लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव : भाग ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2019
Total Views |

tilak_1  H x W:



गणपतीचा उत्सव नव्या सार्वजनिक स्वरुपात पुन्हा एकदा लोकांसमोर आला, तेव्हा हिंदू-मुसलमान दंगे सुरू होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकत्र येऊन जोमाने लढू लागले. पुढे पुढे या उत्सवातील जातीय समीकरणे बदलू लागली आणि उत्सव सर्वसमावेशक झाला. मेळे आणि पूजाअर्चा फक्त प्रकाशझोतात आली तर सुधारकांची टीका अधून-मधून कानी पडत असे. ती होऊ नये म्हणून टिळकांनी या उत्सवाला केवळ धार्मिक संस्कारापुरते मर्यादित न ठेवता, वेळोवेळी अधिकाधिक व्यापक करत नेले. त्यांचे ध्येय फार मोठे होते, त्यांना बर्‍याच गोष्टी साध्य करायच्या होत्या. देशासमोर सध्याच्या घडीला असलेल्या सर्वात मोठ्या समस्येसोबत टिळकांनी हा उत्सव जोडला आणि ब्रिटिश राज्याविरुद्धच्या आपल्या राजकारणाला मोठे बळ दिले. त्यामुळे गणेशोत्सव केवळ सार्वजनिक न राहता, ती प्रतिवर्षीची एक राष्ट्रीय चळवळ बनली.


गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली तेव्हा टिळक पुण्यात विंचूरकर यांच्या वाड्यात राहत असत. विंचूरकर वाड्यात बसवण्यात येणार्‍या गणपतीला ‘लॉ क्लास’चा गणपती असेही म्हणत. कारण, टिळक त्यावेळी ‘लॉ क्लास’ही चालवत. १८९४ साली या वाड्यात टिळकांनी सार्वजनिक गणपती बसवला. त्या वेळी वाड्यातील पटांगणात मंडप घालून हा उत्सव साजरा होत असे. टिळक स्वतः गणपतीपुढे एखादे तरी व्याख्यान देत असत आणि नंतर इतरत्रही व्याख्यानाकरिता जात.


खरेतर गणेशोत्सवाची धामधूम सुरू होण्याच्या चार-पाच वर्षे आधी शाळा आणि महाविद्यालय हे लोकशिक्षणाचे आणि लोकजागरणाचे प्रभावी साधन टिळकांच्या हाती होते, ज्याच्यामार्फत टिळक किमान विद्यार्थी वर्गापर्यंत सहजपणे पोहोचू शकत होतो. १८९०च्या सुमारास त्यांनी सोसायटीचा राजीनामा दिला आणि पुढे लगेचच ‘गणेशोत्सव’ हे शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त समाजशिक्षणाचे प्रभावी केंद्र टिळकांच्या हाती लागले. इथे फक्त लहानच नाही, तर लहान-मोठा प्रत्येक जण एकत्र येणार होता. जनतेला स्वत्वाची ओळख करून देऊन द्यायची आणि तिला स्वराज्याभिमुख करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायचे, असे टिळकांच्या मनात होते. योग्य साधने हाती आली की त्याचा यथोचित उपयोग करण्यात टिळकांचा हातखंडा होताच. त्यामुळे गणेशोत्सवाचा चळवळीचा आपल्या प्रचारकार्याला मोठा उपयोग होणार, हे वेळीच हेरून टिळकांनी ही चळवळ तन-मन आणि धनानेसुद्धा पुरस्कारली.


