ही फक्त सुरुवात आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2019
Total Views |
म_1  H x W: 0 x


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेत शिवसेना आपल्यापुढे सत्तेसाठी किती लाचार आहे, हे राहुल गांधींना आपल्या मुस्लीम मतदारांना दाखवून द्यायचे आहे. आता मुस्लीम मतदारांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी राहुल गांधींनी मांडलेल्या सावरकर बदनामी नाट्यात सामील व्हायचे, नव्या मालकिणीच्या इशार्‍यावर टिकून असलेल्या खुर्चीला चिकटून राहायचे की राष्ट्रीय बाणा दाखवत स्वाभिमानाचे जिणे जगायचे, हा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे. कारण ही फक्त सुरुवात आहे!!!

 

मानवी आयुष्यातील सर्वोच्च मूल्य म्हणजे स्वातंत्र्य. परंतु, ते फुकटात मिळाले तर त्याची किंमत, महत्ता कोणाला समजणार वा कळणार? परवशतेच्या जुलमी बेड्यांतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी आयुष्याचा होम केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणारी जमात ही अशाच फुकट्यांची! गांधी घराण्याचा कुलदीपक (?) आणि ‘राष्ट्रीय पप्पू’ ठरलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांचा अशा फुकट्या लोकांमध्ये फार वरचा क्रमांक लागतो. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’शी यमक जुळवताना राहुल गांधींनी बलात्कारादी प्रकरणांवर टीका करतरेप इन इंडिया’ अशी मुक्ताफळे उधळली. तद्नंतर राहुल गांधींकडून देशाची बदनामी केल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्तांकडून माफीची मागणी करण्यात आली. परंतु, ज्यांच्या विधानांत, वक्तव्यात आणि पाकिस्तानच्या शब्दाशब्दांशी कमालीची साम्यता आढळते त्या पक्षाचे नेते ‘रेप इन इंडिया’वरुन देशाची माफी कशाला मागतील? देशाच्या मान-सन्मानाची फिकीर नसलेली माणसे उलट असला बेतालपणा करायला आणखी एखादी संधी मिळते का, याचीच अधाशीपणे वाट पाहतील! म्हणूनच राहुल गांधींनी आपल्या बरळूपणावर माफी मागण्यास नकार दिला, तोही सावरकरांचा संदर्भ देत. “माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मी कधीही माफी मागणार नाही,” असे ते म्हणाले.

 

मात्र, राहुल गांधींच्या तोंडातून सावरकरांविषयीचे उद्गार बाहेर पडले त्यावेळी त्यांची नवी सोबतीण काय करत होती, काय केले तिने? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेत जिचा हिंदुत्वाचा बाजार फुलला त्या शिवसेनेने कोणता पवित्रा घेतला? तर अंगात वीरश्रीचा संचार आल्यासारखे स्वतःला ‘वाघ वाघ’ म्हणवून घेणार्‍यांच्या डरकाळ्या राहुल गांधींचे सावरकरांवरील विधान समोर येताच कुठल्या कुठे विरून गेल्या. पक्षप्रवक्त्यांची आणि पक्षप्रमुखांची प्रतिक्रिया तर शेळीदेखील वर्मी घाव बसल्यास अधिक मोठ्या आवाजात ‘बें बें’ करेल, इतकी मवाळ होती. अर्थातच शिवसेनेला सध्या १०, जनपथच्या ‘मातोश्रीं’ची मर्जी खप्पा झालेली परवडणारी नाही. कारण, तसे झालेच तर सत्तेचे सोन्याचे ताट त्यांच्या हातातून गेल्यातच जमा! एवढा आटापिटा करून विचार, तत्त्व, वारसा आणि इतिहास माहीमच्या खाडीत बुडवून मिळवलेली सत्ता कोणा सावरकरांसाठी गमावून शिवसेनेला कसे चालेल? म्हणूनच मग सुरुवातीला ट्विटरवर दोन ओळी टाकून आणि नंतरही कॅमेर्‍यासमोर गुळमुळीतपणे बोलणेच शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी व पक्षप्रमुखांनीही पसंत केले. ज्वलंत हिंदुत्वाच्या, राष्ट्रीयत्वाच्या आणि सावरकरप्रेमाच्या पुरस्काराचा दावा करणार्‍यांनी आपला पक्षच नव्हे तर असलेली-नसलेली बुद्धीही सोनिया व राहुल या नव्या घरधन्यापुढे गहाण टाकल्याची ही पावतीच नव्हे का?

 

खरे म्हणजे क्रांतिकारकांचे मुकूटमणी, हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देदीप्यमान आणि झळाळत्या कर्तृत्वापुढे सत्तेची ५६ तख्ते भिरकावून दिली तरी ती कमीच, इतके महान! म्हणूनच राहुल गांधींच्या विधानानंतर शिवसेना काँग्रेसबरोबरील नव्या संसाराला लाथ मारेल, अशी भाबडी आशाही कित्येक शिवसैनिकांच्या नि हिंदुत्ववाद्यांच्या, राष्ट्रवाद्यांच्या मनात जागी झाली. परंतु, सत्तेचे गवत खाणार्‍या ‘वाघोबा’ला सावरकरांचाच विसर पडला. राजकारणात ज्याला कवडीचेही मोल नाही अशा राहुल गांधींच्या वक्तव्याचा साधा निषेध करण्याची हिंमतही खुद्द उद्धव ठाकरेंना दाखवता आली नाही. उलट सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करण्याचीच त्यांना उबळ आली! नागरिकत्व विधेयक सावरकरांच्या तत्त्वानुसार नाही, हे वाक्य त्यांनी उच्चारले तेव्हा उद्धव ठाकरेंना बालिश म्हणावे की खुळे हा प्रश्न पडावा, असे ते होते! इथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दोन प्रसंगांचा उल्लेख करणे औचित्याचे ठरेल. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केंद्रात मंत्रीपदी असताना अंदमानच्या सेल्युलर जेलमधील सावरकरांच्या नावाची पट्टी उखडून टाकण्याचा उद्दामपणा केला होता. बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यर यांच्या याच कुकृत्याचा निषेध भरचौकात त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून केला होता. हा झाला एक प्रसंग आणि दुसरा म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्वतः अतिशय प्रतिभावंत व्यंगचित्रकारही होते. तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारे व्यंगचित्र चितारत आपली सावरकरनिष्ठा दाखवून दिली होती.

