तुमच्याइतके बेईमान तर कुणीच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |

sf_1  H x W: 0

 

सावरकर देशाचे पंतप्रधान झाले असते तर सर्वात आधी शिवसेनेसारखे बेगडी हिंदुत्ववादी बेरोजगार झाले असते. सत्तेच्या लोभापायी सावरकरांच्या अपमानाकडेही दुर्लक्ष करणारी शिवसेना निव्वळ बेईमान मानावी लागेल.


"स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पंतप्रधान झाले असते, तर या देशाची फाळणीच झाली नसती," अशी मुक्ताफळे उद्धव ठाकरेंनी उधळली आहेत. सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले असते, तर सर्वात आधी तुमच्यासारखे संधीसाधू बेरोजगार झाले असते. उद्धव ठाकरेंचे हे विधान सर्वच हिंदुत्ववाद्यांना सुखावणारे असले तरी शिवसेनेचे यातले योगदान काय, हा मोठाच प्रश्न आहे. कुणाच्या हिंदुत्वाविषयीच्या योगदानाची मापे काढावी, या मताचे आम्ही नाही. परंतु, ज्या प्रकारची बेईमानी सध्या शिवसेनेने चालविली आहे, त्याला उत्तर द्यावेच लागेल. सावरकर म्हणजे तमाम हिंदुत्ववाद्यांचे मुकुटमणी. मणिशंकर अय्यर यांनी आपल्या वेडाचारातून सावरकरांच्या काव्यपंक्ती अंदमानच्या कारागृहातून काढायला लावल्या, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे विधान होते की, "सावरकरांचा इतका अपमान होतो आणि आमच्यातले कोणी पेटून कसे उठत नाहीत?" आता तर पेटून उठण्याचा बाळासाहेबांचा वारसा ज्यांच्याकडे आहे, ते सत्तेच्या शेकोट्या शेकण्यात व्यस्त झाले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? शिवसेनेने सत्तेसाठी असंगाशी संग केलेला आहे. या असंगाचे जे काय राजकीय फायदे मिळू शकतात, ते शिवसेनेला मिळत आहेत. ते घ्यावे आणि आनंदात राहावे, आता उगीच ‘हिंदुत्ववादी’ असण्याचा आव आणू नये. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सावरकरांविषयीची मते काय आहेत, ते वेगळे सांगण्याची गरज नाही.

 

अत्यंत कडवटपणे त्यांनी ती वारंवार मांडली आहेत. सावरकरांच्या बाबतीत ही मायलेकरं अत्यंत बेलाशकपणे विधाने करीत असतात. शिवसेनेने सत्तेसाठी जेव्हा काँग्रेससोबत पाट लावला, तेव्हा आपल्या किमान समान कार्यक्रमात सावरकरांचा मुद्दा आणायला हवा होता. तो त्यांनी आणला नाही. कारण, साहजिकच त्यावेळी सावरकरांपेक्षा सत्तेच्या खुर्च्या प्रिय होत्या. ज्या प्रकारच्या विचारांची आणि कृतीची फिरवाफिरवी आपल्या मुखपत्रातून गेली पाच वर्षे शिवसेनेने केली आहे, त्याची पापे कधी ना कधी फेडावी लागणार आहेत. केवळ आणि केवळ हिंदूहितासाठी आणलेल्या नागरिकता सुधारणा विधेयकाला शिवसेनेने विरोध केला. आव काहीही आणला असला, तरी तो सोनिया आणि राहुल यांची खपामर्जी ओढवून घ्यावी लागू नये म्हणूनच होता. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत हिंदुत्ववाद्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे पाप दडविणे आणि दिल्लीला खुश ठेवणे, असे दोन उद्योग शिवसेनेला यापुढे करायचे आहेत. उदयनराजेंना तिकीट देऊन आपण चुकलो, असे शरद पवारांनी साताऱ्याच्या सभेत सरळ सांगून टाकले होते. शिवसेनेच्या बाबतीतही ते असे म्हणून मोकळे होऊ शकतात. मुद्दा मात्र शिवसेनेचा आहे. त्यामुळे स्वत:च्या चुका झाकण्यासाठी ही मंडळी आता बरळाबरळी सुरू करणार.

