नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगरला दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सोमवारी हा महत्वाचा निकाल जाहीर केला. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सेंगरला भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ आणि पॉस्को अंतर्गत कलम ५(क), ६ अन्वये दोषी ठरवले. तर कुलदीपचा सहकारी शशी सिंहची सर्व आरोपांतून सुटका झाली. सेंगरला कोणती शिक्षा दिली जाणार याचा निकाल १९ डिसेंबर रोजी लागणार आहे.
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील चार वेळा आमदार राहिलेल्या कुलदीप सिंह सेंगर याच्याविरोधात पाॅक्सोसह गुन्हेगारी कट, अपहरण, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेचे अपहरण आणि छळ, अत्याचार तसेच इतर कलमांनुसार आरोप निश्चित करण्यात आले होते. पीडितेच्या पित्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर पीडितेने बहिणीसह लखनऊमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा २०१८ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. रायबरेली तुरुंगात बंद असलेल्या आपल्या काकाला भेटून पीडिता घरी परतत असताना याच वर्षी २८ जुलैला पीडितेच्या कारला एका ट्रकने धडक दिली होती. या प्रकरणातही सेंगर आरोपी होता.