बोगनव्हिल... नवे राष्ट्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019   
Total Views |

japa_1  H x W:



पापुआ न्यू गिनिया हा ८.७८ दशलक्ष लोकसंख्या असलेला देश. इथली बहुसंख्य लोकसंख्या निसर्गाशी तादात्म्य साधणारी असून त्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण आहे साधारण ३४ टक्के. जे श्रद्धाळू आहेत, निसर्गाची पूजा करतात, ते ना ख्रिश्चन आहेत ना मुस्लीम, तर ते तिथले आद्य रहिवासी आहेत. इथे २२ टक्के लोक रोमन कॅथलिक आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने रोमन कॅथलिकांची संख्या २२ टक्के म्हणजे दुसर्‍या क्रमांकाची असली तरी या देशावर ख्रिश्चन धर्माचाच पगडा आहे.


दक्षिण पश्चिम प्रशांत महासागरातील द्वीपसमूहाचा हा देश तसा आशियाई संस्कृतीशी साधर्म्य सांगणारा. हा देश जगाच्या दृष्टिपथात आला तो सोळाव्या शतकात. त्यानंतर या देशाचे मूळ रूप पार पालटले. पोर्तुगीज, स्पॅनिश, ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियाच्याही भूहव्यासापोटी या द्वीपसमूहाने बरेच सोसले. इतके की, आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्यासाठी हे लोक अक्षरशः दुर्गम भागातच राहू लागले. पुढे ऑस्ट्रेलियाने या द्वीपसमूहावर कब्जा केला. त्यानंतर येथील जनजीवन बदललेच. पण, १९७५ साली हे द्वीप स्वतंत्र झाले. आजही त्या देशात तब्बल ८५० भाषा अस्तित्वात आहेत. त्या भाषा द्वीपसमूहाच्या मातीशी नाते सांगणार्‍या आहेत. त्यानंतर देशाने ऑस्ट्रेलियन संस्कृतीचा जबरदस्तीने बसलेला ठसा पुसण्यासाठीही भरपूर प्रयत्न केले.


हा देश जगाच्या पाठीवर स्कुबा डायव्हिंगसाठी तसा प्रसिद्ध. पण, त्याचबरोबर हिंसा, हल्ले, लूटमार यासाठीही धोकादायक म्हणून या देशाला ओळखले जाते. मात्र, चीन आणि ऑस्ट्रेलियाने मदतीसाठी या देशाला भरपूर कर्ज दिले. अर्थात, ऑस्ट्रेलियाच्या मनातला साम्राज्यवाद अजूनही मेलेला नाही तर चीनला साम्राज्यवादाचा आजारच आहे. त्यामुळे मदतीच्या ओझ्याखाली दाबून या छोट्या देशाला गिळंकृत करण्यासाठी चीन टपून बसलेला आहेच. प्रशांत महासागरातल्या द्वीपसमूहावरून आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पुढे अमेरिका-आफ्रिका खंडांवरही नजर ठेवणे सोपेच, असा हिशोब चीनने लावलाच असेल. त्यामुळे चीनने या देशाला भरपूर कर्ज देऊ केले आणि त्या कर्जाचे व्याजदरही वाढवत नेले.


पण, आता या चिमुकल्या देशासमोर आणखी एक आव्हान उभे ठाकले आहे. हे आव्हान तसे अचानक उद्भवलेले नाही. या देशामध्ये बोगनव्हिल नावाचा भाग आहे. तांब्याच्या खाणीसाठी आणि इतर नैसर्गिक साधनसामुग्रीसाठी हा भाग या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा. इतका की, पापुआ न्यू गिनियाचा आर्थिक डोलारा या खाणीवर बहुतांशी तरलेला. मात्र, येथेही या अंतर्गत कलहाने डोके वर काढले. देशाला स्वातंत्र्य मिळाले १९७५ साली आणि साधारण ८०च्या दशकात बोगनव्हिल भागातील नागरिकांनी सरकार विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांचे म्हणणे हेच की, आमच्या भूभागातल्या साधनसमुग्रीवर देश संपन्न आहे. मात्र, त्या संपन्नतेचा फायदा बोगनव्हिल प्रांताला होत नाही. हा बोगनव्हिलच्या जनतेवर अन्याय आहे. इथल्या जनतेने या विरोधात मोठे आंदोलन छेडले. संपूर्ण देशच या आंदोलनात होरपळून निघाला. त्यानंतर पापुआ न्यू गिनियाच्या सरकारने तोडगा म्हणून या खाणीच बंद केल्या. त्यामुळे देशात तात्पुरती वरवरची शांतता नांदली. मात्र, बोगनव्हिल आतल्या आत धुमसतच होते.


अर्थात, धूर्त चीनने यात पुढाकार घेतलाच असेल. या आंदोलनात २० हजारांवर नागरिक मारले गेले. दोन दशके हे आंदोलन धुमसतच होते. त्याची परिणती अशी झाली की, बोगनव्हिलने मागणी केली, “आम्हाला वेगळे राष्ट्र घोषित करा.” सततच्या घरभेदी कारवायांना कंटाळून शेवटी पापुआ न्यू गिनिया देशानेही या मागणीला दुजोरा दिला. बोगनव्हिलला स्वतंत्र राष्ट्र हवे यासाठी समर्थनार्थ आणि विरोधार्थ मतदान घेतले जाणार, असे ठरले. आता नुकतेच हे मतदान पार पडले आणि बोगनव्हिलच्या जनतेने स्वतंत्र राष्ट्र व्हावे यासाठी ९८ टक्के मतदान केले आहे. जगाच्या नकाशावर आणखी एक नवे राष्ट्र लवकरच अस्तित्वात येणार आहे. मात्र, केवळ दोन लाख लोकसंख्या असलेला हा देश जागतिकीकरणातून कसा मार्ग काढेल, हेच पाहावे लागेल. कारण हेच की, चीनने आणि ऑस्ट्रेलियानेही या नवनिर्मित राष्ट्राकडे लक्ष देणार असल्याचे जाहीर केले आहे. हे लक्ष देणे म्हणजे काय, हे साम्राज्यशाहीचे चटके अनुभवलेल्या देशांना चांगलेच माहिती आहे. पापुआ न्यू गिनिया देश त्याला अपवाद नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बोगनव्हिल या निर्माण होणार्‍या नवराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@