मनोहर पर्रिकरांच्या स्वप्नातील भारताची युद्धसिद्धता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019   
Total Views |

manohar_1  H x



मनोहर पर्रिकर गेल्यानंतरचा आजचा त्यांचा पहिलाच जन्मस्मरण दिन
. व्यक्ती जाते, परंतु तिची स्वप्ने शिल्लक राहतात. पर्रिकरांची बहुतांश राजकीय कारकिर्द गोव्यासारख्या एका छोट्या राज्यात गेली. असे असले तरी आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना अखिल भारतीय कीर्ती मिळाली होती. अत्यंत कसोटीच्या काळात संरक्षणमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्याभोवती विश्वासपूर्ण अपेक्षांचे वलयनिर्माण केले होते.


स्वच्छ, कार्यक्षम आणि आपल्या खात्याचा अभ्यास असलेला मंत्री अशी पर्रिकरांची वास्तवाच्या आधारावर उभी असलेली प्रतिमा निर्माण झाली होती. एक काळ असा होता की, भारत स्वत:चे तरी संरक्षण करू शकेल की नाही, याबद्दल विश्वास नव्हता. १९६२च्या युद्धातील पराभवाचा मोठा मानसिक परिणाम झालेला होता. १९६५च्या युद्धाने तो अंशत: भरून निघाला. १९७१च्या युद्धानंतर भारताकडे ‘दक्षिण आशियातील महासत्ता’ म्हणून पाहिले जाऊ लागले. मनोहर पर्रिकर जेव्हा संरक्षणमंत्री झाले, तेव्हा परिस्थिती आणखी बदललेली होती. जगभरात ज्या घटना घडत होत्या, त्यात भारताची भूमिका महत्त्वाची बनत होती. जपान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया यांसारखे देश भारताकडे आशेने पाहत होते. भारताची भूमिका केवळ ‘क्षेत्रिय महाशक्ती’ एवढी मर्यादित राहून चालणार नव्हती.

मनोहर पर्रिकर यांनी हे आव्हान पेलण्यासाठी प्रमुख तीन मार्गांनी प्रयत्न करायचे ठरविले. पहिला मार्ग म्हणजे सेनादलाची पुनर्रचना. त्यासाठी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व त्या समितीला पूर्ण स्वातंत्र्य दिले. संरक्षणदलासाठी खर्च होणार्‍या प्रत्येक रुपयांतून भारताची संरक्षण सिद्धता अधिकाधिक वाढली पाहिजे, या दृष्टीने या समितीने काम करावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. या समितीच्या कामकाजात ते व्यक्तिश: रस घेत. केवळ संरक्षक दलातच सुधारणा करून उपयोग नाही, तर संरक्षणाशी संबंधित अन्य संस्थांचीही पुनर्रचना केली पाहिजे, या सूचनेचेही त्यांनी स्वागत केले व त्यासंबंधीही अहवाल द्यायला सांगितला. केवळ आपण संरक्षणमंत्री असतानाच नव्हे, तर संरक्षण दलाच्या केलेल्या पुनर्रचनेचा पुढच्या सर्वांनाच लाभ मिळाला पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांचा दुसरा मार्ग हा संरक्षणदलाच्या आधुनिकीकरणासाठी जी साधनसामुग्री लागते, तिच्या खरेदी प्रक्रियेशी संबंधित होता. संरक्षणदलाची खरेदी प्रक्रिया ही नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेली असते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ए. के. अ‍ॅन्टोनी हे संरक्षणमंत्री होते. त्यांना या व्यवहारात आपली स्वच्छ प्रतिमा मलीन होईल, याची एवढी भीती वाटत होती की, त्यामुळे संरक्षणदलाची खरेदी प्रक्रियाच पूर्णपणे थंडावली होती. जगातल्या बहुतेक महत्त्वाच्या शस्त्र उत्पादकांना काळ्या यादीत टाकले गेले होते. मनोहर पर्रिकरांची प्रतिमाही अ‍ॅन्टोनी यांच्यासारखीच स्वच्छ असली तरी त्यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी निर्णय प्रक्रियाच अनिर्णीत अवस्थेत नेण्याऐवजी ती अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. खरेदी प्रक्रियेचे उद्दिष्ट जगातील उत्कृष्ट संरक्षण सामुग्री रास्त दरात मिळणे असे असले पाहिजे. जगातील महत्त्वाच्या शस्त्र उत्पादकांना काळ्या यादीत टाकून ते कसे साध्य होणार? त्यामुळे काही विशिष्ट मुद्द्यांच्या आधारावर या यादीचा पुनर्विचार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

