सामूहिक तिरस्काराचे तीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


तिरस्कार ही अधिक प्रमाणात वैयक्तिक भावनेपेक्षा कळप प्रवृत्तीची भावना आहे, असा शास्त्रीय समज आहे. एखाद-दुसरी तिरस्काराची घटना बऱ्याच काळानंतर तितकी महत्त्वाची राहात नाही, परंतु ती घटना ज्या व्यक्तींमध्ये वा लोकांमध्ये घडते, त्यांच्यात तिरस्काराचा जो भाव निर्माण होतो, तो मात्र खूप काळ चालू राहतो. यामुळेच की काय, आपण तिरस्कारातून निर्माण झालेले वाद खूप काळ चालू राहिलेले पाहतो.


तिरस्काराची वा एखाद्याचा तिटकारा करण्याची भावना ही जितकी व्यक्तिगत आहे, तितकीच ती सामूहिकही आहे. इतर अनेक भावनांपेक्षा तिरस्कार जेव्हा वैयक्तिक पातळीवरून सामाजिक समूहाकडे पोहोचतो, तेव्हा त्यात अनेक परिवर्तने होत असतात. बरेचदा इतरांच्या उपस्थितीतच एखादी व्यक्ती कशी वागते, आपला तिरस्कार कसा निर्माण करते, हे अवलंबून राहते. यामध्ये एखादी अधिकारी व्यक्ती काय निर्णय घेते व आपण तिची आज्ञा किती पाळायची, हेही खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा खूप माणसे एकत्र जमून तिरस्कार व्यक्त करतात, तेव्हा त्या भावनेला एखादेवेळी हिंसेचे भयानक स्वरूप प्राप्त होते. कारण, व्यक्तीची आपली स्वत:ची अशी भूमिका राहत नाही. ती कळप प्रवृत्तीचा एक भाग बनून जाते. आपण वर्तमान परिस्थितीत हे आपल्या देशात आणि संपूर्ण जगातही अनुभवत आहोत. व्यक्तीची स्वत:ची अशी ठोस भूमिका राहात नाही. ती त्या संपूर्ण खेळाचा भाग बनून जाते. सामाजिक व राजकीय घटक जेव्हा तिरस्काराच्या छत्रीखाली येतो, तेव्हा होणारा भावनिक उद्रेक प्रचंड असतो. शिवाय हा उद्रेक दीर्घकाळ चालू राहतो. तिरस्कार ही अधिक प्रमाणात वैयक्तिक भावनेपेक्षा कळप प्रवृत्तीची भावना आहे, असा शास्त्रीय समज आहे. एखाद-दुसरी तिरस्काराची घटना बऱ्याच काळानंतर तितकी महत्त्वाची राहात नाही, परंतु ती घटना ज्या व्यक्तींमध्ये वा लोकांमध्ये घडते, त्यांच्यात तिरस्काराचा जो भाव निर्माण होतो, तो मात्र खूप काळ चालू राहतो. यामुळेच की काय, आपण तिरस्कारातून निर्माण झालेले वाद खूप काळ चालू राहिलेले पाहतो. भूतकाळातील छोटीशी तिरस्काराची घटना तशी लोकांच्या मनात राहात नाही. पण, तिरस्काराचा भाव मात्र कायमचा वैरी होऊन जातो.

 

बऱ्याच वेळा आपल्याला हे कळत नाही की, आपली एखाद्याशी कुठलीही बातचीत झालेली नसते. जवळीक झालेली नसते, पण तरीही ती दुसरी व्यक्ती आपला इतका तिरस्कार का करते? कधीकधी असेही दिसून येते की, ती व्यक्ती एखाद्याचा तिरस्कार करते म्हणून तिच्याशी संबंधित इतर अनेकसुद्धा त्या व्यक्तीचा तिरस्कार करण्यामध्ये सामील होतात. थोडक्यात, ते तिरस्काराचे भाव त्या गटाचा हळुवार भाव होऊन जाते. यातला सुरस भाग असा आहे की, त्या गटातल्या एकालाही हे सांगता येत नाही की, अमुक व्यक्तीबद्दल वा गटाबद्दल त्यांना इतका तिरस्कार वाटण्याचे कारणच काय? बरे, यासाठी आपण विश्लेषण करायला पाहिजे वा सारासार विचार करायला पाहिजे, हे कुणाच्याही मनात येत नाही. तिरस्काराची जणू मोहनिद्रा त्या सगळ्यांना लागलेली असते. याशिवाय तिरस्काराच्या भ्रमात राहणारे लोक ज्यांचा आपण तिरस्कार करतो, त्या व्यक्तीशी वा त्या गटाशी संवाद साधण्याससुद्धा तयार नसतात. त्यामुळे दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे, सत्य काय असेल किंवा आपला गैरसमज झाला आहे का, याचे विश्लेषणसुद्धा होत नाही. खरे तर या संवादाअभावी तिरस्काराची भावना जास्तच बळावते. या भावनेचे खंडन करणे किंवा नव्याने मूल्यमापन करणे होत नाही. इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यातला वाद घ्या किंवा आपला काश्मीरबद्दलचा पाकिस्तानबरोबरचा वर्षानुवर्षाचा वाद, हाही तसा परिणामकारक आणि प्रगल्भ अशा संवादाअभावी झाला आहे, असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही. बऱ्याचवेळा तिरस्काराची भावना जे लोक वाढवायचा प्रयत्न करतात, त्यांना एक प्रकारचा विकृत आनंद मिळत असतो. अर्थात, या व्यक्तींच्या मनात निर्मळ संतोषाची भावना नसते. दुसऱ्यांच्या भल्यात आनंद घेण्याची प्रवृत्ती नसते. अशी मंडळी दुसऱ्यांचा तिरस्कार करण्यात सुखी असतात. कुठेतरी त्यांच्या मनात या भावनेतून येणारा भपकेबाजपणा असतो. म्हणूनच महात्मा गांधींचे मोठेपण मनाला भावते. त्यांचे तत्त्वज्ञान प्रेमाचे आहे, अहिंसेचे आहे. या सामान्य जगात त्या तत्त्वज्ञानाकडे पोहोचण्यासाठी प्रचंड धैर्य लागते, मनोबल लागते. (क्रमशः)

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@