कर्नाटकातील सराईत वन्यजीव गुन्हेगार ठाणे वन विभागाच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |

tiger_1  H x W:


वन्यजीव गुन्ह्यांच्या साखळीवर ठाणे आणि बंगळुरू वन विभागाचा घाव


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कर्नाटक राज्यातील सराईत वन्यजीव गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यामध्ये ठाणे वन विभागाला यश मिळाले आहे. मंगळवारी मुंबईत वन्यजीवांची विक्री करण्यास आलेल्या या इसमाला वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच पक्षी आणि चार भारतीय स्टार प्रजातीची कासवे जप्त करण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आरोपीने दिलेली माहिती ठाणे वन विभागाने बंगळुरू वन विभागाला कळवल्यावर त्यांनी आरोपीच्या एका साथीदाराकडून घोरपड आणि रानपिंगळ्यासारख्या वन्यजीवांची सुटका केली आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातून वन्यजीव गुन्ह्यांच्या घटना उघड होण्याचे सत्र सुरू आहे. मंगळवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकामधून वन्यजीवांची विक्री करण्यासाठी कर्नाटकातून दाखल झालेल्या एका इसमाला अटक करण्यात आली. बंगळुरू येथील मोहम्मद खलील रियाज उर्फे जायद खान (वय २४) हा व्यक्ती काही वन्यजीवांसह 'कोइंबतूर-कुर्ला' या रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती. हा इसम ठाणे रेल्वे स्थानकात उतरणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठाणे स्थानकात 'कोइंबतूर-कुर्ला' रेल्वे आल्यानंतर 'एस-वन' डब्यातून या इसमाला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता पुठ्ठ्याच्या तीन खोक्यांमध्ये जाळीत बंदिस्त केलेले काही पक्षी आढळून आले. यामध्ये तीन ससाणे, एक घुबड आणि घारीचा समावेश होता. तर भारतीय स्टार प्रजातीची चार कासवे देखील यावेळी वनाधिकाऱ्यांना त्याच्याकडे आढळून आली.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

आरोपीकडून ताब्यात घेतलेली पक्षी हे 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत चौथ्या क्षेणीत संरक्षित आहेत. तसेच स्टार प्रजातीच्या भारतीय कासवांच्या खरेदी-विक्रीवर जागतिक बंदी आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहम्मद खलील रियाज उर्फे जायद खान हा कर्नाटक राज्यातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली. त्याच्यावर बंगळुरू येथे मगरीची पिल्ले पाळल्याबाबत गु्न्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी आरोपीला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला १८ डिसेंबरपर्यंत वन विभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीने बंगळुरू येथील त्याच्या साथीदारासंदर्भात दिलेली माहिती आम्ही बंगळुरू वन विभागाला कळवली. त्यानुसार तेथील अधिकाऱ्यांनी आरोपीच्या साथीदाराकडून तीन घोरपड, दोन सिल्व्हर बदक आणि तीन रानपिंगळे ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे वन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

 
  

ही कारवाई ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनसंरक्षक गिरजा देसाई पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार वनपाल, मनोज परदेशी, हेमंत कारंडे, कुडाळकर , वनरक्षक संदिप मोरे, प्रविण आव्हाड, जाधव , पाटील यांच्या पथकाने 'सेव्ह वाईल्डलाईफ' या प्राणिप्रेमी संस्थेच्या मदतीने केली.

@@AUTHORINFO_V1@@