 

संजय राऊत यांनी दिल्लीत जी पोपटपंची केली होती, ती अशीच होती. भाजपच्या मतपेढ्या उभ्या करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. मुळात हिंदूहिताचे राजकारण करण्यासाठी भाजपच्या गेल्या चार पिढ्यांनी खस्ता खाल्ल्या. मानहानी, कुचेष्टा सगळे सगळे सहन केले. मात्र, मूळ हिंदुत्वाच्या मुद्द्याशी कधीही तडजोड केलेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजप गेली म्हणून हे कावळे कावकाव करतात. मात्र, तिथेही हिंदूहिताशी कुठल्याही प्रकारची तडजोड भाजपने केलेली नाही. ३७० कलम हटविण्यासाठी लागणारे जे काही धाडस होते, ते मोदी आणि शाह या जोडीने दाखविले आणि पुढे जे काही घडले ते समोर आहे. संघर्ष जितका कडवट, विजय तितकाच शानदार असतो. भाजपने हा संघर्ष केला आहे. एक नाही तर चार चार पिढ्या केला आहे. कोणी एक व्यक्ती अथवा कुटुंब या देदीप्यमान विस्ताराचे लाभार्थी नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या देशाच्या जनतेमध्ये आपल्या विचारातील ही स्पष्टता परावर्तित करण्यात संघ विचारांना यश आले आहे. भाजपला जे यश राजकीय पटलावर मिळाले, ते संघाशी संबंधित अन्य संस्थांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मिळाले आहे. हिंदुत्वाचा विचार म्हणजे मागासलेपणा आणि मुस्लिमांचे हितरक्षण करणे म्हणजे सेक्युलॅरिजम, हा या देशाचा स्थायीभाव होऊन गेला होता. जनसंघ व भाजप या दोन्ही माध्यमांतून हा समज म्हणून दृढावलेला गैरसमज पुसला गेला. ही सोपी बाब नाही. लालकृष्ण अडवाणींना या छद्म सेक्युलॅरिजमला वाचा फोडण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, हे आपल्यासमोर आहे.

 

या छद्माचा बुरखा फाडल्यानंतरच हिंदुत्वाला समाजकारणात आणि राजकारणात आजचे यश आले आहे. आक्रमक हिंदुत्वाची ज्वलंत अभिव्यक्ती म्हणून शिवसेना ओळखली जायची. बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही आक्रमक हिंदुत्वाची अभिव्यक्ती हिंदुत्वप्रेमींना भावतही होती. बाळासाहेबांनीही भूमिका घेताना आढेवेेढे घेतले नाही. या तीन पक्षांच्या संकरातून जो काही प्राणी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तारूढ झाला आहे, तो घोडा आहे की गाढव तेच कळत नाही. संख्येमुळे आकाराने मोठा असलेला हा प्राणी या सगळ्यांनाच खाऊन टाकणार, हे स्पष्ट आहे. काँग्रेसने आपला सर्वधर्मसमभाव सोडला आहे, शिवसेनेने आपले आक्रमक हिंदुत्व सोडले आहे, पवारांनी नेमके काय सोडले आणि काय धरले, हे अजून तरी कुणाला कळलेेलेे नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत फारसे भाष्यही करता येत नाही. सावरकरांच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी जी भूमिका घेतली, तो तर त्यांचा मूळ स्वभाव आहे. मात्र, शिवसेनेने जो बोटचेपेपणा स्वीकारला तो निषेधार्ह आहे. हिंदुत्वाशी केलेली ही बेईमानी शिवसेनेला खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही. "आम्ही जनतेसाठी काम करतो, विरोधी पक्षांसाठी नाही," असे जे उद्धव ठाकरे म्हणतात, त्यांना बहुदा लोकशाहीचे पुरेसे ज्ञान नाही. पण, मग जी जनता तुम्हाला इतकी वर्षे हिंदुत्ववादी मानत होती, त्याचे काय करायचे, हेदेखील शिवसेनेने सांगितले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@