विचारवंतांची भोंदूगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vv_1  H x W: 0


आर्यांचं मूळस्थान मानलं गेलेल्या पश्चिम आशियाई नागरिकांचे जीन्स या दोघांपेक्षा भिन्न आहेत. तेव्हा आर्यांनी आक्रमण तर केलेलंच नाही; पण त्यांनी स्थलांतर केलं, असे म्हणणेसुद्धा अशास्त्रीय आहे, असे कॅलिफोर्निया अभ्यासक्रम समितीच्या प्रमुखांनी विट्झेल आणि थापर यांना सांगितलं. यावर त्या दोघांनाही काहीच बोलता आलं नाही.


काही काळापूर्वी मुरली मनोहर जोशी हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असताना त्यांनी शिक्षणाचं भगवीकरण केल्याचा जोरदार आरोप करून काँग्रेसवाले आणि त्यांचे डावे विचारवंत चमचे यांनी केवढा गदारोळ उसळून दिला होता. अमेरिकेत मात्र शिक्षणाचं भगवीकरण चालू झालं आहे. तेसुद्धा तिथल्या शिक्षण अभ्यासक्रम आयुक्तांच्या परवानगीने; किंबहुना आग्रहाने. आर्य नावाच्या गोर्‍या रंगाच्या, उंच शरीरबांध्याच्या लोकांनी वायव्येकडून भारतावर आक्रमण केलं; हा ब्रह्मवाक्याइतकाच खरा सिद्धांत त्या अमेरिकन शिक्षण आयुक्ताने सरळ पाठ्यपुस्तकातून काढूनच की हो टाकला. हाय, हाय! उष:काल होता होता काळरात्र झाली! फ्रेडरिक मॅक्समुल्लरपासून लक्ष्मणशास्त्री जोशींपर्यंतच्या सगळ्या महान विद्वानांचे आत्मे तळमळत असतील.


हा सगळा घटनाक्रम कॅलिफोर्नियात सुरू झाला. अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या पश्चिम किनारपट्टीवर कॅलिफोर्निया हा प्रांत आहे. हा प्रांत मोठा निसर्गसमृद्ध आहे. भारतीय स्थलांतरित तिथे खूपच मोठ्या प्रमाणावर आहेत आणि भारतीय म्हणजे हिंदू. अमेरिकेत भारतीय हिंदू वा मुसलमान, पाकिस्तानी, बांगलादेशी या सगळ्यांना उद्देशून ‘एशियन्स’ असा शब्द वापरला जातो. कॅलिफोर्नियात किंवा एकंदरच अमेरिकेत आता हिंदू स्थलांतरितांची संख्या एवढी मोठी झाली आहे की, आम्हाला ‘एशियन्स’ न म्हणता ‘हिंदू अमेरिकन’ म्हणावं, अशी त्यांची मागणी आहे. हिंदूंप्रमाणेच कॅलिफोर्नियात चिनी, जपानी, कोरियन्स अशा स्थलांतरितांची संख्याही मोठी आहे.


आता एवढ्या विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या देशातल्या इतिहासाचा, संस्कृतीचा, धर्माचा परिचय व्हावा आणि त्याचबरोबर अमेरिकेचा धर्म जो प्रोटेस्टंट ख्रिश्चानिटी त्याचाही परिचय व्हावा, असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कॅलिफोर्निया राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने आपली पुस्तकं रचली. तिथल्या नियमाप्रमाणे या पुस्तकांच्या नमुनाप्रती छापण्यात आल्या आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं की, कुणाला याबाबत काही दुरुस्ती सुचवायची असेल तर, अमुक मुदतीच्या आत ती कळवावी.


कॅलिफोर्नियातले हिंदू चांगले जागृत आहेत. (हिंदू जागृत आहेत, हे वाक्य विरोधाभासाने किती ठासून भरलेलं आहे नाही का? माझ्या तर अगदी अंगावर रोमांच उभे राहिले.) त्यांनी पुस्तकांचा नीट अभ्यास करून चक्क १७० दुरुस्त्या सुचवल्या. त्यांचा मुख्य आक्षेप या मुद्द्यांना होता- ‘हिंदू हे देवतांची नव्हे, तर पुतळ्यांची पूजा करतात. ज्यू, इस्लाम आणि ख्रिश्चानिटी हे एकाच देवाला मानतात. त्यामुळे त्यांच्या ‘गॉड’ चा उल्लेख करताना ‘जी’ हे अक्षर कॅपिटल लिहावं. पण, हिंदूंचे अनेक देव असल्यामुळे त्यांचा उल्लेख करताना ‘जी’ अक्षर स्मॉल लिपीत लिहावं. रामायण हे महाभारताच्या अगोदर लिहिलं गेलं की नंतर, याची पर्वा करण्याचं कारण नाही. आर्यवंशीय लोकांनी भारतावर आक्रमण केलं.’