या दोन मार्गांसोबत तिसरे महत्त्वाचे पाऊल त्यांनी उचलले ते म्हणजे संरक्षण संशोधन आणि उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या क्षेत्रात. संरक्षण उत्पादनाची जागतिक बाजारपेठ खूप मोठी आहे, पण एक खरेदीदार यापलीकडे भारताचे त्यात अस्तित्व नाही. अनेक छोट्या देशांनीही काही विशिष्ट उत्पादन क्षेत्रात प्रावीण्य मिळवून या बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. परंतु, संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताची प्रगती नगण्य आहे. याबाबतीतही पर्रिकर यांनी निश्चित धोरण आखून पावले टाकायला सुरुवात केली. परंतु, काही योग असे असतात की आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी जो किमान काळ लागतो, तोही त्यांना मिळाला नाही. गोव्यातील नाजूक राजकीय परिस्थितीमुळे त्यांना गोव्यात परत यावे लागले. त्यामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. असे असले तरी उरी येथील सर्जिकल स्ट्राईकने भारत- पाकिस्तान संबंधांचे स्वरूप बदलून गेले. दहशतवादी कारवायांमुळे आजवर बचावात्मक भूमिकेत असलेल्या भारताऐवजी पाकिस्तान बचावाच्या भूमिकेत गेला. बालाकोटने हाच मुद्दा अधिक अधोरेखित केला. ‘आपण काहीही करू व भारत ते खपवून घेईल,’ ही परिस्थिती आता राहिलेली नाही, हे पाकिस्तानच्या लक्षात आले.

जागतिक स्तरावर आज जे भारताचे महत्त्व वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर भविष्यकाळात आपल्या देशाच्या संरक्षणाबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय जबाबदार्‍याही स्वीकाराव्या लागणार आहेत. या दृष्टीने मनोहर पर्रिकरांच्या स्मरणार्थ ‘फिन्स’ या संस्थेने भारताचे विद्यमान लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत व ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. त्याचे महत्त्व लक्षात येते. आजवर असलेल्या जगाच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहेत. कम्युनिझमच्या वाढत्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या दक्षिण आशियायी देशांच्या संरक्षणासाठी स्थापन झालेल्या ‘सीटो‘ या संस्थेचे अस्तित्व संपले, याचं कारणासाठी युरोपमध्ये स्थापन झालेल्या ‘नाटो‘चे काय करावे, हे संस्थापक देशांनाच कळेनासे झाले आहे. आर्थिक कारणांमुळे अमेरिका आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदार्‍या कमी करत आहे, तर पुतीन यांच्या नेतृत्वाखालील रशिया व चीन अधिकाधिक विस्तारवादी होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला महत्त्वाची भूमिका बजावायची असेल, तर पर्रिकर यांनी ज्या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार केला, ते आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात.

महान व्यक्तिमत्त्वे शरीराने निघून गेली तरी आपली स्वप्ने मागे ठेवून जातात व ती स्वप्ने पुढच्या पिढ्यांना प्रेरक ठरतात. यासंदर्भात नुकत्याच प्रदर्शित झालेल्यापानिपतया चित्रपटातील एक प्रसंग बोलका आहे. पानिपतचे युद्ध टाळण्याकरिता अहमदशहा अब्दाली सदाशिवराव भाऊंच्या समोर एक प्रस्ताव ठेवतो. पंजाबपर्यंतच्या भागावर मराठ्यांचा ताबा असेल व त्यापुढच्या भागावर अब्दालीचा ताबा राहील. वास्तविक त्यावेळी मराठीसेनेची अवस्था खूप अडचणीची होती. त्यामुळे तूर्त हा प्रस्ताव स्वीकारावा, नंतर तो पाळलाच पाहिजे असे थोडेच आहे, असे काही जणांचे मत होते. ते मत बाजूला ठेवून सदाशिवराव भाऊ खंबीर भूमिका घेतात. अटकेपर्यंतचा भाग भारताचा आहे व त्यात तडजोड नाही, हे अब्दालीला स्पष्ट करतात. त्यांनी त्यावेळी तडजोड केली असती तर पानिपतचा पराभव टळला असता. पण, आज पानिपत ही पाकिस्तानची सीमा बनली असती. आजही अटकेपर्यंतच्या अखंड भारताचे स्वप्न कोट्यवधी हिंदूंच्या मनात जागे आहे, याचे कारण त्याकरिता लक्ष मराठी बांगडी पानिपतावर फुटली. पण, ते स्वप्न कायम होते म्हणून तो पराभव नंतर महादजी शिंदे यांनी धुवून काढला. एक जागतिक महासत्ता म्हणून येणार्‍या जबाबदार्‍यांचे पालन करण्याचे सामर्थ्य भारतीय लष्करी दलात यावे हे मनोहर पर्रिकरांचे स्वप्न होते. ते साकार करण्याची प्रेरणा ही व्याख्यानमाला देत राहील, असा विश्वास आहे. कारण, या संस्थेच्या प्रवर्तकांचेही स्वप्नही तेच आहे व ते पूर्ण करण्याची जिद्दही तेवढीच आहे.


 
manohar_1  H x

 

@@AUTHORINFO_V1@@