आता प्रतीक्षा निकालाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019   
Total Views |

britan_1  H x W


‘ब्रेक्झिट’च्या ‘ब्रेकअप’ मालिकेत ब्रिटनला पाच वर्षांत तिसर्‍या निवडणुकीला सामोरे जावे लागते आहे. नवे सरकार कोणाचे असणार, यासाठीचे मतदानही झाले. ब्रिटनसारख्या लोकशाहीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाची परिणती तीन निवडणुकांमध्ये झाली. हा लोकशाहीचा जीवंतपणा समजावा की निव्वळ राजकारण, असा प्रश्न पडतो. त्याचे कारण, सत्तारूढ असलेल्या सरकारने कायम ब्रिटनच्या युरोपियन युनियनसह होऊ घातलेल्या ‘ब्रेकअप’ प्रक्रियेलाच पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात आतापर्यंत दोनदा पंतप्रधान बदलले. तसेच या ‘ब्रेकअप’चा निर्णयही थेट जनमताच्या आधारेच घेण्यात आला होता. बोरिस जोन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया पुढे सरकत नाही असे लक्षात आल्यावर मध्यावधीचा इशारा दिला. प्रक्रिया पुढे सरकलीच नाही. युरोपियन युनियनसोबत झालेल्या करारानुसार मर्यादित वेळेत ही प्रक्रिया संपवायला हवी होती. गेले चार-पाच वर्षे ‘ब्रेक्झिट’च्या प्रश्नावरून हेलकावे खात असलेली ब्रिटनची नौका या निवडणुकीनंतर तरी स्थिती होणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.


ब्रिटनमध्ये साधारणतः चार ते पाच वर्षांमधून निवडणुका होतात
. १९२३ नंतर हिवाळ्यात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. ऐन थंडीत ब्रिटनच्या नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडावे लागते आहे. ५ अंश सेल्सिअस इडनबर्गमध्ये, तर लंडन आणि कार्डिफमध्ये अनुक्रमे ८ व ९ अंश सेल्सिअस तापमान आहे. मतदार उत्साह दाखवतात का, हादेखील विश्लेषणातील महत्त्वाचा बिंदू असेल. सध्याचे पंतप्रधान बोरिस जोन्सन आपल्या कुत्र्याला घेऊन मतदान करण्यासाठी गेले होते. निवडणुकीला सामोरे जात असताना जोन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’चा मुद्दा तातडीने निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे. पण, पुन्हा त्याचे रटाळ राजकारण केले जाणार नाही याची शाश्वती मात्र ते देऊ शकलेले नाहीत. इतक्या हिवाळ्यात होत असलेल्या या निवडणुकांसाठीही देशातील वातावरण मात्र रसरशीत आहे. त्यामुळे तेथील निवडणूक आयोगाला मात्र विशेष खबरदारी घ्यावी लागते आहे. 



मतदानप्रक्रियेदरम्यान एका नागरिकाला अटकही झाली. मतदान केंद्राजवळ एक संवेदनशील उपकरण घेऊन गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी मतदारांनी सेल्फी काढून टाकल्याचे समजते. मतदानाच्या बाबतीत गुप्तता बाळगा, असे आवाहन तेथील निवडणूक आयोगालाही वारंवार करावे लागत आहे. हे प्रकार लोकशाहीची गंगोत्री असलेल्या ब्रिटनची अधोगतीच म्हणावी लागेल. ‘प्रगल्भ लोकशाहीचे पालन करणारेहा शिक्का इंग्लंडवर मारण्यात आला आणि त्यांनी आजवर मोठ्या अभिमानाने तो मिरवलादेखील. अंदाज वर्तविण्याच्या कार्यक्रमांनाही ऊत आला आहेच. भारतात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतरहा प्रकार बंद झाला. इंग्लंडसारख्या लोकशाहीत आजही ‘पोल’द्वारे अंदाज वर्तविण्याची मुभा दिली जाते, याचे आश्चर्य वाटते.


एकूण ६५० उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. एका मतदाराने स्वतःच्या नऊ महिन्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन मतदान केले. मतदानानंतर जन्म झाल्यापासून दोन निवडणुका पाहिलेला कुत्रा, असा त्याचा फोटोही त्याने ट्विट केला. समाजमाध्यमात एक व्हिडिओ टाकून रातोरात पर्यावरणप्रेमी बनलेली ग्रेटा स्वतःच्या पर्यावरणप्रेमाचे प्रदर्शन मांडताना बाळबोधपण लपवू शकलेली नाही. संपूर्ण ब्रिटन हा ‘ब्रेक्झिट’ प्रश्नावर मतदान करताना तिने मात्र ‘व्होट फॉर प्लॅनेट’ असे अनाकलनीय ट्विट केले आहे. संबंध निवडणुकीत पर्यावरण किंवा जागतिक तापमानवाढ हा मुद्दा कुठेही नाही. सरकारने त्यावर कोणतेही धोरण आखण्याचा प्रश्न आता नाही. सगळी निवडणूक एकमेव मुद्द्याभोवती फिरते आहे. तोच सध्या ब्रिटनसाठी कळीचा मुद्दा आहे. मात्र, स्वतःची विनोदबुद्धी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या ‘पीजे मास्टर’ने अंतिम संस्कारासाठी उभे असतानाही अत्यंत ‘थुकरट’ विनोद करावा, असाच हा प्रकार झाला. ग्रेटाला ‘टाईम’चा ‘पर्सन ऑफ द इअर’ किताब मिळाल्याची बातमीही आली. त्यामुळे पर्यावरणशास्त्राच्या भवितव्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.


तूर्त ब्रिटनच्या या निवडणुकीतून काय समोर येणार याचीच उत्सुकता जगाला लागली आहे. बहुचर्चित ‘ब्रेक्झिट’चा प्रश्न अखेर निकालात निघणार का, आतातरी नव्याने निवडून येणारे लोकप्रतिनिधी यावर ठोस निर्णय करू शकणार का, अशा सर्वच प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे ती फक्त निकालाचीच!!

@@AUTHORINFO_V1@@