गोदाघाटचा देवमासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019   
Total Views |

fish_1  H x W:



नैसर्गिक संपदेने समृद्ध आणि मानवी जीवनातील निर्मितीस्थळ असणार्‍या नद्या या आज संकटांचा सामना करताना दिसतात. त्याला कारण म्हणजे, मानवामार्फत नदीपात्रात होणारे वारेमाप प्रदूषण. या प्रदूषित घटकांमध्ये सर्वाधिक वाटा असतो तो प्लास्टिकचा. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, नदीपात्रात तर प्लास्टिक टाकूच नये. आपली जीवनवाहिनी असलेली नदी स्वच्छ, सुंदर आणि नितळ अशीच असावी यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असा संदेश घेऊन नाशिकच्या गोदाघाटावर चक्क देवमासा अवतरला आहे. पावसाळ्यात नदी, नाल्यांमध्ये प्लास्टिक अडकते, तर समुद्र किनारीदेखील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचर्‍यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात येते. प्लास्टिकचा वापर कमी करीत जलचर प्राणी सुरक्षित राहावे, असा संदेश देण्यासाठी गोदाघाटावर प्लास्टिकचा देवमासा साकारण्यात आला आहे. येथील ‘मानव उत्थान मंचाच्यावतीने शनिवारपर्यंत या देवमाशाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ‘मानव उत्थान मंचा’च्यावतीने गोदाघाटावर प्रतिवर्षी प्लास्टिकचा भस्मासूर साकारण्यात येतो. मात्र, यंदा तब्बल ५० फूट लांबीचा मोठा देवमासा साकारण्यात आला आहे. ‘मानव उत्थान मंच’ व शहरातील व्ही. एन. एन. नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा देवमासा तयार करण्यात आला आहे. गोदाघाटावरील चक्रधर स्वामी पटांगणात हा देवमासा ठेवण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे समुद्रातील जीवजंतूंचे जीवन धोक्यात आले आहे. यासाठी प्लास्टिक मानवी जीवनातून हद्दपार व्हायला हवे, असा संदेश याद्वारे देण्यात येत आहे. बारमाही प्रवाही असणारी गोदावरी नदी जरी विविध कारणास्तव प्रदूषित होत असली तरी, त्यात एक कारण हे नदीपात्रात असणारे प्लास्टिकसुद्धा आहे. हे प्लास्टिक येथे येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यामार्फतच नदीपात्रात कळत नकळत प्रविष्ट होत असते. त्यामुळे गोदावरीचा श्वास गुदमरु नये, यासाठी गोदावरी व तिचा काठ हा प्लास्टिकमुक्त होणेदेखील आवश्यक आहेच. त्यासाठी देवमाशाचा संदेश किती फळाला येतो, हे आता येणारा काळच सांगेल.


अब दिल्ली दूर नहीं...

नाशिक शहर म्हणजे स्वच्छ हवेचे, थंड हवेचे ठिकाण. शहरात जरी औद्योगिकीकारणाने विस्तार केला असला तरी, काही वर्षांपर्यंत नाशिकच्या हवेतील शुद्धता टिकून होती. कोणत्याही शहराची हवा शुद्ध ठेवण्याचे कार्य वृक्ष करत असतात. तशीच नाशिकमधील वृक्षगणना अद्यापही सुरूच असून आत्तापर्यंत शहरात ४८ लाख झाडे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेला प्रतिवर्षी सुमारे सव्वादोन लाख वृक्षांची लागवड करावी लागणार आहे; अन्यथा शहरातील हवामान प्रदूषित होण्याचा धोका संभवतो. शहराच्या नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागात सध्या दाट लोकवस्ती असल्याचे दिसून येते. मध्य नाशिकच्या भागात आता फारसा विस्तार करण्यास संधी नसल्याने नाशिक शहर पूर्व आणि पश्चिम दिशेने वाढत चालले आहे. त्यामुळे नागरी वस्तीनिर्मितीसाठी येथे वृक्षतोड होत असल्याचे सातत्याने दिसून येते. या फोफावणार्‍या सिमेंटच्या जंगलामुळे याठिकाणी केवळ १.४० टक्के वृक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नाशिकची दिल्लीसारखी स्थिती तर होणार नाही ना, असा प्रश्न यानिमिताने पुढे येत आहे. देशातील ९४ प्रदूषित शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या १७ शहरांमध्ये नाशिक शहर सहाव्या क्रमांकावर आहे. नाशिक शहरात अलीकडच्या काळात वाढलेले औद्योगिकरण, सिमेंटची जंगले आणि वृक्षलागवड आणि संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष, शहरात दरवर्षी वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे पवित्र नाशिक शहराला वायुप्रदूषणांचा विळखा बसू लागला आहे. यावर उपाय म्हणून शहरात देशी झाडांची लागवड वाढविण्यासाठी नाशिक मनपाच्यावतीने देवराई प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नाशिक शहराची दिल्ली होऊ नये, यासाठी महापालिकेबरोबरच नागरिकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत वृक्षलागवड आणि संगोपन करण्यासाठी पुढाकार घेणे आता आवश्यक झाले आहे. यासाठी मनपाच्या नगररचना विभागामार्फत वृक्षलागवड सक्तीची अंमलबजावणी होणेदेखील आवश्यक आहे, असे वाटते.

@@AUTHORINFO_V1@@