जगातील सर्वात युवा पंतप्रधान सना मारिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019   
Total Views |


asf_1  H x W: 0


फिनलँड या देशाच्या पंतप्रधानपदी नुकत्याच ३४ वर्षीय सना मारिन विराजमान झाल्या असून जगामधील त्या आजवरच्या सर्वात युवा पंतप्रधान ठरल्या आहेत.


तू खुद की खोज में निकल,

तू किस लिए हताश है !

तू चल तेरे वजूद की,

समय को भी तलाश है !

सध्या भारतातील वातावरण पाहता अमिताभ बच्चनच्या 'पिंक' या चित्रपटातील वरील कविता नक्कीच आठवते. महिला आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल अनेक वेळा बोलले गेले आहे. पण, तितकीच चर्चा त्यांच्या यशाची होताना दिसत नाही. भारतीय महिलांनीही आजतागायत अनेक उंच शिखरे सर केली आहेत. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपले नेतृत्व सिद्ध केले. महिलांना पुरुषांसारखी एकच जबाबदारी सांभाळायची नसते. कामाव्यतिरिक्त ती कधी आई असते, तर कधी पत्नीची भूमिका बजावते. कधी सासू-सासऱ्यांसाठी एक उत्तम सून होते, तर कधी आपल्या आईवडिलांसाठी मुलीची भूमिका बजावते. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून शहराचे, जिल्ह्याचे, राज्याचे तर कधी देशाचेदेखील प्रतिनिधित्व करते. देशच नाही तर जागतिक पातळीवरदेखील अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला विराजमान आहेत. कला, क्रीडा, समाजसेवा तसेच राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांची कामगिरी ही पुरुषांच्या समान मानली जातेच. राजकारणामध्ये सर्वोच्चपदी विराजमान असलेली अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. असेच एक नवीन उदाहरण ते म्हणजे फिनलंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सना मारिन. कर्तृत्व आणि बौद्धिकतेच्या बळावर त्यांनी पंतप्रधानाचे पद मिळवले आणि जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. परंतु, त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. अनेक वर्ष संघर्ष करत त्यांनी हे पद मिळवले आहे. जाणून घेऊया त्यांची पार्श्वभूमी.

 

सना मारिन यांचा जन्म १६ नोव्हेंबर, १९८५ रोजी हेलसिंकीमध्ये झाला. फिनलँडमधील हेलसिंकी महानगराचा भाग असलेल्या एस्पो आणि पिरकला या शहरांमध्ये त्यांचे बालपण गेले. सना यांनी वयाच्या १९व्या वर्षी २००४ मध्ये पिरकला हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. लहानपणी सना मारिन या भाड्याच्या घरात राहत होत्या. सना मारिन आणि त्यांच्या आई असे दोघींचेच कुटुंब. काही काळानंतर त्यांच्या आईचे एका महिलेसोबत समलैंगिक नाते होते. यामुळे त्यांना समाजात खूप अवहेलनेचा सामना करावा लागला. त्यांना आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि समाजामध्ये योग्य वागणूक मिळत नव्हती. यामुळे त्या मानसिक तणावातून जात होत्या. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यामुळे त्यांना जास्त सुखसोई नशिबी आल्या नाहीत. त्या काळात त्या नैराश्याने ग्रासलेल्या होत्या. अनेक गोष्टींबाबत त्यांनी मनात न्यूनगंड पाळले होते. अजूनही त्या कुटुंबाविषयी जास्त माहिती देण्यास नकार देतात. त्यांच्या आई विभक्त झाल्यानंतर सना या हेलसिंकीमधून पर्क या शहरात वास्तव्यास आल्या. दररोजच्या खर्चासाठी त्यांनी शिक्षण सांभाळून नोकरी करण्यास सुरुवात केली. १५ वर्षाच्या असताना त्यांनी पहिली नोकरी केली. त्यांनी तांपेरे शहरामध्ये एका बेकरी कंपनीमध्ये काम केले. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी मासिके वाटण्याचेदेखील काम केले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही वर्षं दुकानांमध्ये रोखपालाचे कामदेखील केले आहे. तांपेरे विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना विज्ञान विषयात शिक्षण घेत असताना सिटीयुथ ऑफिसमध्ये काम केले, तर बाकी वेळामध्ये त्यांनी सेल्समनचेदेखील काम केले आहे. त्यांच्या मते, बेरोजगार तरुणांना अस्थायी स्वरूपाचे काम मिळत राहिले पाहिजे. यामुळे त्यांचा स्वतःवर आणि समाजावरचा विश्वास दृढ होण्यास मदत होते. त्यांनी कधीच शैक्षणिक कर्ज काढले नाहीत. कारण, त्यांनी भीती होती की, ते कधी फेडू शकणार नाहीत. अशा खडतर परिस्थितीमध्येही त्यांनी धैर्य एकवटून स्वप्नाचा पाठलाग करणे सोडले नाही. पुढे फिनलंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या तांपेरे येथील विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

 

सना मारिन या अवघ्या २७व्या वर्षी तांपेरेच्या नगरपरिषदमध्ये निवडून आल्या आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला झळाळी मिळाली. इथून त्यांच्या वाटचालीला खरी सुरुवात झाली. वर्ष २०१३ ते २०१७ या काळात त्या नगरपरिषदेच्या अध्यक्षा राहिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा २०१७च्या निवडणुकांमध्ये त्या नगरपरिषदेवर निवडून आल्या. तसेच त्या तांपेरे प्रदेश विधानसभा परिषदेच्या सदस्या होत्या. २०१३ ते २०१६ दरम्यान त्या पिरकनामा प्रादेशिक परिषदेच्या सदस्यादेखील होत्या. २०१४ मध्ये सना यांची निवड सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या दुसऱ्या उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. वयाच्या ३०व्या वर्षी २०१५मध्ये त्या पिरकनामाच्या मतदारसंघातून खासदार म्हणून फिनलँडच्या संसदेत निवडून आल्या. त्यानंतर, ६ जून, २०१९ रोजी त्यांची परिवहन आणि दळणवळणमंत्री म्हणून निवड झाली. त्यानंतर २०१९च्या डिसेंबरमध्ये त्यांची निवड फिनलंडच्या पंतप्रधानपदी झाली आणि जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या. अवघ्या ३४व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम केला आहे. त्यांच्या या प्रवासातील संघर्षाचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. सना मारिन यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@