सुप्रजा भाग २३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


saf_1  H x W: 0


लहान बाळाला तेल लावून, उटणं लावून आंघोळ घातली जाते. काही घरांमधून अजूनही धुरी दिली जाते. या गोष्टी बाळाच्या आरोग्यासाठी हितकर आहेत. पण, हळूहळू ‘ओल्ड फॅशन’ या सदराखाली चांगल्या सवयीही लोप पावू लागल्या आहेत. आजीबाईचा बटवा, जो घराघरात असायचा, तो दिसेनासा झाला आहे. आजीबाईचा बटवा म्हणजे काय? हेदेखील अनेकांना माहीत नसेल, अशी आजच्या पिढीची परिस्थिती. बाळ थोडे अधिक रडले, झोपले, शी केली इत्यादी इत्यादी तरी घरातले घाबरतात, बावचळतात आणि दवाखान्याची, हॉस्पिटलची पायरी गाठतात. पण, हे अत्यंत चुकीचे आहे. काहीवेळा थोडे धीराने घेणे गरजेचे असते.

 

बाळाची झोप जन्मानंतर २०-२२ तास असते. ती हळूहळू कमी होते. आधी (जन्मानंतर) बाळ बोलत नाही, रांगत नाही, चालत नाही, ओळखत नाही. पण, जसजसे बाळ वाढू लागते, तसतशा या गोष्टी सुरू होतात. प्रत्येक टप्पा गाठायला वेगवेगळा कालावधी लागतो. आईचा आवाज बाळ दोन ते अडीच महिन्यांत ओळखू लागते. पालथे पडणे, चौथ्या महिन्यापर्यंत रांगणे, बसणे, धरून उभे राहणे, धरून चालणे, सुटे चालणे अशा टप्प्यांमध्ये बाळाचा विकास होतो. याच अवधीत दात येणे, बोलणे, शू-शीवर थोडे नियंत्रण येणे. शू-शी लागली आहे, हे सांगता येणे अशा गोष्टी सुरू होतात. बाळाची शारीरिक वाढ तर होतेच, तसेच उंची वाढणे, दात येणे, हाता-पायांमधली ताकद वाढणे इ. घडतेच. पण त्याचबरोबर समजही वाढते. बौद्धिक वाढ, मानसिक वाढही होत असते. आपले नाव, आईबाबांचे नाव, पत्ता, फोन नंबर, बडबडगीतं, अक्षरओळख असा हा प्रवास हळूहळू सुरू होतो. ही वाढ होणे महत्त्वाचे आहेच, पण ठरलेल्या कालावधीत होणे हे अधिक गरजेचे आहे. हे सगळे नीट होण्यासाठी उत्तम, सात्विक, संतुलित आहार तर हवाच. आहारातील पोषक घटकांमधून शरीराचे भरण-पोषण होत असते. झीज भरून काढली जात असते. तसेच शरीराच्या विविध ऐच्छिक आणि अनैच्छिक (Voluntary and Involuntary Action) हालचाली नियमित होण्यासाठीही हाच आहार कारणीभूत आहे. पण, आहाराइतकेच आचारविचार आणि राहणीमान उत्तम असणे महत्त्वाचे आहे. उत्तम निरोगी व्यक्तिमत्त्चासाठी हे विविध पैलू लहानपणीच अंगीकारणे काळाची गरज आहे.

 

शरीरात दृढता येण्यासाठी, हाडांची ताकद वाढविण्यासाठी लहान मुलांमध्ये नियमित अभ्यंग (तेलाने हलके मॉलिश) होणे गरजेचे आहे. हल्ली लोशन, क्रीम, सिरम इ. रासायनिक प्रक्रिया केलेली उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. ती भुरळ पडणारी आहेत. पण, त्यापेक्षा प्रभावी आणि सहज उपलब्ध असणारे तेल हे अधिक उपयोगी आहे. बाळ उपडे पडू लागले, सरकू लागले, रांगू लागले की, त्या-त्या मांसपेशींची ताकद वाढते, त्यांची वाढ उत्तम व्हावी व हाडे आणि सांधे बळकट व्हावेत म्हणून रोज झोपताना बाळांना (पाच वर्षांचे होईपर्यंत) पाठीला, मानेला, कंबरेला व हातापायांना (किमान एवढ्या जागी तरी) तेल लावावे. थंडीत तिळाचे तेल व अन्य ऋतूंमध्ये खोबरेल तेल लावावे. औषधी गुणांनी युक्त तेल वापरले, तरी चालेल. चांगल्या सवयी लहानपणीच लावाव्या लागतात आणि त्यासाठी घरातील मोठ्या मंडळींनी त्या सवयी आत्मसात करून घ्याव्यात. उदा.सायंकाळी देवासमोर दिवा लावल्यावर ‘शुभं करोति’ जर छोट्यांनी म्हणावी असे वाटत असेल, तर मोठ्यांनी ही सवय अंगीकारावी. रोज सकाळ-संध्याकाळ दात घासणे, एका जागी बसून जेवण जेवताना टी.व्ही./ मोबाईल न बघणे, घरात आरडाओरडा, भांडण-तंटा तसेच नकारात्मक वातावरण नसणे, पालकांमध्ये सुसंवाद असणे, घरात तणाव नसणे, व्यसने (कुठल्याही प्रकारची) नसणे इ. सवयी तर मोठ्या व्यक्तींनी अंगीकारल्या तर या सवयी आपोआप लहान मुलांमध्ये येतात. पण, जर घरात तशी शिकवण मिळत नसेल, तर तान्हुल्यांकडून तशी अपेक्षा बाळगणे रास्त नाही.