 

(देशाच्या स्वातंत्र्यासाठी) ‘मेले’ कोण आणि (देशाच्या सत्तेवर) ‘बसले’ कोण? असा त्या व्यंगचित्राचा एकंदर आशय होता. दुर्दैवाने बाळासाहेबांचे ते व्यंगचित्र आज त्यांचेच वारस काँग्रेसबरोबर सत्तेच्या सौदेबाजीत खरे करून दाखवताना दिसतात! शोकांतिका म्हणतात ती हीच! दुसरीकडे शिवसेना आपल्यापुढे सत्तेसाठी किती लाचार आहे, हे राहुल गांधींना आपल्या मुस्लीम मतदारांना दाखवून द्यायचे आहे. अर्थात, ही फक्त सुरुवात आहे, शिवसेनेला पुढे आणखी अनेक अनुभव काँग्रेसी नेतृत्वाचे घ्यायचे आहेत. कर्नाटकातील कुमारस्वामींनी तसा अनुभव घेऊन आणि रडूनही झालेले आहे. आता तशीच अवस्था काँग्रेस नेतृत्वाला शिवसेनेचीही करावीशी वाटत असावे आणि त्यातला पहिला डाव त्यांनी नुकताच टाकला आहे. शिवसेनेला एकेकाळी श्रद्धास्थानी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव त्यांनी जाणीवपूर्वक घेतल्याचे दिसते. अर्थात, राहुल गांधी किंवा काँग्रेसला सावरकर, हिंदू, ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशा या मातीचा, या देशाचा रसरशीतपणा कधी मान्य नव्हताच. त्यांनी नेहमीच या गोष्टींची हेटाळणी केली. परंतु, ज्या शिवसेनेने या मुद्द्यांच्या भोवती आपले राजकाराण फिरवले ती शिवसेनादेखील आता राहुल गांधी व काँग्रेससारखीच वागणार का? (उद्धव ठाकरेंच्या राहुल गांधींचे नावही न घेण्यावरून तरी तसेच वाटते) परंतु, तसे नसेल तर मुस्लीम मतदारांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी राहुल गांधींनी मांडलेल्या सावरकर बदनामी नाट्यात सामील व्हायचे, नव्या मालकिणीच्या इशार्‍यावर टिकून असलेल्या खुर्चीला चिकटून राहायचे की राष्ट्रीय बाणा दाखवत स्वाभिमानाचे जिणे जगायचे, हा निर्णय शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे.

 

दरम्यान, नियम-कायद्यांना डावलून भारताच्या सर्वांगीण उन्नती व उत्थानासाठी गगनभेदी कार्य केले व म्हणून मी माफी मागणार नाही, असा राहुल गांधींचा ते वाक्य उच्चारतानाचा आविर्भाव होता. मात्र, देशाला खड्ड्यात नेणार्‍या पक्षाच्या नेत्याने असा आविर्भाव करून बोलणे, हाच मोठा विनोद आणि तो काँग्रेसच्या विनोदवीराने करून दाखवला! अर्थात, गेली १० वर्षे ते हेच करत आले आणखी पुढेही हीच कामगिरी करत राहतील, यात कसलीही शंका नाही. तसेच राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून ठामपणे सांगावेसे वाटते की, कोणाही रिकामटेकड्याने यावे आणि आपल्या नावामागे सावरकर लिहावे, इतके ते नाव हलके अजिबात नाही! देशभक्तीचा ज्वलज्जहाल यज्ञ म्हणजे सावरकर आणि म्हणूनच ते नाव राहुल गांधींसारख्या घराण्याच्या पुण्याईवर पोसलेल्यांच्या तोंडी कसे शोभून दिसणार? एका पराभवानंतर श्रमपरिहारासाठी थायलंड नि आणखी कुठे कुठे पळणार्‍यांची आपल्या नावामागे दोन दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगूनही ध्येयप्राप्तीसाठी सूर्यासम प्रचंड इच्छाशक्तीने तळपणार्‍या सावरकरांचे नाव लावण्याची तर पात्रता, योग्यता आणि क्षमतादेखील नाही! म्हणूनच राहुल गांधींनी सावरकरांकडे चुकूनही बघू नये. कारण, ते त्यांना झेपणार नाही, मानवणार नाही, पचणार नाही. हो, एक मात्र नक्की होईल! अशाच कारणांवरून याआधी त्यांच्या पक्षाची जितकी माती झाली, त्यापेक्षाही अधिक ती यापुढेही होतच राहील!

@@AUTHORINFO_V1@@