नागरी पत्रकारिता काळाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 

 

जागतिकीकरणाच्या रेट्यात प्रसारमाध्यमे मोलाची भूमिका बजावत आहेत. वर्तमानपत्रच नव्हे तर समाज प्रसारमाध्यमांचे प्राबल्यही वाढले आहे. ही माध्यमे हाताळणे, योग्य ती माहिती, विचार समाजापर्यंत पोहोचवता येणे, ही प्रत्येक सजग नागरिकाची गरज आहे. हे कौशल्य सर्वसामान्य नागरिकाला प्राप्त व्हावे म्हणून नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. त्याचा घेतलेला हा मागोवा...


दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या वाढणार्या व्याप्ती, प्रभाव तसेच वापराने सर्वच क्षेत्रात बरेच बदल घडवून आणले आहेत. पत्रकारिता हेदेखील असेच एक क्षेत्र. गेली अनेक दशके प्रसारमाध्यमे बहुतांशी एकतर्फी होती. मात्र, सोशल मीडियाने आज या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आज सर्व माध्यमे परस्पर संवादी झाली आहेत.आज समाजामध्ये घडत असलेल्या सर्व घडामोडींवर नागरिक लक्ष ठेवून आहेतच पण त्यावर त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत. अर्थात पूर्वीदेखील वाचक पत्रांद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय कळवत परंतु हल्ली त्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. चोवीस तास बातम्यांच्या या जमान्यात आपल्याला प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरील बातम्या चोवीस तास बघायला मिळतात तसेच वाचायलाही मिळतात, परंतु या सर्व गोष्टी घडत असताना स्थानिक मुद्द्यांना कुठेतरी कमी महत्त्व दिले जाते, असे दिसते. या ठिकाणी नागरी पत्रकारिता अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या विचाराने विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात ‘नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे’आयोजन करण्याचे ठरविले. पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ मंडळी या कार्यशाळेत येऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतात.

 

अभिजीत मुळे, जे इंडियन एक्सप्रेस समूहामध्ये कार्यरत आहेत तसेच किरण शेलार जे दै. ‘मुंबई तरुण भारत’ चे संपादक आहेत, ते या संपूर्ण नागरी पत्रकारिता कार्यशाळा शृंखलेचे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. या कार्यशाळा साधारणपणे ४ तासांच्या असतात व त्या दोन सत्रांमध्ये घेण्यात येतात. साधारणपणे रविवारी अथवा सुटीच्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या कार्यशाळांमध्ये खाली नमूद विषयांवर मार्गदर्शन केले जाते:

 

> प्रसारमाध्यमे (मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल) व्याप्ती व मर्यादा

> समाज व प्रशासनावर होणारा माध्यमांचा प्रभाव

> पत्रकारितेसंबंधीचे मूलभूत कायदे

> बातमी म्हणजे काय?

> बातमी शोधावी कशी

> बातमी लिहावी कशी?

> बातमी किंवा मजकुराचे सादरीकरण

> मोबाईलच्या माध्यमातून बातमी चित्रित कशी करावी?

> चित्रिकरणाचे मूलभूत तंत्र व अपलोडिंगचे ज्ञान

> सोशल मीडियाचा प्रभावी वापर

 

हे विषय पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, व्हिडिओद्वारे मांडण्यात येतात तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन प्रश्नोत्तराद्वारे केले जाते. गेल्या सहा महिन्यांमध्ये अशा कार्यशाळा बोरीवली, ठाणे, मालाड मार्वे, वाशी, गोरेगाव, विक्रोळी, रत्नागिरी तसेच गोवा येथे आयोजित करण्यात आल्या. आतापर्यंत ५७१ नागरिकांनी यात सहभाग घेतला. गेल्या रविवारी, डिसेंबर १५, २०१९ रोजी विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील माध्यमिक शाळेतील सभागृहात अशाच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १५६ नागरिकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेची माहिती पत्रकांद्वारे तसेच सोशल मीडिया (फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप) द्वारे स्थानिक लोकांना दोन ते तीन आठवडे आधीपासून देण्यात आली होती व इच्छुकांची नोंदणी करून घेतली होती. कार्यशाळेत भाग घेणार्‍यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. या कार्यशाळा आतापर्यंत सगळीकडे विनाशुल्क आयोजित करण्यात आल्या. अशा कार्यशाळेत भाग घेऊन सक्रिय झालेल्या नागरिकांनी स्थानिक मुद्दे यशस्वीपणे उठविले आहेत.

- आशिष साखळकर

@@AUTHORINFO_V1@@