 

उदाहरणादाखल एक किस्सा इथे सांगते - एक माता नोकरीत उच्चपदावर कार्यरत होती. त्यासाठी नीटनेटके राहणे, प्रसाधने वापरणे इ. तिला करावे लागत असे. तिची छोटी मुलगी हे बघत असे. हळूहळू सगळे नॉर्मल आहे, यात काहीच वावगे नाही, असे त्या छोटीला वाटू लागले. दहाव्या वर्षांपर्यंत ही छोटी मेकअप करण्यात निष्णात झाली होती. स्वतःचे नेलपॉलिश स्वतः नीट लावणे, आयलायनर लावणे, लिपस्टिक, केशभूषा इ. सर्व तिला जमत असे. यात अतिशयोक्ती नाही. वरील उदाहरणांतून मला एक गोष्ट विशेष करून मांडायची आहे की, नीटनेटके दिसणे, राहणे हे चूक नाही. पण, १० वर्षांच्या मुलीला प्रसाधने वापरता येणे हे बरोबर आहे का? तसेच व्यसनांबद्दलही आहे. घरात पार्टीमध्ये आईवडील मद्यपान करतात, हे बघून लहान मुलांना ते चुकीचे आहे, असं वाटतच नाही. मोबाईलचा अतिरेकी वापरही व्यसनांमध्ये मांडता येणारी बाब झाली आहे. याला जबाबदार कोण? प्रत्येक पालकाने याबद्दल स्वतःशी नक्की संवाद साधावा. उत्तर (खरे) नक्की मिळेल. १०-१२ वर्षांची मुले स्कूटी चालवताना दिसतात. बरोबर की चूक? मोठ्यांच्या सर्व सवयी लहानपणीच अंगीकारणे चुकीचे आहे. त्यांचे शरीर-मन-बुद्धी पूर्ण विकसित नसते. सद्सद्विवेकबुद्धी त्यांना वापरता येत नाही. तसेच आईवडील हे पहिले गुरू असतात. त्यांचे अंधानुकरण त्यांचे पाल्य नक्कीच करतात. मुलं सशक्त व सुदृढ फक्त शरीरानेच नाही, तर मनानेही असणे गरजेचे आहे, यासाठी पालकांना ‘रोल मॉडेल’ होणे अत्यंत गरजेचे आहे. स्वैराचाराने आपल्याच पाल्याचे भविष्य अंध:कारमय होईल, याची समज प्रत्येक पालकामध्ये असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

 

Formative Years म्हणजे, वाढीच्या वयात तरी कटाक्षाने नकारात्मक गोष्टी टाळाव्यात. चुकीच्या सवयींमुळे मुलांच्या केीोपरश्र डशलीशींळेपी (अंत:स्रावी ग्रंथींचे स्राव) मध्ये बदल होऊन वयात येणे, ही प्रक्रिया खूप लवकर सुरू होते. त्याचबरोबर शारीरिक बदलही होतात. पण, मन मात्र कोवळे असते.हे दुष्टचक्र वेळीच थांबविणे, मुलांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. जसे वागणुकीत पालकांनी बदल करावा, तसाच आहारातही करावा. बाळ एक वर्षांचे होईपर्यंत त्याला मोठ्यांचा आहार (खूप तिखट, मसालेदार चमचमीत, खारट इ.) देऊ नये किंवा पालकांनीही आपल्या सवयी बदलाव्यात. शाळेचा डबा हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. नर्सरी, शिशुवर्गात जाणाऱ्या मुलांचे डबे जर बघितले तर बहुतांशी डब्यांमधून क्रीम बिस्किटे, वेफर, केक, पेस्ट्री, बेकरीचे अन्नपदार्थ, चॉकलेट्स इ. हेच असते. मी हेही बघितले आहे की, मुलांच्या हट्टापायी, त्यांच्या सगळ्या चुकीच्या मागण्याही पुरविल्या जातात. पण, या सवयींचा त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणामच होणार, हे जाणून पालकांनी थोडे शिस्तीने वागावे. ते कसे, ते पुढील लेखात....(क्रमश:)

@@AUTHORINFO_V1@@