जलरंगातील ‘सुदीप’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019
Total Views |

1_1  H x W: 0 x


जहांगिर कलादालनात, एका बंगाली अवलियाने जलरंगातील किमयागारी प्रदर्शित केली आहे. निसर्गचित्रकार सुदीप रॉय यांनी त्यांच्या कुंचल्याची करामत दाखविली आहे. मदतीला कोलकात्याचे दैनंदिन जीवन, भारतीय विशेषतः बंगाली संस्कृती...!!


१९८० साली कोलकात्याच्या शासकीय कॉलेज ऑफ आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट या कला महाविद्यालयातून त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केले आहे
. ‘वॉटर-कलर‘ हे माध्यम त्यांनी फारच तन्मयतेने आणि आनंदपूर्ण जगलेले जाणवते. अगदी कितीही मोठा ‘पॅच’ वा ‘फ्लो’ आणि त्या त्या कागदाचा पोत सुदीप रॉय यांच्या कुंचल्याने पावनच होतो, हे त्यांचं प्रत्येक काम पाहताना ध्यानी येतं. ‘अ सिटी ऑफ जॉय’ हे ३० X २२ आकारातील जलंरगचित्र पाहिल्यावर त्या ऐतिहासिक वास्तूचा कोपरा न् कोपरा अत्यंत सुव्यवस्थित, परंतु अत्यंत सरावपूर्ण रंगफ्लोद्वारा ‘रंगमान’ झालेले एक दृश्य आणि ‘वारासणी’ या मथळ्याचे केवळ २० X १५ या आकारातील त्यांचेच जलरंगचित्र हे अत्यंत प्रभावी फ्लो, कागदाचा पोत आणि चित्रविषय म्हणून होड्या, या तीन घटकांतील हे चित्र अगदीच भिन्न शैलीत चितारलेले आहेत. या दोन शैलीतील चित्ररंग पाहिल्यावर सुदीप रॉय यांची जलरंग लेपनावरील हुकूमत ध्यानी येते.


बानलता
(Banlata) या जलरंगातील स्त्रीचं नैसर्गिक रूप त्यांनी रंगविताना, जलरंगावरील फ्लोचं थक्क करणारं अवतरण हे चित्रकाराचा अनुभव ध्यानी यावा, एवढं दर्जेदार आहे. चारुलता हेही त्याच धाटणीतील चित्र. कुठेही उथळ वा उत्तानपणा नाही. स्त्री सौंदर्याचा उपमर्द होणार नाही, इतकी संवेदनेने घेतलेली काळजी, त्यांच्या या सार्‍या कलाकृती पाहताना ध्यानी येते.


‘द क्लॉक’, ‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘मुंबई‘, ‘द बिल्डिंग‘ ही चित्रे पाहताना बंगाली चित्रकाराला मायानगरी मुंबापुरीनेदेखील भुरळ घातलेली दिसते. ती ऐतिहासिक वा पुरातन वास्तूंची जलरंगचित्रणे आहेत. त्यातील बारकावे, आराखडे, वास्तुरचना इ. घटक म्हणजे सुदीप यांनी सोनं केलेले चित्रविषय ठरतात. एखादा इंटरेस्टिंग विषय झूम करून त्यांनी अधिक विस्ताराने आणि बारकाव्यांच्या निरीक्षणाने सिद्ध केलेला आहे.


जलरंगांतील इतक्या समर्थ सामर्थ्याचं काम फारच अभावाने पाहायला मिळते
. दि. १० ते १६ डिसेंबर या सप्ताहातील ‘द मिस्ट्री विदीन द रियल’ या मथळ्याखालील चित्रकार सुदीप रॉय यांचं प्रदर्शन म्हणजे खर्‍या कलारसिकांसाठी पर्वणीच ठरेल.



2_1  H x W: 0 x


क्रोनिंग ग्लोरी

मुंबईच्या सर जे. जे. स्कूलचे अधिव्याख्याता मारुती शेळके यांचेही ‘क्रोनिंग ग्लोरी’ नावाचे एक आगळ्याच, परंतु सर्व मानवजातीने अनुभवलेल्या विषयावरचे प्रदर्शन दि. ३ ते ९ डिसेंबर या सप्ताहात संपन्न झाले. प्रसूतीपूर्व मातेला येणार्‍या कळा या त्रास जरी देणार्‍या असल्या तरी त्यांच्यानंतर मिळणारा आनंद हा शब्दातीत असतो. मारुती शेळके यांनी कौटुंबिक व्यथा नव्हे, तर कुटुंबातील अडीअडचणी आणि त्यातून निघणारा वा काढला जाणारा मार्ग यावर त्यांच्या कलाकृती चितारलेल्या आहेत. कला हा रंग म्हणून किती महत्त्वाचा आहे, हेच त्यांच्या कलाकृती पाहताना दिसून येते. पती-पत्नी, स्त्री-पुरुष, पिता-पुत्री, पिता-पुत्र, माता-पुत्र/पुत्री अशी नाती किती घट्ट असतात, हे त्यांनी त्यांच्या चित्रविषयातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.


-  प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@