‘हिंदुत्वाचे दुकानदार’ राज्यसभेतून पळाले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |

sanjay_1  H x W



हिंदुत्वाच्या नावावर फक्त पोपटपंची करणार्‍यांचे बुरखे फाटण्याची वेळ आता आली आहे आणि ते केवळ फाटणार नाहीत तर त्याची लक्तरे निघून वेशीवर टांगली जाणार आहेत. कारण, हिंदूहिताचे अनेक निर्णय पुढच्या पाच वर्षांमध्ये याच संसदेत घेतले जाणार आहेत.



२० नोव्हेंबरला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका ट्विटद्वारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’विषयी माहिती दिली होती. हे ट्विट इतके सुस्पष्ट होते की, अमित शाहांचा हे विधेयक आणण्यामागचा इरादा समजून यावा. ही सुधारणा हिंदूंसाठीच केली गेली आहे. होय! हिंदूंसाठीच. कारण, हिंदूंना या जगात भारताशिवाय अन्य कुठल्याही देशात थारा नाही. इरादा सुस्पष्ट असलेल्या अमित शाहांनी हे विधेयक लोकसभेत आणले आणि तथाकथित सेक्युलर पोंगापडितांच्या दबावाला बळी न पडता संमतही करून घेतले. भाजपचे हिंदुत्व, सावरकारांचे हिंदुत्व, संघाचे हिंदुत्व, शिवसेनेचे हिंदुत्व यावर चर्चा अनेकदा होत असते. खरं तर ‘हिंदुत्व म्हणजेच या देशाचे राष्ट्रीयत्व’ इतकी साधी सोपी व्याख्या. त्यामुळे हिंदुत्वाची फारशी मीमांसा राजकीय परिप्रेक्ष्यात केली जात नाही. मोदी-शाह या जोडीने हिंदुत्वासमोरचे वर्षानुवर्षे चालत आलेले प्रश्न निकालात काढायचे ठरविले आहे. ते काढण्याची त्यांची पद्धत कशी का असेना, प्रश्न तर यांच्याच काळात सुटत आहेत. हाच काळ आहे कुणाचे हिंदुत्व सच्चे आणि कुणाच्या भूमिका ऐरणीवर आल्यावर एका फटक्यात तुटून पडणार्‍या. अशा वेळी हिंदुत्वाचे दुकान मांडून एका घराण्याच्या राहत्या बंगल्यांचा गुणाकार करणार्‍या शिवसेनेने राज्यसभेतून पळ काढला, यापेक्षा संतापजनक ते काय? खांद्यावरची भगवी शाल फर्राटेदार शैलीत फिरवून आग ओकणार्‍या हिंदुहृदयसम्राटांना आज ते जिथे आहेत तिथे काय वाटले असेल? जम्मूमध्ये आंदोलने करणार्‍या शिवसैनिकांना काय वाटले असेल. पण खैरातीत मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचे रक्षण करण्यासाठी स्वत्व कसे विकले जाते याचा तमाशा आज शिवसेनेने राज्यसभेत दाखविला.

