आणीबाणीशी लढणारा आणखी एक योद्धा काळाच्या पडद्याआड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |


badade_1  H x W


संघ फक्त ठराविक लोकांचाच.... पण, संघ अमुक एक लोकांचा नाही. संघ शेतकर्‍यांचा कधी होता, असे प्रश्न विचारणाऱ्या मंडळींना उत्तमराव बडधे आणि त्यांचे बंधू यांचे जीवन हे एक कृतिशील उत्तर होते. बडधे घराण्याचे तिन्ही लेक संघसमर्पित जीवन जगले. आज उत्तमराव काळाच्या पडद्याआड गेले. पण, त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी आहे. उत्तमराव बडधे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!



कोपरगावजवळील रवंदा मलेगाव थडी हे छोटेसे गाव
. त्या गावातील एक वस्ती. एकत्र कुटुंब. तीन भाऊ, वहिनी, आई, लहान मुले-मुली. आणीबाणी घोषित होते आणि मोठा भाऊ ‘मिसा’ लागून बंदीवासात जातो. धाकटा भाऊ सत्याग्रहाचे नियोजन करतो. स्वतः सत्याग्रह करतो, पण सत्याग्रहाची शिक्षा संपली की, त्यालाही ‘मिसा’ लागू होतो आणि त्याचीही रवानगी बंदीवासात होते. मधल्या भावावर सर्व जबाबदारी असते. संक्रांतीच्या आसपासचा काळ असतो. सकाळीच हा हाडाचा शेतकरी शेतावर पोहोचतो. कोपरगावहून पोलीस गाडी घेऊन घरी पोहोचतात. निरागस मुलीला विचारतात,“पोरी, उत्तमराव तुझे दादा आहेत का? कुठे गेले?” ती भाबडेपणाने सांगून मोकळी होते, ‘’शेतावर गेले.” “आम्हाला दाखवते का कुठे ते?” ती लगबग करत पाहुणे आल्यासारखे शेतावर त्यांना घेऊन येते. उत्तमराव पोलिसांना बघताच समजून घेतात, पुढचा काय निरोप असणार? अपेक्षा असते त्याप्रमाणे पोलीस सांगतात, “उत्तमराव, तुमच्यावर वॉरंट आहे. तुम्हाला आमच्याबरोबर यावे लागेल. फार तर जाता जाता घरी जाऊन तुम्हाला आईला भेटायचे असेल किंवा काही कपडे घ्यायचे असतील तर आपण तसे जाऊ!”



उत्तमराव यांच्यासमोर सगळे चित्र उभे राहते
. घरी म्हातारी आई आधीच दोन्ही मुलांच्या बंदीवासाने त्रस्त. कसेबसे घर चालवण्याचे प्रयत्न उत्तमराव करत असतात. सगळी जबाबदारी उत्तमराव यांच्यावर. जर त्या माऊलीसमोर पोलीस आपल्याला घेऊन निघाले तर तिथेच तिच्या जीवाचे काही तरी होणार? या कल्पनेने ते क्षणभर कासावीस होतात. शेतावर असलेल्या थोड्याबहुत उभ्या पिकांकडे ते एकदा डोळे भरून बघतात. दोन्ही भाऊ परत कधी सुटणार माहीत नाही आणि आपणही तिकडेच निघालो. आहे ते पीक कोण सोंगणार? कोण बाजारात पोते नेणार? कसे होणार? पोलीस खुणा करत असतात आणि मग उत्तमराव मन घट्ट करतात, निश्चय करून पोलिसांना सांगतात, “मला घरी नेऊ नका. थेट पोलीस स्टेशनला जाऊ.” मुलीला सांगतात,“तुझ्या आईला सांग, माझे कपडे कोपरगावला पाठवून दे.” आणि आपल्या वयस्कर आईचे दर्शन न घेताच पोलिसांच्या स्वाधीन होतात.



नाशिक येथील कारावासात तीन सख्खे भाऊ
. वर्षभरात संपूर्ण शेती बेचिराख होते. प्रचंड आर्थिक संकटे उभी राहतात. काय गुन्हा होता त्यांचा? एकच गुन्हा होता तो म्हणजे ते स्वयंसेवक होते संघाचे. सगळे घर संघाचे. ज्यावेळेस साखरसम्राट कोपरगाव येथे आपल्या दहशतीने धुमाकूळ घालत होते, त्या वेळेस मोठे काशिनाथ, सूर्यभान पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते तर धाकटा भीमराव श्रीपती शास्त्री, बाबा भिडे आणि तात्या बापट यांच्याकडून दीक्षा घेऊन नुकताच कोपरगाव येथे वकील होऊन आला होता. धाकटा वकील होण्यासाठी काशिनाथ आणि उत्तमराव पोटाला चिमटा घेत त्याला शिकवत होते. पण, नियतीने वेगळेच ठरवले होते. मग त्या आणीबाणीच्या संघर्षात तिघांना स्थानबद्ध व्हावे लागले. पुढे कारावासातून बाहेर आल्यावर उत्तमरावांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. नाशिकच्या कारावासाने अनेकांची आयुष्ये बदलली. उत्तमरावदेखील बदलले. हभप झाले. त्यांनी कीर्तन-प्रवचनाचा मार्ग स्वीकारला. कारागृहामुळे निर्माण झालेली सांसारिक विरक्ती कदाचित त्यांना या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडली असेल. मोठ्या भावाचा आणि धाकट्या भावाचा मृत्यू डोळ्यासमोर बघितला. आपले राहते गाव, घर आणि शेती यापासून दूर व्हावे लागले. पण, जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा तेव्हा संघाला त्यांनी दूषणे दिली किंवा काही अपेक्षा व्यक्त केली, असे कधीच घडले नाही. ते आपल्या वारकरी जीवनात आनंदी आणि समाधानी राहिले.



आज ते अखेरच्या प्रवासाला निघून गेले
. ते आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात ध्येय ज्योत जागवून. सत्तेची ऊब, पदाची प्रतिष्ठा आणि व्यावसायिक फायदा यापैकी काही मिळणार नाही; किंबहुना कुचेष्टा, आर्थिक कोंडी आणि अपमान हेच मिळणार, हे माहीत असूनही सर्वश्रेष्ठ त्याग करणार्‍या बडधे परिवारासारखी असंख्य माणसे तीळ तीळ जळाली, तेव्हा आजही हिंदुत्वाची पहाट उगवलेली आपल्याला दिसत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणारे सावरकर बंधू आणि ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे बडधे बंधू यांच्या देशभक्तीचा पोत एकच! सगळी जातीय आणि वर्गीय कथने पराभूत व्हावी, असे जीवन त्या काळात ही मंडळी जगली म्हणून संघ आज समाजजीवनात प्रभाव निर्माण करू शकला.




- रवींद्र मुळे

(लेखक प्रांत संपर्क प्रमुख आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@