समाजहितासाठी कार्यतत्पर...वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019   
Total Views |

venu tai 1_1  H


वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात वेगाने काम करणारी संस्था. पद्धतशीरपणे समाजात जागृती करणे, नियोजनबद्ध पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवणे हे या संस्थेंचे वैशिष्ट्य. मुंबईतील पूर्व उपनगरात या संस्थेने समाजातील सर्वच स्तरातील घटकांसाठी काम करण्याचा जणू विडा उचलला आहे. जाणून घेऊया या संस्थेबाबत...

वेणू माझ्या आईचे नाव. आईचा आशीर्वाद नेहमी सामाजिक कार्यात असावा, म्हणून मी माझ्या सामाजिक संस्थेचे नाव ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ ठेवले. अर्थात, माझे म्हणण्यापेक्षा ही संस्था समाजकार्याची तळमळ असणार्‍या आणि समाजाचा विकास करू इच्छिणार्‍या प्रत्येकाची ही संस्था आहे.” संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा चारूशिला समजिस्कर सांगत होत्या. भांडुप आणि पूर्व उपनगरातले शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे चारूशिला समजिस्कर. परिसरात त्यांना ‘चारूमॅडम’ किंवा ‘चारूताई’ म्हणून ओळखतात. मॅडम यासाठी की चारूशिला या पेशाने आणि हाडामांसानेही शिक्षक. आबालवृद्धांच्या प्रत्येक प्रश्नांना समजून घेताना चारूशिला आणि ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ गेले कित्येक वर्षे काम करत आहे.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारूशिला याचे गाव रत्नागिरी गुहागर येथील पालपेणे
. त्यांचे वडील सोनू समजिस्कर यांचा मुंबईत स्वत:चा व्यवसाय. मात्र, ते माळकरी. नित्यनेमाने पंढरपूर वारीला जायचे. आपले गाव पूर्ण माळकरी करावे, त्यायोगे गावात व्यसनमुक्ती होईल, सदाचारी वर्तन होईल, गावक
र्‍यांचे जीवन धार्मिक आणि नीतिमत्तापूर्ण होईल असे त्यांना वाटे. मुंबईतून ते नेहमी गावी जात. मुंबई ते पालपेणे गावाचा रस्ता त्यांच्या प्रयत्नातून साकारला गेला. संकल्पाप्रमाणे त्यांनी पूर्ण पालपेणे गावाला माळकरी केले. अशा ध्येयवादी पित्याची कन्या आहेत चारूशिला. चारूशिलाही बालपणापासूनच वारीला जातात. पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांनी समाजमन अनुभवलेले. समाजाचे निर्मळ भाव, तसेच समाजाच्या समस्या त्यांनी जाणलेल्या. वारीमध्येही स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उपस्थित व्हायचेच. त्यावेळीही आई-वडिलांसोबत चारूशिला वारीमध्ये सेवाकार्य करायच्या. हाच वारसा त्यांनी पुढे चालवला, त्यातूनच ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ची स्थापना झाली.

शैक्षणिक
, सामाजिक विषयांवर काम करताना संस्थेला अनेक समस्या नव्याने समजल्या. जसे आपण म्हणतो, ‘रोटी कपडा और मकान.’ या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण, ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’च्या माध्यमातून काम करत असताना चारूशिला यांना उमगले की, लोकांना ‘रोटी कपडा और मकान’ इतकेच असून चालत नाही. माणसाला माणसासारखे जगण्यासाठी चांगले आरोग्य हवे. तसेच आरोग्यासोबत शौचालयाची व्यवस्थाही हवी. कारण, शौचालय नसले की आरोग्याचे आणि समाजव्यवस्थेचेही गंभीर प्रश्न निर्माण होतात.