वरील मुद्द्यांसह १७० दुरुस्त्या कॅलिफोर्नियातल्या हिंदूंनी सुचवल्या. साहजिकच कॅलिफोर्निया पाठ्यपुस्तक मंडळाने किंबहुना राज्याच्या शिक्षण खात्याने त्याबाबत शहानिशा सुरू केली. ही बातमी समजल्यावर आपल्याकडच्या सेक्युलर मंडळींची घाबरगुंडी उडाली. कारण स्पष्टच आहे. शिक्षण खात्याने म्हणजे अमेरिकन शिक्षण खात्याने शहानिशा सुरू केली की, ते त्यांच्या शिस्तबद्ध पद्धतीने समूळ शहानिशा करून सत्य जाणून घेणार आणि सत्य हे हिंदूंनाच अनुकूल असणार. तेव्हा काहीतरी केलंच पाहिजे. मग रोमिला थापर बाई धावत कॅलिफोर्नियाला गेल्या आणि त्यांनी आपल्याचसारख्या आणखी काही निधर्मी विचारवंतांचा एक गट जमा करून डॉ. मायकेल विट्झेल यांना गाठलं. मग डॉ. विट्झेल यांच्या म्होरकेपणाने त्यांनी कॅलिफोर्निया राज्य शिक्षण खात्याकडे तक्रार नोंदवली की,“हिंदूंनी सुचवलेल्या दुरुस्त्या जर तुम्ही मान्य केल्यात तर त्याचा अर्थ तुम्ही ‘हिंदुत्व फोर्सेस’च्या हातातलं खेळणं बनलेले आहात असा होईल आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शैक्षणिक लफडं होईल.”


डॉ. मायकेल विट्झेल हे फार मोठे विद्वान म्हणून प्रसिद्ध आहेत असं नव्हे. पण, ते हार्वर्ड या प्रख्यात विद्यापीठात प्राध्यापक आहेत. इंटरनेटवर ते बरंच लिखाण करीत असतात. त्यातून त्यांच्या विद्वत्तेपेक्षा भारतद्वेष आणि हिंदूद्वेषच प्रकर्षाने दिसून येतो. रोमिला थापर या दिल्लीनिवासी ख्यातनाम विदुषी आहेत. त्या साम्यवादी आहेत. इंग्रजीत लिहू-बोलू शकतात. भारताच्या इतिहासावर त्यांनी बरंच लेखन इंग्रजीत केलेलं आहे आणि त्यातून त्यांचा अभ्यास बर्‍यापैकी जाणवतो. अलीकडे वयोमानानुसार म्हणा किंवा नव्या संशोधनाच्या रेट्यामुळे म्हणा; रोमिलाबाई इतपत मान्य करतात की, “आम्ही आजवर म्हणत आलो त्याप्रमाणे आर्य लोकांनी भारतावर आक्रमण केलेलं नाही.” परंतु, आर्य नावाचा वेगळा वंशच नव्हता, हे संपूर्ण सत्यही त्यांना एकदम मान्य करवत नाही. म्हणून त्या आता म्हणतात की, “आर्यांनी भारतावर आक्रमण केलेलं नाही; पण आर्य नावाच्या गोर्‍या, उंच शरीर ठेवणीच्या लोकांनी घोड्यावर बसून भारतात स्थलांतर केलं.” हरकत नाही. देर आये, (आधे) दुरुस्त आये!


तर अशा सर्व गुणांनी मंडित रोमिलाबाई थापर कॅलिफोर्नियाला गेल्या किंवा त्यांना पाठवण्यात आलं, असं म्हणू या. त्यांनाच या कामासाठी निवडण्यात आलं. कारण, इरफान हबीब, आपले कुमार केतकर वगैरे स्वयंघोषित विचारवंतांपेक्षा त्यांचा अभ्यास नक्कीच पक्का आहे. डॉ. मायकेल विट्झेल आणि रोमिला थापर यांच्या कंपूने वरीलप्रमाणे निवेदन दिल्यावर कॅलिफोर्निया शिक्षण खात्याने याबाबत निर्णय घेण्यासाठी एक त्रिसदस्य समिती बसवली. यातले एक सदस्य स्वतः डॉ. विट्झेल होते. त्यांनी अर्थातच पुन्हा एकदा ‘हिंदुत्व फोर्सेस’ वगैरे आपली मतं ठामपणे मांडली. इतर दोघे सदस्य खरोखरच अलिप्त आणि प्रामाणिक होते. बर्‍याच चर्चेनंतरही त्यांना याबाबत स्वत:चं ठाम असं मत बनवता येईना. तेव्हा त्यांनी शिक्षण खात्याला स्पष्टपणे तसं कळवलं.


