एक सलाम कर्तृत्वाला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


भारतीय सैन्य दलात सर्वोच्चपदी विराजमान असलेले डॉ. बिपीन रावत यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. आगामी काळात 'सीडीएस'च्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या आयुष्याविषयी...


देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जवान कोणत्या परिस्थितीत जगत असतात याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे. म्हणूनच सैन्याच्या कर्तृत्वाविषयी सर्वांच्याच मनात नेहमी आदर असतो. या आदराच्या भावनेतूनच सैनिकांच्या कर्तृत्वाला सलाम केला जातो. भारतीय सैन्य हे जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. भारतमातेचे सुपुत्र मानल्या जाणाऱ्या सैन्यदलातील शूरवीरांच्या गाथा ऐकल्यानंतर आजही भारतीय नागरिकांची छाती अगदी अभिमानाने फुलून जाते. भारतीय सैन्यदलात प्रत्येक जाती, धर्म, आणि पंथाचे सैनिक असतात. प्रत्येकाची जात, धर्म आणि भाषा वेगवेगळी असली तरी हे सर्व सैनिक आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी एकत्र असतात. विविधतेत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या या सैनिकांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. तळपते ऊन, मुसळधार पाऊस किंवा कडाक्याची थंडी, असे वातावरणात कितीही बदल झाले तरी हे सैनिक सीमेवर आपल्या रक्षणासाठी सज्ज असतात.

 

या लाखो सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदी विराजमान असलेले डॉ. बिपीन रावत हे येत्या ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. भारतीय लष्करात सर्वोच्चपदी विराजमान असलेले बिपीन रावत यांच्या खांद्यावर निवृत्तीनंतरही सरकारकडून एक मोठी जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. संरक्षण दलात येत्या काही दिवसांत अस्तित्वात येणाऱ्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'च्या (सीडीएस) पहिल्या प्रमुख पदासाठी विद्यमान लष्करप्रमुख यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. नव्या वर्षात ते या पदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता असून रावत यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे त्यांचा जन्म झाला. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले डॉ. बिपीन रावत यांनी लहानपणापासूनच सैन्यात जाण्याचा निश्चय केला होता. कारण, रावत यांचे वडील लक्ष्मणसिंह रावत हेदेखील भारतीय लष्करात अधिकारी पदावर कार्यरत होते. आपल्या वडिलांप्रमाणेच भारतीय लष्करात नोकरी करत देशसेवा करण्याचे ध्येय डॉ. बिपीन रावत यांनी आपल्या डोळ्यांपुढे ठेवले आणि लहानपणापासूनच त्यासाठी तयारी सुरू केली. शिक्षणात ते हुशार असल्याने त्यांनी आपल्या जीवनात विविध पदव्या संपादित केल्या. पौडी येथे शालेय शिक्षण पार पडल्यानंतर देहारदून येथून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. येथील देवी अहिल्या विद्यापीठातून त्यांनी संरक्षण विषयात एम.फिल केले. उच्चशिक्षित असणाऱ्या डॉ. बिपीन रावत यांना त्याकाळी कोणत्याही क्षेत्रात सहज नोकरी प्राप्त झाली असती. मात्र, लहानपणापासूनच देशसेवेची आवड असणाऱ्या बिपीन रावत यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.

 

रावत हे १६ डिसेंबर १९७८ रोजी भारतीय सैन्यदलात रुजू झाले. रावत यांनी वडिलांच्याच म्हणजे, '११ गोरखा' रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून कारकिर्द सुरू केली. उच्चशिक्षित असणारे रावत यांनी सैन्यदलात रुजू झाल्यानंतरही आपले शिक्षण सुरूच ठेवले. त्यानंतर चौधरी चरण सिंह विद्यापीठातून त्यांनी पीएचडीची पदवी संपादित केली. एकाबाजूने शिक्षण सुरू असले तरी सैन्यदलांतही विविध पदांवर त्यांच्या पदोन्नतीचा धडाका सुरूच होता. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध आघाड्यांवर कामगिरी बजावली. लष्कराच्या अनेक महत्त्वपूर्ण आणि बड्या कारवायांची रणनीती आखण्यामध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०१६मध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांतच म्हणजे ३१ डिसेंबर २०१६ रोजी ते लष्करप्रमुख झाले. त्यावेळी प्रवीण बक्षी आणि पी. एम. हारिझ या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून झालेली रावत यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली. मात्र, सैन्यदलात त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेत विरोधकांचे तोंड गप्प केले. त्यांच्या कार्यकाळात लष्करातील पुनर्रचनेला त्यांनी दिलेली गती ही सर्वांत महत्त्वाची बाब. यामुळे, लष्कराचे आधुनिकीकरण आणि शस्त्रास्त्रांची खरेदी लवकर होईल, असा होरा आहे. लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या समितीचे नेतृत्व करताना, त्यांच्या गरजांविषयी सरकारशी समन्वय साधण्याची जबाबदारी रावत यांच्यावर असणार आहे. लष्कर, नौदल आणि वायुदल अशा तिन्ही प्रमुख विभागांची जबाबदारी त्यांच्यावर असेल. 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'च्या (सीडीएस) अध्यक्षपदाचीदेखील जबाबदारी ते यशस्वीरित्या सांभाळतील असा विश्वास सर्वांना आहे.त्यांची या पदी निवड होणे हे भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये धडकीच भरवणारे आहे. त्यामुळे या पदावर रावतच योग्य व्यक्ती असल्याचा मतप्रवाह आहे. त्यामुळे भारताचे २७वे लष्करप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. बिपीन रावत यांचे कौतुक करावे तितके कमी असून दै. 'मुंबई तरुण भारत'कडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@