टिळकांना आपल्या मनात असलेल्या अनेक योजना गणेशोत्सवाच्या निमित्ताने कार्यान्वित करून घ्यायच्या होत्या. म्हणून हळूहळू त्यांनी गणपती उत्सव पेटता ठेवला, तापवला. वर्तमान परिस्थितीचे पाठ खेड्यापाड्यातून या उत्सवाच्या निमित्ताने मिळत असत. १९०५ ते १९१०च्या काळात या उत्सवाने विराट रूप धारण केले. स्वदेशी आणि बहिष्कार याच्या जोडीला ‘स्वराज्या’चा नवा गुरुमंत्र मिळाला. कीर्तने, मेळे यांसारख्या मनोरंजनात्मक आणि धार्मिक समारंभासोबत विचारप्रवर्तन करणारी व्याख्याने जोमाने सुरू झाली. त्यामुळे ठिकठिकाणच्या व्याख्यात्यांना नवी स्फूर्ती मिळाली. वक्त्यांचे दौरे सुरू झाले, एकेका दिवसात पाच-पाच व्याख्याने एकेका वक्त्याला द्यावी लागू लागली. हल्लीच्या काळात माईक वगैरेची सोय असते, ठिकठिकाणी जाण्यासाठी गाड्या असतात. पण, आजपासून जवळपास शंभरहून जास्त काळापूर्वी यापैकी कुठलेही साधन हाताशी नव्हते. कधी बैलगाडी, टांगे, घोडे, तर कधी निव्वळ कधी पायपीट करत हे ज्ञानसत्र पुढे चालवावे लागे. हजारो लोक समोर असत, त्यांच्यापर्यंत आवाज जावा यासाठी प्रचंड बळ, शक्ती व्याख्यात्याच्या अंगी असावी लागे. वक्त्याला घसाफोड करावी लागे. यात व्याख्यान म्हणजे मनोरंजन नसून लोकांना राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञान सांगावे लागे. स्वदेशाच्या चिंताजनक परिस्थितीचे भान आणून द्यावे लागे. ही वक्त्यांसाठी एक प्रचंड तारेवरची कसरत होती. व्याख्यानात एखादा शब्द जरी इकडचा तिकडे गेला, ब्रिटिश सरकारच्या विरोधात काही बोलणे झाले, तर या सगळ्यावर देखरेख करण्यासाठी ब्रिटिशांनी आपले अधिकारी नेमून ठेवलेले असत. अशा नोंदी ब्रिटिश अधिकारी लगेच टिपून ठेवत, त्यांचा खडा पाहरा असूनही लोकांपर्यंत आपला विचार घेऊन जाणे. इतकेच नव्हे, तर विविध उदाहरणे देऊन तो त्यांच्या गळी उतरवणे ही सोपी बाब अजिबात नव्हती. उत्सवाची भट्टी पेटवून ठेवल्यावर ज्याला जे इष्ट असेल, त्याने ते धान्य यावर भाजून घ्यावे, अशी टिळकांची संग्राहक वृत्ती असल्याने चळवळ्या लोकांना यानिमित्ताने एक कामधेनू प्राप्त झाली.


गणेशोत्सव जसजसा लोकप्रिय झाला, तसतशी इंग्रज सरकारची दडपशाही वाढू लागली. टिळक जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या नावे घोषणा दिल्या जात. एक वेळ अशी आली की, ‘लोकमान्य टिळक महाराज की जय’ या घोषणेवर बंदी घालण्यात आली. ही बंदी सरकार किती बारकाईने पाळत आहे, हे दाखवण्यासाठी लोकांवर खटले भरण्यात आले. केवळ ‘टिळक महाराज की जय’ असे म्हटले म्हणून तिघांना पुण्यात अटक करण्यात आली आणि ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. टिळकांची तसबीर मिरवणुकीत नेण्यासही बंदी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा जयजयकार बंद करण्यात आला.


गणेशोत्सवात ‘स्पृश्य-अस्पृश्य’ असा वाद पूर्वीपासूनच नव्हता. जरी कुठे असला तरी आता मात्र तो कायमचा नाहीसा झाला आणि अस्पृश्य वर्ग खुलेपणाने गणेशोत्सवात सहभागी होऊ लागला. काही मोठ्या रंजक नोंदी सापडतात. स्पृश्यवर्गाचे मेळे अस्पृश्यांच्या गणपतीपुढे आणि अस्पृश्यांचा मेळा स्पृश्यांच्या गणपतीपुढे, अशी देवघेव सुरू झाली. मिरवणुकीत तर सर्वच मेळे पूर्वीपासून समान हक्काने सामील होत असत. काही ठिकाणी अस्पृश्यांचा गणपती आघाडीला असे. (संदर्भ - गणेशोत्सवाची ६० वर्ष, पान ३०) किमान गणेशोत्सवाच्या काळात तरी अस्पृश्यांना सर्व सार्वजनिक व्यवहारात खुलेपणाने भाग घेता येऊ लागला. कित्येक ठिकाणी मुसलमान वक्ते गणपती उत्सवात सहभागी होण्यासाठी पुढे आले. ‘टिळक आणि समाजसुधारणा’ या प्रकरणात याविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोतच.


नोकरशाहीवर टीका करण्याकडे वाटचाल करत ‘ब्युरॉक्रसी’ला पर्यायी शब्द टिळकांनी शोधला आणि औद्योगिक, सामाजिक, राजकीय सुधारणा घडवून या सगळ्याचा एकत्र मेळ घालून स्वराज्याकडे म्हणजेच सध्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. १८९३ सालची औद्योगिक हीनता, सामाजिक विस्कळीतपणा आणि राजकीय हक्कांबद्दल आपल्या लोकांमध्ये असलेली प्रचंड अनास्था यांच्याशी तुलना करून पाहता, १९२० सालापर्यंत २८ वर्षांमध्ये मोठी क्रांतिकारी प्रगती झाल्याचे जाणवते. सुरुवातीच्या काळात म्हणजचे १८९०च्या अखेरीस जिथे एखादे स्वदेशी वस्तुभांडार आढळण्याची मारामार तिथे १९२० पर्यंत गावोगावी स्वदेशी वस्तुभांडारे भरभरून वाहू लागली. हिंदू-मुसलमानांच्या दंग्याचे नावही कानावर येईनासे झाले.


