
नवी दिल्ली- नागरिकत्व विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया यूनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत ६ बसेससह ८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जामियाशिवाय अलीगड, बनारस आणि बंगालमधील जाधवपूर यूनिव्हर्सिटीमध्येही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटी (एएमयू)च्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात ६० विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अलीगड शहर रात्री १० पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तर सहारनपूरमध्ये इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, बुलंदशहर, कासगंज, बागपथ, सहारनपूर आणि बरेली या जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
एएमयू आणि जामिया प्रशासनाने ५ जानेवारीपर्यंत सुट्टी दिली असून, रविवारी सर्व हॉस्टेल रिकामी करण्यात आली. विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनने घरी पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, अलीगडमध्ये परिस्थिति नियंत्रणात असल्याचे एडीजी पोलिस अजय आनंद यांनी सांगितले.
जामियाजवळ जमा झालेल्या आंदोलकांनी गाड्यांची जाळपोळ सुरु केल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडला. यात १०० आंदोलक जखमी झाल्याचा दावा विद्यार्थी संघटनेने केला. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी विद्यापीठातून काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पण, नंतर झालेल्या विरोधामुळे सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.