'रक्तचेतन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0


एका अ‍ॅपच्या माध्यमातून 'रक्तदाना'च्या सर्वश्रेष्ठ दानाला विविध महानगरांच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून हजारोंना जीवनदान देणाऱ्या १९ वर्षीय चेतन गौडा आणि त्याच्या 'खून खास' या सामाजिक संस्थेविषयी...


भारतीय संस्कृतीत 'दाना'ला तसं अनन्यसाधारण महत्त्व. त्यातही 'रक्तदान' हे सर्वश्रेष्ठ दान. याविषयी भरपूर जनजागृतीनंतरही अद्यापही वेळेत रक्त न मिळाल्याने हजारो रुग्णांना दरवर्षी त्यांचे प्राण गमवावे लागतात. असंच काहीसं १६ वर्षीय चेतनच्या शिक्षिकेसोबत घडलं आणि त्यामुळे चेतनच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. चेतन गौडा. मूळचा बंगळुरुचा. तसा सुखवस्तू परिवारातला. नववीत असताना त्याची आवडती शिक्षिका वेळेत रक्त न मिळाल्यामुळे दगावली. शिक्षिकेच्या अशा अकाली 'एक्झिट'मुळे चेतन काही क्षण अगदी अचेतन झाला. आपल्या शिक्षिकेला वेळेत रक्त मिळू न शकल्याचा त्याने प्रचंड धसका घेतला. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात केवळ रक्त न मिळाल्यामुळे हजारो लोक दगावतात, या भावनेनेच चेतनचे रक्त खवळले. पण, केवळ रक्तदान करून तो गप्प बसला नाही. फक्त रक्तदानविषयक जनजागृतीच पुरेशी नसून रक्तदाते आणि गरजूंची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांगड घालण्यासाठी त्याने पावले उचलली. 'खून खास' या सामाजिक संस्थेची त्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच स्थापना केली. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर, समाजमाध्यमांवर आणि मिळेल त्या व्यासपीठावरून चेतनने रक्तदानाविषयी जनजागृतीचा विडा उचलला. एक हेल्पलाईन क्रमांक जारी करून रक्तदानाचे आवाहन करण्यास त्याने सुरुवात केली. फक्त एकट्या बंगळुरुत नाही, तर मुंबई, चेन्नई, हैदराबाद या महानगरांतून तब्बल ५० हजार रक्तदात्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असून, ही संख्या अधिकाधिक वाढावी म्हणून चेतन आणि त्याची सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे.

 

चेतनने रक्तदानविषयक जागृतीचे प्रयत्न केवळ महानगरांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर ईशान्य भारतातही 'खून' मिळाले पाहिजे, म्हणून त्याची टीम कामाला लागली. गुवाहाटीमध्ये त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. पण, चेतन सांगतो की, आसाममध्ये रक्तदान करायला फार कोणी पुढे सरसावले नाही. तेथील लोकांमध्ये रक्तदानाविषयी गैरसमज जास्त आणि जागृती कमी असल्याचे त्याला जाणवले. पण, 'खून'चा आसाममध्ये सुरुवातीला फक्त दोन रक्तदात्यांशी जोडला गेलेला 'रक्तसंबंध' आज पाचशेहून अधिक रक्तदात्यांपर्यंत विस्तारला आहे. अधूनमधून आपणही रक्ताच्या तुटवड्याविषयक बातम्या वाचत असतो. त्याचे कारण म्हणजे, जगभरातील देशांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्तदान करणाऱ्यांची संख्या ही केवळ १९ टक्के इतकीच आहे. आपल्या देशात तर ही परिस्थिती अधिक गंभीर. २०१६च्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १२ दशलक्ष युनिट्स इतकी रक्ताची गरज असताना केवळ १०.६ दशलक्ष युनिट्स रक्तसाठा देशात उपलब्ध होता. म्हणूनच दरवर्षी हजारो भारतीय रुग्णांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू ओढवतो. चेतनलाही या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. त्याने रक्तदानाची ही प्रक्रिया नीट समजून घेतली. यामध्ये त्याला आढळून आले की, रक्तासाठी बहुतांशी रुग्ण हे रक्तपेढीवर, रुग्णालयांवरच अवलंबून आहेत. म्हणूनच मग चेतनने थेट रक्तदाते आणि गरजूंना एकमेकांच्या थेट संपर्कात आणणारे अ‍ॅप विकसित केले. त्यामुळे जेव्हा कोणाला रक्ताची गरज असेल, तेव्हा १० किमींच्या परिघातील रक्तदात्यांना हे अॅप रक्ताची गरज सूचित करते व रक्तदाता थेट गरजूंपर्यंत अशा पद्धतीने पोहोचू शकतो. इतकेच नाही, तर हे अ‍ॅप 'रेड क्रॉस', रक्तपेढ्या, रुग्णालयांमधील रक्ताच्या उपलब्धतेविषयीही सविस्तर माहिती देते. त्याचबरोबर बरेचदा खाजगी रक्तपेढ्यांकडून होणारा रक्ताचा कृत्रिम तुटवडा आणि किंमतीतील वाढ रोखण्यासाठी रक्ताच्या किंमतीविषयी, रक्तदान शिबिरांविषयीही या अ‍ॅपवरून वेळोवेळी जनजागृती केली जाते.

 

आज चेतन १९ वर्षांचा आहे. पण, वयाच्या सोळाव्या वर्षांपासून सुरू केलेल्या या सामाजिक कामामुळे आज चेतनचे अनेकांशी 'खून के रिश्ते' आहेत. 'खून'मधून मिळालेले रक्तच आज हजारोंच्या नसानसांतून प्रवाहित झालेले आहे. चेतनच्या या कार्याची दखल घेऊन, त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. आगामी काळात आपल्या कामाच्या अधिकाधिक विस्तारासाठी चेतन प्रयत्नशील आहेच. पण, सध्या तो अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेत असून 'सामाजिक कार्य' या विषयात त्याला पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा आहे. आपल्या समाजकार्याच्या जोरावर हा समाज प्रत्येकाला जगण्यासाठी एक सर्वोत्तम स्थळ कसे ठरेल, यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे चेतन प्रांजळपणे सांगतो. चेतनचे हे रक्तात भिनलेले समाजकार्य निश्चितच त्याच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराशिवाय आकारास आले नसते. सोबतच त्याच्या सामाजिक संस्थेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक वयोगटातील स्वयंसेवकांचे, रक्तदात्यांचेही आभार मानायला तो विसरत नाहीत. चेतनच्या सचेतन वृत्तीने दोन गोष्टींवर शिक्कामोर्तब होते. एक म्हणजे, समाजकार्यासाठी ना वयाचे, ना वेळेचे ना स्थळाचे बंधन असते. आणि दुसरे, रक्ताची नाती ही अशी रक्तदानातूनही गुंफता येतात. आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या या रक्ताच्या दोन थेंबांनी, कोणाला तरी आयुष्य जगण्याची दुसरी संधी आपण देऊ शकतो. 'रक्तचंदन' या आयुर्वेदिक वनस्पतीचे लाकूड, ज्याप्रमाणे उगाळून शरीरातील मुकामार, सूज, जखमेवर रामबाण उपाय केला जातो, तसाच हा हजारो गरजूंना वेळेत रक्त मिळेल, जीवनदान मिळेल म्हणून झिजणारा 'रक्तचेतन.'

@@AUTHORINFO_V1@@