लोकमान्यांच्या पुढाकारामुळे या उत्सवाचा त्वरित सर्वत्र प्रसार झाला आणि लोकमान्यांच्याच हयातीत हा उत्सव स्वातंत्र्याच्या चळवळीचे हुकमी साधन ठरले. कदाचित टिळकांनी यात लक्ष घातले नसते, याला स्वराज्याभिमुख केले नसते, तर हा उत्सव इतर हिंदू सणांप्रमाणे केवळ पूजाअर्चा करणारा एक सण बनला असता. ब्रिटिशांचे लक्ष या उत्सवाकडे गेलेच नसते. ज्या अर्थी मातब्बर ब्रिटिश अधिकारी टिळकांच्या गणेशोत्सवाबद्दल लिहून ठेवतात, त्या अर्थी नक्कीच हा उत्सव पूजाअर्चा, व्रत, उपवास याच्या फार पलीकडे टिळकांनी नेऊन ठेवला होता आणि हेच त्यांचे यश होते. ‘केसरी’तील निवडक नोंदी याचा मुख्य आधार आहेत. टिळकांनी सुरुवातीच्या काळात या उत्सवाबद्दल जेव्हा लिहिले, तेव्हाच्या ‘केसरी’तील अग्रलेखांकडे एकदा नजर टाकली तर टिळक किती धोरणी होते याची खात्री पटते. गणेशोत्सवाबद्दल १८९४ म्हणजेच अगदी सुरुवातीच्या वर्षात टिळकांनी ‘केसरी’त लिहिले. त्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘गणपती उत्सव.’ या अग्रलेखात नव्याने सार्वजनिकरित्या सुरू झालेल्या उत्सवाची तारिफ करून टिळक या नव्या उत्सवाबद्दल कौतुकाने लिहितात. त्या पुढच्या वर्षी म्हणजेच, १८९५च्या गणेशोत्सवावरील अग्रलेखाचे शीर्षक आहे ‘यंदाचा गणपत्युत्सव.’ ज्यात गणपतीच्या दहा दिवसांत घडलेल्या बारीकसारीक गोष्टीचा परामर्श घ्यायला टिळक विसरत नाहीत. सुरू झालेला नवा उत्सव एकाच जातिपुरता मर्यादित न राहता, भेदाभेद विसरून समग्र समाजाने एकत्र येण्यासाठी कसा फायद्याचा आहे, क्षुल्लक मतभेद विसरून एकत्र येण्यास अनुकूलता मिळावी यासाठी विशेष प्रयत्न टिळकांच्या लेखणीने या अग्रलेखातून केलेले दिसतात. आणि एकदा का हे भेदाभेद बाजूला सरले की मग सगळ्यांनी मिळून एकत्र यायचे आणि आपल्यावरील सगळ्यात मोठ्या संकटाला तोंड द्यायला सिद्ध व्हायचे असे टिळक सांगतात.


तत्कालीन समाजस्थितीत सर्वात मोठे संकट म्हणजे परचक्र. गणेशोत्सव जरी पुण्यात सुरू झाला असला तरी हे परचक्र केवळ पुणे किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर ते अवघा देश व्यापून बसले होते. त्यामुळे आता देशावरील मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी गणपतीचा दहा दिवसांचा उत्सव याहून दुसरे हुकमी साधन कुठले असणार? म्हणूनच अवघ्या दोनच वर्षांमध्ये म्हणजेच १८९६ तील टिळकांनी गणेशोत्सवासंदर्भात लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होतेगजाननाचा राष्ट्रीय उत्सव!’ यातला ‘राष्ट्रीय’ हा शब्द फार फार महत्त्वाचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा टिळकांनी ‘राष्ट्रीय’ पातळीवर नेला, त्याला राष्ट्रीय चळवळीचे अधिष्ठान मिळवून दिले म्हणून तो वाढला, अधिक लोकप्रिय झाला. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ वेगाने पुढे गेली. सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले ते टिळकांनीच!

 

देशाच्या कानाकोपर्‍यांत, अगदी तळागाळात पोहोचलेला टिळकांचा राष्ट्रीय गणेशोत्सव नेमका होता कसा...? बघूया.....!

(क्रमशः)

-पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@