१९४७ सालापासून या देशाच्या राजकीय मुद्द्यांच्या मुळाशी हिंदू-मुसलमान संघर्षच आहे. गांधीजी म्हणत तसे हिंदू मवाळ, तर गुंडगिरी करणारा मुसलमान. या दोन घटकांच्या शिवाय एका तिसर्‍या घटकानेदेखील या समस्येत स्वत:ची जागा बनवली आणि ती होती, मुस्लिमांचे लांगूलचालन करून सत्ता टिकविणार्‍यांनी. यात आघाडीवर होता काँग्रेस पक्ष. आज शिवसेना ज्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसली आहे ती काँग्रेस लांगूलचालनाच्या सलाईनवरच आजतागायत तगली. पण आज काँग्रेसची स्थिती काय आहे तर एक पळपुटा अध्यक्ष आणि राज्यामागून राज्य गमाविणारे लोक. खरेतर लांगूलचालन करणार्‍यांचे काय हाल होतात हे सिद्ध करणारा हा सारा प्रवास आहे. शिवसेनेची काँग्रेस होण्याची पुरेपूर शक्यता आहे. कारण, शिवसेना आज ज्यांच्या वळचळणीला जाऊन बसली आहे, तीच गत आता शिवसेनेची होणार आहे. काँग्रेसच्या अधोगती नाट्यात जी पात्रे होती तिच पात्रे इथे आज शिवसेनेतही हजर आहेत. देशासाठी लढणारी काँग्रेस सत्तेसाठी हिंदुंची शत्रू झाली आणि घराण्याच्या रोगाने काँग्रेसला जर्जर करून टाकले. शिवसेनेचे नेते आणि दिल्लीतला शिवसेनेचा चेहरा असलेले संजय राऊत जे राज्यसभेत बरळले, ते किती मोठ्या अंगाराशी खेळत आहेत तेच त्यांना कळत नाही. उद्या एखादा माथेफिरू आला आणि त्यांना यांच्या तोंडाला काळे फासले तर हे लोक आपले आधीच काळे झालेले तोंड कुणाला दाखविणार आहेत. विस्थापित हिंदुंच्या वेदनांवर अटलजींसारख्या राष्ट्रकवींनी कविता लिहिल्या आहेत. ज्यांचे नाव घेण्याची लायकी नाही अशा माणसांची नावे घेण्यापूर्वी त्या माणसांच्या विस्थापित हिंदुंबाबतच्या भूमिका काय आहेत ते तरी तपासून पाहा.


हिंदुंचा हिंदुस्थान असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे खोटारडे होते की तुम्ही खोटारडे आहात ते जरा एकदा लोकांना सांगा
. राज्यसभेच्या बाहेर येऊनही ही बरळण्याची नशा थांबली नव्हती. इतकी वर्षे सेक्युलर लुच्चे हिंदूंना जे डोस पाजायचे तेच मानवतेचे डोस संजय राऊत आज हिंदुंना पाजायला लागले आहेत. गोध्र्याला बोगीत जीवंत जाळल्या गेलेल्या हिंदुंची पर्वा कुणीही केली नव्हती. मात्र, त्याला प्रतिसाद म्हणून उमटलेल्या दंगलीत मारल्या गेलेल्या मुसलमानांची कणव अनेकांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेली होती. केवळ न्यायालयात जाऊन न थांबता त्याचे गलिच्छ राजकारणही एक दशकहून अधिक काळ केले गेले. हा असला झुठा मानवाधिकार आज केंद्र सरकारने झिडकारला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवसेना यात काँग्रेसच्या सोबत होती. ज्यांनी पाकिस्तान सोडला पण आपला धर्म सोडला नाही त्या शरणार्थ्यांना जर या देशात स्थान मिळत असेल आणि लोकसभेत त्याला मान्यता मिळत असेल तर तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे. मात्र, इथे सोनिया गांधी त्याला ‘काळा दिवस’ असे म्हणतात. आणि तीच री संजय राऊत ओढतात. रात्री घरी बोलावून काँग्रेसवाल्यांनी तुमचे असे काय केले की तुम्ही एका रात्रीत बदललात. लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला. ही सवय होती की, तुमच्यातील संवादाचा अभाव हे संजय राऊतांनी सांगावे. लोकसभेत जे झाले ते विसरून जा म्हणणे आणि राज्यसभेत इकडे तिकडे वाचलेले सांगत सदनाचा वेळ खाणे म्हणजे संविधानाशीही प्रतारणा आहे. काही गोष्टी विस्ताराने सांगता येणार नाही, असे जे राऊत म्हणतात त्या अशा काय गोष्टी आहेत ज्या शिवसेनेला या देशाला सांगता येणार नाही आणि मोदींनी या विधेयकाबाबत अवघ्या तीन मतांसाठी काय सांगायला हवे होते? म्हणजे शिवसेना या विधेयकाच्या बाजूने उभी राहिली असती? हिंदुत्वाच्या नावावर फक्त पोपटपंची करणार्‍यांचे बुरखे फाटण्याची वेळ आता आली आहे आणि ते केवळ फाटणार नाहीत तर त्याची लक्तरे निघून वेशीवर टांगली जाणार आहेत. कारण, हिंदूहिताचे अनेक निर्णय पुढच्या पाच वर्षांमध्ये याच संसदेत घेतले जाणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@