आता पुन्हा वांधे आले. हा निर्णय करायचा कुणी? मग शिक्षण खात्याने कॅलिफोर्निया अभ्यासक्रम कमिशन या समितीकडे हे काम सोपवलं. या समितीने हिंदूंच्या दुरुस्ती सूचनांचा व डॉ. विट्झेलच्या विरोधी सूचनांचा कसून अभ्यास केला आणि अखेर हिंदूंच्या सर्व दुरुस्त्या मान्य करण्याचा निर्णय घेतला. हिंदू लोक वेगवेगळ्या ‘पुतळ्यांची’ नव्हे, तर वेगवेगळ्या देवतांची ‘मूर्ती’ या स्वरूपात पूजा करतात, असं आता म्हटलं जाईल. आर्य आक्रमणाचा सिद्धांत तर या समितीने साफ अमान्य केला. त्यावर डॉ. विट्झेल व रोमिला थापर यांनी सुचवलं की, आक्रमण नाही तर निदान स्थलांतर असं तरी म्हणावं. त्यावर समितीच्या प्रमुखांनी त्यांना डीएनए चाचणीचा अहवाल दाखवला. अलीकडेच टी. किविसील्ड या शास्त्रज्ञाने पश्चिम आशियाई लोक व भारतीय लोक यांच्या डीएनए चाचण्या केल्या. त्यातून या दोन्ही गटांचे जीन्स भिन्न असल्याचं आढळून आलं. आर्य लोक पश्चिम आशियातून भारतात आले. त्यामुळे उत्तर भारतीय लोक म्हणजे आर्य आणि दक्षिण भारतीय लोक म्हणजे द्रविड, असा सिद्धांत गेली १२५-१५० वर्षे मांडला जात आहे. परंतु, ही डीएनए चाचणी असं दाखवते की, कथित आर्य असणारे उत्तर भारतीय आणि कथित द्रविड असणारे दक्षिण भारतीय यांचे जीन्स एकच आहेत. आर्यांचं मूळस्थान मानलं गेलेल्या पश्चिम आशियाई नागरिकांचे जीन्स या दोघांपेक्षा भिन्न आहेत. तेव्हा आर्यांनी आक्रमण तर केलेलंच नाही; पण त्यांनी स्थलांतर केलं, असे म्हणणेसुद्धा अशास्त्रीय आहे, असे कॅलिफोर्निया अभ्यासक्रम समितीच्या प्रमुखांनी विट्झेल आणि थापर यांना सांगितलं. यावर त्या दोघांनाही काहीच बोलता आलं नाही. अखेर त्यांना असं आश्वासन देण्यात आलं की, “काही विद्वानांच्या मते, आर्य नावाच्या लोकांनी भारतावर आक्रमण केलं होतं, एवढं एक वाक्य पाठ्यपुस्तकांमध्ये ठेवण्यात येईल.”


कॅलिफोर्निया शिक्षण खात्याच्या या निर्णयाची भारतात डाव्या मंडळींकडून यथेच्छ निंदा, टवाळी केली जात आहे. अमेरिकन पाठ्यपुस्तकात आर्य आक्रमण किंवा आर्य स्थलांतर सिद्धांत अशास्त्रीय म्हणून बाद ठरवण्यात आला आहे. भारतीय पाठ्यपुस्तकांत मात्र तो अजूनही ब्रह्मवाक्याइतकाच सत्य आणि अपरिवर्तनीय आहे. कारण, भारतात शास्त्रीय वस्तुस्थिती म्हणजे सत्य नसून, चार स्वयंघोषित विचारवंत जे सांगतात, तेच सत्य असतं. सत्यमेव जयते!


या सगळ्यातून प्रत्येक हिंदुत्वप्रेमी व्यक्तीला काहीतरी व्यक्तिगत प्रेरणा घेता येईल. हिंदुत्वाबद्दल नुसतं प्रेम असून चालणार नाही. हिंदुत्वाचा वैचारिक, सैद्धांतिक अभ्यास आपण करायला हवा. ज्यांचा असा अभ्यास आहे, त्यांनी तो अभ्यास आपल्याला हिंदीत, इंग्रजीत लिहून-बोलून मांडता येईल, अशाप्रकारे वाढवायला हवा. आज आपली या कथित विचारवंतांकडून ‘हिंदुत्व फोर्सेस’ म्हणून हेटाळणी केली जात आहे; तर ज्ञानाच्या क्षेत्रात आपण आपली शक्ती इतकी वाढवली पाहिजे की, आम्ही नुसते ‘फोर्स’ नव्हे, तर प्रचंड ‘पॉवर’ आहोत, हे या मुखंडांच्या झणझणीतपणे प्रत्ययाला यायला हवे.

@@AUTHORINFO_V1@@