श्रेयसच सरस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा झटका बसला असला तरी या सामन्याने भारतीय फलंदाजीमधील गेल्या अनेक दिवसांपासूनची चिंता मिटवली, असे म्हटल्यास काही गैर ठरणार नाही. भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली हे तीन मुख्य खेळाडूच सर्वाधिक धावा करतात, असे मत विश्वचषक सामन्यांदरम्यान एका माजी वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केले होते. अनेक सामन्यांचा आलेख पाहिल्यास अव्वल तीन खेळाडूंनीच सर्वाधिक धावा केल्याचा इतिहास असून त्यानंतरच्या फलंदाजांनी न सावरल्याने भारताला काही सामन्यांमध्ये पराभवाचा झटकाही बसल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर एका दमदार खेळाडूची निवड व्हावी, जो संघाला संकटसमयी सावरण्याची क्षमता राखतो, असा मतप्रवाह सर्वच प्रशिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत होता. चौथ्या स्थानी सर्वोत्तम फलंदाज खेळविण्यासाठी भारताने आत्तापर्यंत अनेक प्रयोग केले. खेळाडूंची कमी नसलेल्या भारताने या जागेवर अनेक खेळाडूंना संधी दिली. मात्र, येथे एकही फलंदाज दीर्घकाळ टिकू शकलेला नाही. आयपीएलच्या सामन्यांमध्ये मैदान गाजविणारे अंबाती रायुडु, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, रिषभ पंत आदी सर्व खेळाडूंना याजागी संधी मिळाली. मात्र, फॉर्म नसल्याने एकही जण या जागेवर टिकू शकला नाही. आगामी 'टी-२०' विश्वचषक सामन्याच्या दृष्टीने यावेळी भारतीय संघाने संघात चौथ्या स्थानावर श्रेयसला संधी दिली. श्रेयसने मात्र या संधीचे पुरेपूर सोने केल्याचे दिसत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी ढासळल्यानंतर श्रेयसने डाव सावरलाच. पण, रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्यासोबत भागीदारी करत प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडता येईल, या धावसंख्येपर्यंत भारताला नेऊन ठेवले. चौथ्या स्थानावर भारताला काही अशाच खेळाडूंची गरज होती. संघाची अपेक्षा श्रेयसने आपल्या कामगिरीतून पूर्ण केली असून त्याला यापुढेही संधी मिळण्याची मागणी चाहत्यांमधून होत आहे. आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव असणारा श्रेयस नक्कीच उत्तम कामगिरी करेल, अशी आशा सर्वांना आहे.

 

'क्लीन बोल्ड'!

 

वेस्ट इंडिजविरूद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. नुकत्याच पार पडलेल्या 'टी-२०' मालिकेच्या विजयानंतर चांगल्या फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला नमवणे हे वेस्ट इंडिज संघापुढे एक मोठे आव्हान होते. मात्र, संपूर्ण सामना पाहिल्यास प्रतिस्पर्धी संघापुढे भारताचे कोणतेच आव्हान नसल्याचे जाणवले. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्व बाबींमध्ये प्रतिस्पर्ध्यांचेच पारडे जड असल्याचे दिसून आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळेच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे मत तज्ज्ञ नोंदवतात. याचे कारणही तसेच आहे. सुरुवातीला फलंदाजी ढासळल्यानंतर भारतीय संघाने आपला डाव सावरत प्रतिस्पर्ध्यांना २८९ धावांचे आव्हान दिले. धावसंख्या ३०० च्या पार नसली तरी २८९ धावांचे आव्हान पेलण्यासाठी भारत प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज संघाने केवळ ४७.५ षटकांतच आठ गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. त्यामुळे गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्व बाबींमध्ये भारताची कामगिरी निराशाजनकच राहिल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभव पत्करण्याची भारताची ही पहिली वेळ नाही. याच वर्षी मोहालीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघापुढे ३५८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, त्यावेळीही ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि सुमार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४७ व्या षट्कातच पूर्ण केले. मोठी धावसंख्या उभारल्यानंतरदेखील भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता.त्यावेळीही सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण याचाच फटका भारताला बसला होता. त्यातूनही धडा न घेतल्यामुळे भारताला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला असून संघाच्या प्रशिक्षकांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय संघाने कमी धावसंख्या उभारल्यानंतरही प्रतिस्पर्ध्यांना नमविल्याचा अनेक सामन्यांचा इतिहास आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून क्रिकेटप्रेमींना सर्वाधिक अपेक्षा आहेत. म्हणूनच भारत दुसऱ्या सामन्यात 'कमबॅक' करेल, अशी आशा तमाम क्रिकेटप्रेमींना आहे.

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@