आहे. समर्थांनी लिहिलेल्या 'मानपंचक' या प्रकरणात रामराज्याचे वर्णन येते.

 
 

राज्य या रघुनाथाचे ।

कळीकाळासि नातुडे ।

बहुवृष्टी अनावृष्टी ।

हे कदा न घडे जनी ।

उद्वेग पाहता नाही ।

चिंता मात्र नसे जनीं ।

व्याधी नाही रोग नाही।

लोक आरोग्य नांदती ॥

 

रामराज्यात ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ नाही. याचा अर्थ लोक निसर्गनियमांचे पालन करीत होते. निसर्गाशी पूज्यभावाने जवळीक साधण्याची शिकवण हिंदू संस्कृतीने जगाला दिली आहे. निसर्गाला जडवस्तू न मानता त्यालाही भावभावना आहेत, ही कल्पना त्यामागे होती. आधुनिक शास्त्रज्ञ वनस्पतींना सजीव मानतात. आज निसर्गाशी खेळ चालले आहेत. त्यात मानवी हस्तक्षेप मोठा आहे. भाव मिळत नाही म्हणून कांदे, टोमॅटो, फळे, दुध रस्त्यावर फेकून देण्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. त्यांना पायदळी तुडवलेले पाहिले आहे. जर निसर्गाला भावभावना असतील, असे मानले तर त्याची प्रतिक्रिया उमटून संतुलन बिघडू शकते. मग अतिवृष्टी, अनावृष्टी, वादळे यांना सामोरे जावे लागते. निसर्ग व मानवी जीवन यांचे परस्परांना साहाय्य मिळाले तर दोघेही समाधानी राहतील. भगवद्गीतेत देवांच्या, यज्ञाच्या बाबतीत जो उपदेश आहे, तो निसर्गाच्या बाबतीत योग्य आहे, असे वाटते. भगवद्गीता म्हणते-

 

देवान्भावयतानेन ते

देवा भावयन्तु व:।

परस्परं भावयन्त: श्रेय:

परमवाप्स्यथ ॥ (३.११)

 

अशारीतीने मानवाने व निसर्गाने परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घेतले पाहिजे, ही कल्पना रामराज्यात आहे. या राज्यात प्रजेच्या ठिकाणी खिन्नता, तिटकारा किंवा चिंता नाही. त्यांच्या मनात भय, द्वेष, चिंता, मत्सर नसल्याने रोग-व्याधी यांचा प्रादुर्भाव नाही. लोक आरोग्यसंपन्न आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्र अनेक रोगांचे मूळ द्वेष, चिंता, मत्सर या मानसिकतेत आहे, असे मानते.

 

युद्ध नाहीच अयोध्दा ।

राग ना मछरू नसे।

बंद निर्बंदही नाही ।

दंड दोष कदा नसे॥

 

रामराज्यात कोणाशी वैर नाही, सूडाची भावना नाही. सर्वांशी मैत्रीचे संबंध असल्याने युद्धाचा प्रश्नच नाही, रामराज्याची राजधानी आहे अ-योद्धा! राग, द्वेष, मत्सर नाही. लोक स्वयंशिस्त पाळणारे, सामंजस्याने एकमेकांशी संबंध जपणारे असल्याने त्यांच्यात भांडणे, मारामाऱ्या, हाणामाऱ्या नाहीत. मग अशा प्रजेसाठी बंध, निर्बंध, कायदे, शिक्षा, तुरुंग कशाला हवेत?

 

बोलणे सत्य न्यायाचे।

अन्याय सहसा नसे।

अनेक वर्तती काया ।

येकजीव परस्परे ॥

 

रामराज्यात खोटेपणाला, दांभिकतेला अजिबात स्थान नाही. जे बोलायचे ते न्यायाला धरून असले पाहिजे. अ-न्यायी बोलणे सहसा नसायचे. प्रजा एकोप्याने राहत असल्याने अनेक शरीरे असली तरी साऱ्यांचा जीव एक, अशी भावना होती. रामराज्य हे सत्याचे आणि न्यायाचे साम्राज्य होते, असेच म्हणावे लागेल.

 

दरिद्री धुंडिता नाही ।

मूर्ख हा तो असेचिना ।

परोपकार तो मोठा ।

सर्वत्र लोकसंग्रहो ॥

 

सर्व प्रजेच्या ठिकाणी उद्योगप्रियता समाधान असल्याने दरिद्री शोधूनही सापडणार नाही. तसेच मूर्खाचे अस्तित्व रामराज्यात नाही. लोक विचारी-विवेकी असल्याने मूर्खपणाला त्यात वाव नाही. दासबोधात मूर्खाची लक्षणे सांगताना फक्त स्वत:चा विचार करणारा, मातापित्यांना विसरणारा, विषयलंपट व 'संसारी मानी जो सुख त्याला मूर्ख' असे म्हटले आहे. काही लोक विद्वान व शहाणे असतात, पण विवेकाअभावी 'शहाणे असून मूर्ख' असतात. अशांना समर्थांनी 'पढतमूर्ख' म्हटले आहे. अशा मूर्खांना रामराज्यात जागा नाही. या राज्यात परोपकाराला मोठे स्थान आहे. सर्व प्रजेच्या ठिकाणी परोपकाराची भावना असल्याने सगळीकडे लोकसंग्रहाची भावना आढळते. राजकारणात लोकसंग्रह करण्याला महत्त्वाचे मानले जाते.लोकसंग्रहातून अनेक कामे पार पाडता येतात. रामराज्यात लोकसंग्रह सगळीकडे होता, असे समर्थांनी म्हटले आहे. पण, तो लोकसंग्रह स्वार्थी हेतूने केलेला नाही. त्यात सामाजिक हिताचे भान आहे, सर्वांच्या उद्धाराची तळमळ आहे.

 

मठ मठ्या पर्णशाळा ।

ऋषिआश्रम साजिरे ।

वेदशास्त्रधर्मचर्चा ।

स्नान संध्या तपोनिधी ॥

 

रामराज्यातील प्रजा ही फक्त पोटार्थी नाही. आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल, एवढीच चिंता त्यांना नाही तर, ही प्रजा बौद्धिक पातळीवर समाजमन सुसंस्कारित करणारी आहे. स्नान-संध्या इत्यादी क्रियांनी शुचिर्भूत होऊन जागोजागी मठ, पर्णशाळा, ऋषिआश्रम या ठिकाणी वेदशास्त्र, धर्मशास्त्र यावर चर्चा घडवून आणणारी ही प्रजा आहे. त्या चर्चांमधून जी मौलिक तत्त्वे लोकांना ऐकायला मिळतील, त्याच्या आनंदातून सर्व प्रजा सुखी-समाधानी होणार आहे. आज जे रामराज्याची अपेक्षा करीत आहेत, त्यांना रामदासांनी दाखविलेल्या रामराज्याचा अभ्यास करावा लागेल. रामराज्याचा पुढील भाग नंतरच्या लेखात पाहू.

- सुरेश जाखाडी

 
 
@@AUTHORINFO_V1@@