याबाबत बोलताना चारूशिला सांगतात की
, ”शिक्षकी पेशा असला तरी समाजात मिसळून समाजासाठी काम करणे मला खूप आवडते. भांडुप आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक झोपडपट्ट्या. प्रत्येक झोपडपट्या आपापल्यामध्ये अतिशय वेगळ्या. मात्र, या सर्वांमध्ये समानता एकच होती. ती म्हणजे या वस्तीतील लोकांना शौचालय बांधून हवे असायचे. नुसते शौचालयच नव्हे तर शौचालयामध्ये पाणी आणि विजेची व्यवस्थाही हवी असायची.”


venu tai 1_1  H

 

चारूशिला भांडुपच्या नगरसेविका होत्या, तेव्हा त्यांच्याकडे दिवसभर विविध वस्त्यांमधून लोकं यायची आणि प्रश्नांचे समस्यांचे स्वरूप मूलत: शौचालय, पाणी याभोवतीच फिरायचे. वस्तीपातळीवरचे हे विषय सोडवणे गरजेचे होते. चारूशिला यांनी राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न करून वस्तीमध्ये आठ ‘पे अ‍ॅण्ड युज’ तत्त्वावरच शौचालयं बांधली आहेत. शुल्क यासाठी की, शौचालयं नुसती बांधून चालत नाहीत तर त्यांची स्वच्छता राखणेही गरजेचे असते. घाणेरड्या अस्वच्छ शौचालयामुळे एकंदर सर्वच वस्तीचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे वस्ती आणि वस्तीतील शौचालय स्वच्छ राहावे म्हणून चारूशिला यांनी ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’तर्फे वस्ती पातळीवर स्वच्छता अभियान राबवले. पण हे अभियान नुसतेच एक तासाचे झाडुकाम नव्हते, तर या वस्तीतील घराघरांशी संपर्क साधून त्यांना परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे. त्यांचे एकत्रिकरण करायचे आणि त्यांच्या माध्यमातून वस्ती सदैव स्वच्छ राहील, यासाठी प्रयत्न करायचे. यासाठी ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ने वस्तीपातळीवर जागृती केली. मात्र, या कामाला गती आली ती २०१४ साली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला. त्यामुळे ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ नेही चालवलेल्या स्वच्छता अभियानाला चांगलीच गती मिळाली. ‘भारत विकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ ने अनेक वंचित वस्त्यांमध्ये शौचालय निर्माण करण्याची सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वस्त्यांमध्ये शौचालयं बांधलीही जातात. मात्र, खाजगी किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये शौचालयाचा प्रश्न मोठा गंभीर असतो. ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ने या प्रश्नाची गंभीरता समजून घेत गरजू शाळांमध्ये शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ स्वच्छतेसोबतच आरोग्याच्या क्षेत्रातही भरीव कामगिरी करत आहे. फोर्टिज इस्पितळाच्या माध्यमातून ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठानने दोन वर्षांमध्ये सातत्याने शेकडो आरोग्याची शिबिरे राबवली. पण ही आरोग्य शिबिरं प्रत्येक वेळी एक संकल्पना घेऊन आयोजित करण्यात येई. जसे महिलांच्या आरोग्याच्या विशिष्ट समस्या. बालकांच्या आरोग्याच्या समस्या, ज्येष्ठांच्या समस्या, व्यसनाधिनता आणि आरोग्य, चाळीशीनंतरचे आरोग्य, संसर्गजन्य आजार, मानसिक आजार वगैरे वगैरे संकल्पना घेऊन ही शिबिरे राबवली गेली, हे विशेष. या शिबिरांमध्ये नुसती आरोग्य तपासणी केली गेली नाही तर संबंधित विषयावर मार्गदर्शन, व्याख्यानही आयोजित केले गेले.

तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रातर्फे प्रत्येेक वर्षी कार्य करण्यासाठी एक संकल्पना दिली जाते. ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ या संकल्पनेवर दरवर्षीचे उपक्रम आयोजित करते. जसे गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र परिषदेने कुपोषणाच्या विरोधात पोषक आहार ही संकल्पना जाहीर केली. त्यानुसार ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’नेही वर्षभर या संकल्पनेवर कार्य केले. यावर्षी ‘वायुप्रदूषण’ या संकल्पनेवर काम करण्याचे ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ने ठरवले आहे. असो, परिसरातील मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे,‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’ काम करते. चारूशिला राजकारणात सक्रिय आहेत, असे असल्यातरी ‘वेणुताई चॅरिटेबल प्रतिष्ठान’च्या समाजकार्यात त्या राजकारणाला दूर ठेवतात. कारण, समाजकार्य हे ईश्वरी कार्य असून, त्यामध्ये स्वार्थाला थारा नाही असे त्यांचे मत आहे.

@@AUTHORINFO_V1@@