अर्थमंत्री निर्मला सीतारामन ठरल्या जगातील ‘पॉवरफुल वुमेन’

    13-Dec-2019
Total Views |


nirmala_1  H x


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात पॉवरफुल वूमेनच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल अव्वल स्थानी असून सीतारामन यांना ३४ वे स्थान देण्यात आले आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेला संबोधले जाते. दुसऱ्यांदा स्थापित झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात भारताच्या अर्थखात्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविण्यात आली. त्याआधी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. सीतारामन यांच्या याच कार्याची फोर्ब्सने दखल घेतली आहे. त्यांचा जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला.



मूळच्या मदुराईच्या असणाऱ्या सीतारामन यांची जेएनयूतील डॉक्टरेट भारत व युरोप यांच्यातील व्यापारसंबंधांवर आहे. त्या पूर्वीपासून भाजपसमर्थक असल्या तरी पक्षात औपचारिकरित्या २००८मध्ये आल्या. मोदी सरकार १ मध्ये पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परतल्यानंतर त्यांच्या संरक्षणखात्याचा भर सोपविण्यात आला. राफेलवरून
‘चौकीदार चोर है’ असे विशेषण चिकटलेल्या मोदींचा लोकसभेत कणखर बचाव करणाऱ्या निर्मला सीतारामन यांना ऐकता-पाहताना एक महिला प्रवक्त्या ते संरक्षणमंत्री हा त्यांचा चार वर्षांतील नाट्यमय प्रवास संपूर्ण देशाने मनोमन अनुभवला आहे. सध्याच्या देशातील अर्थव्यवस्थेचा भारही त्या अतिशय जोमाने पेलताना दिसतात. पंतप्रधान मोदींच्या भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी त्यांचे योगदान व देशाची अर्थव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी सक्षमरित्या पेलणाऱ्या या महिलेला फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत नेऊन बसवले आहे.