त्यांचे जगणे मरणे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


sfa_1  H x W: 0

 

अकल्पनीय, घृणास्पद आणि संतापजनक. हैदराबादमध्ये डॉ. युवतीवर अनन्वित अत्याचार करून, सामूहिक बलात्कार करून तिला जाळणारे ते राक्षस. याआधीही त्यांनी ९ जणांवर अत्याचार केले होते, त्यांना जाळले होते? पण, या घटनांची तितकीशी वाच्यता झाली नाही. कारण? कारण या नीचांनी बलात्कार करून जाळून टाकले होते ते गरीब, दुर्बल आणि खऱ्या अर्थाने असहाय्य असणाऱ्या समाज घटकातील व्यक्तींना. यातील काहीजणी देहविक्री करणाऱ्या होत्या तर काही जण तृतीयपंथी होते. दु:खद आणि शब्दातीत भयंकर. मुळात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या महिलांचा वाली कोण? त्या न त्या तशाच. त्यांना काय फरक पडतोय? असाच भाव त्यांच्याबद्दलचा. पण त्याही कुणाच्या तरी लेकी असतील, त्यांनाही आईवडील, कुटुंब असणारच. काहींना नसेलही. पण म्हणून त्यांचे माणूसपण संपत नाही. त्यांच्यावर अत्याचार करण्याचा खुला परवाना कुणालाही आहे का? तीच गोष्ट तृतीयपंथीयांची. यांचा तर जन्म म्हणजे तीळतीळ मरण्यासाठीच झाला असावा. देहविक्री करणाऱ्या महिला काय किंवा तृतीयपंथी काय? हौस म्हणून किंवा चला मजा म्हणून कुणी ते जगणे स्वीकारत नाही. त्यांच्या आयुष्यातले ते भोग, जावे त्यांच्या वंशा तेव्हाच समजतील. हैदराबादचे क्रूर बलात्कारकांड करणाऱ्या नराधमांनी या देहविक्री करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांवर अत्याचार करून त्यांना मारल्यानंतर कुठे खुट्टसुद्धा झाले नाही. कारण हा वर्ग म्हणजे समाजातला नकोसा वर्ग. ते जगले काय? कसेही मेले काय कुणालाही काही देणेघेणे नाही. नेमके हेच नागडे सत्य या चारही नराधमांना माहिती होते. हे फक्त हैदराबादमध्येच घडले असेल का? तर नाही, देशातील प्रत्येक शहरात, देहविक्रय करणाऱ्या महिलेला किंवा तृतीयपंथीय व्यक्तीला जबरदस्तीने पळवनू नेले आणि अनन्वित अत्याचार करून फेकून दिले, अशा घटना सर्रास घडतात. पण, या घटनांची वाच्यता होत नाही. कारण खऱ्या अर्थाने पीडित, शोषित, वंचित असणारा हा वर्ग, इतका पिचला आहे की, त्याला वाटते, आपला जन्म हे अत्याचार सहन करण्यासाठीच झाला आहे. हैदराबादच्या निर्भयाचा क्रूर मृत्यूने या ९ व्यक्तींचा मृत्यू उघडकीस आला, अन्यथा.. ? असे कुणीतरी जळून मारले गेले, हे कळलेसुद्धा नसते. या अशा दुर्दैवी जीवांच्या जगण्या-मरण्याचा विचार कधी होणार?

 

शहाणेंचा अतिशहाणपणा...

 

प्रसिद्धीची हाव माणसाला काहीही करायला लावते. त्यातही लाईट अ‍ॅक्शन कॅमेऱ्याची सवय असली की, मग काय विचारायलाच नको. कधीकाळी ‘मैने प्यार किया’मध्ये काम केलेल्या रेणुका शहाणे यांचीही तीच गत. नाव शहाणे पण म्हणून शहाणपण असेलच असे नसते. कारण तसे असते तर रेणुकाला आपण काय बोलतो, कुणाशी बोलतो हे कळले असते. समजले असते. पण रेणुकासारख्या नट्यांना हे असे समजण्यासाठी बोलायचे नसतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफवेपासून दूर राहा, असे आवाहन केले. कारण सीएए आणि एनआरसीसारख्या देशहितकारी कायद्यालाही काही मोजकेच लोक विरोध करत आहेत. तसेच त्याला पाठिंबा द्यायलाही तितकेच मोजकेच पण ठराविक लोक आहेत. या कायद्यांत नसलेल्या गोष्टीसुद्धा हे विकृत लोक समाजात मांडत आहेत. खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक नसलेल्या मात्र तरीही अल्पसंख्याकांच्या नावावर सगळेच खपवणाऱ्या एका विशिष्ट समाजातील काही लोक यामुळे गोंधळले आहेत. ते दंगे माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला शांततेचे आवाहन केले, तर यात बिघडले कुठे? ते त्यांचे कर्तव्यच आहे. मात्र, यावर रेणुका यांनी म्हणे प्रत्युत्तर केले की, “खरी टुकडे टुकडे गँग तुमची आयटी सेल आहे, ते देशात अफवा पसरवतात, त्यांना सांगा की द्वेष पसरवू नका.” आता रेणुका यांना विचारले की, एक तरी अफवा सप्रमाण सिद्ध कर बाई. तर त्या ते सांगू शकणार नाही. पण, ‘भारत तेरे टुकडे होंगे हजार’, असे म्हणत देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्या टुकडे टुकडे गँगला साळसूदपणे क्लिनचीट देत त्यांनी मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. हे कशासाठी? तर मोदींचे नाव घेतले तर थोडे प्रसिद्धीच्या झोतात येऊ, गेला बाजार हिंदी फिल्मसृष्टीत आपल्याला हिंदूविरोधी म्हणून तरी कुणी काम देईल, जुम्मे टू जुम्मेच्या शोमध्ये आपल्याला काही लोक डोक्यावर घेतील यासाठीच. प्रसिद्धीसाठी इतका द्राविडी प्राणायाम करणाऱ्या रेणुका शहाणेंना खरेच देश, अफवा वगैरेंचे काही सोयरसुतक असेल का? ते म्हणतात ना सूर्याकडे पाहताना त्याची किरणे तरी आपल्यावर पडतील म्हणून सूर्यावर थुंकायचे. भले ते थुंकणे आपल्या थोबाडावर पडले तरी चालेल. तसेच काहीसे रेणुका शहाणेचे.

9594969638

@@AUTHORINFO_V1@@