शिवसमर्थ भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


swami_1  H x W:



समर्थांच्या शिष्यांनी वेळोवेळी त्यांच्या लीला लिहून ठेवल्या होत्या. त्यांचा संदर्भ यात आहे. कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणाबाई, दिवाकर गोसावी या समर्थांच्या संगतीत वाढलेल्या प्रमुख शिष्यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रातील आठवणी, लीला आज उपलब्ध असत्या तर काय बहार झाली असती, असे पांगारकरांनी म्हटले आहे.



समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट केव्हा झाली
, हा समर्थचरित्र अभ्यासकांत मोठा वादाचा विषय ठरला आहे. रामदासस्वामींचा चरित्रमय आत्मानुभव बघायचा असेल तर ‘वाकेनिसी टिपण’ हा विश्वसनीय पुरावा आहे, असे देव व राजवाडे या अभ्यासकांचे मत आहे. ‘वाकेनिसी प्रकरण’ हे टिपण समर्थचरित्रातील घटना केव्हा घडली हे ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे टिपण प्रथम वि. का. राजवाडे यांनी प्रकाशात आणले. काही कागदपत्रांच्या शोधात ते चाफळला गेले असता त्यांच्या हाती हे टिपण आले. समर्थस्थापित सर्व मठात चाफळ मठाला महत्त्वाचे स्थान आहे. समर्थांनी हिंदुस्थानभर जे मठ स्थापन केले व तेथे महंत तयार करून पाठवले, त्या सर्व मठांचे ‘हेड ऑफिस’ चाफळ मठ होते. चाफळ मठातील कारभार रामदासांच्या अधिपत्याखाली चालत असे. या दृष्टीने तेथील कागदोपत्री पुराव्यांना विशेष महत्त्व आहे. समर्थांच्या प्रयाणानंतर फक्त चारच दिवसांनी दिवाकर गोसावी या समर्थशिष्यांच्या सांगण्यावरून अनंत गोपाळ, वाकेनीस देशकुळकर्णी कुडाळकर यांनी ही टिपणे लिहिली आहेत.



समर्थ शके १६०३
, माघ वद्य ९, शनिवार या दिवशी निजधामास गेले आणि वाकेनीस यांनी माघ वद्य १३, बुधवारी हे स्मरण टिपण लिहिले आहे. त्याची नक्कल गोपाळ आबाजी शहापूरकर यांनी फाल्गुन शुद्ध ५ला करून ठेवली. (संदर्भ :मराठी वाङ्मयाचा इतिहास (रामदास खंड, ल. रा. पांगारकर) रा. द. ऊर्फ गुरुदेव रानडे यांच्या मते रामदासांच्या आयुष्यातील घटनांचा कालक्रम वृत्तांत हवा असेल तर वाळेनिसी टिपण उत्कृष्ट आहे. त्यांच्या ‘Mysticism in Maharashtra' या ग्रंथात ते लिहितात,"The incidents in Ramadasa's life may best be chronicled by reference to a memorandum of events The 'Vakenisi Prakaran'’ समर्थांच्या शिष्यांनी वेळोवेळी त्यांच्या लीला लिहून ठेवल्या होत्या. त्यांचा संदर्भ यात आहे. कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणाबाई, दिवाकर गोसावी या समर्थांच्या संगतीत वाढलेल्या प्रमुख शिष्यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रातील आठवणी, लीला आज उपलब्ध असत्या तर काय बहार झाली असती, असे पांगारकरांनी म्हटले आहे.



या समर्थ
‘वाकेनिशी’तील १८व्या टिपणास समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या अनुग्रहाचा उल्लेख आहे. तो मजकूर असा- “छत्रपती शिवाजी महाराज यांस अनुग्रह शके १५७१ (इ.स. १६४९) शिंगणवाडीचे बागेत वैशाख शुद्ध ९स गुरुवारी जाला.” या विधानाची पुष्टी हनुमंतस्वामींनी लिहिलेल्या बखरीतून मिळते, हे मत देव व राजवाडे यांनी ग्राह्य मानलेले आहे. तथापि या मताच्या विरुद्ध मत प्रो. भाटे व चांदोरकर या अभ्यासकांनी मांडले आहे. त्यांच्या मते, रामदासस्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट शके १५९४ (इ. स. १६७२) मध्ये झाली. ही दोन्ही मते परस्पर भिन्न टोकाची आहेत. दोघेही आपल्याकडे कागदोपत्री पुरावा असल्याचे सांगतात.



भाटे व चांदोरकर यांनी केशव गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांना शके १५९४ मध्ये जे पत्र लिहिले आहे
, त्यातील उल्लेखावरून छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची पहिली भेट शके १५९४ (इ. स. १६७२) साली झाली, असे मानतात. त्या पत्रात म्हटले आहे की, “... राजे यांची ही पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकांस खटपटेस आणावे... झाडी बहुत आहे.” भाटे व चांदोरकर यांची भिस्त आणखी एका पानावर आहे. हे पत्र शके १५८० मध्ये भास्कर गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांना लिहिले आहे. त्यात ते असे लिहितात की, “आम्ही भिक्षेसाठी छत्रपती शिवाजीराजे यांचेकडे गेलो होतो. “तुम्ही कोण?” असे महाराजांनी विचारल्यावरून आम्ही त्यांना सांगितले, “आम्ही समर्थ रामदास स्वामींचे शिष्य आहोत. चाफळास राहतो.” त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज बोलले की, “हे रामदासस्वामी कोठे राहतात? त्यांचे मूळ गाव काय?” याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना शके १५२० पर्यंत रामदासस्वामी माहीत नव्हते.” या भाटे-चांदोरकर यांच्या आक्षेपावर देव व राजवाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, ज्या पत्रांवर भाटे-चांदोरकर यांची भिस्त आहे, ती पत्रे अस्सल नसून नक्कल आहेत.



त्यात हस्तदोष शक्य आहे
. तथापि, ती पत्रे अस्सल आहेत, असे जरी मानले तरी त्या पत्रांचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावता येतो. त्यांच्या पहिल्या पत्रातील ‘राजे यांची पहिली भेट आहे. याचा संदर्भ छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांच्या भेटीसंबंधी नसून ती भेट स्थलनिर्देशकआहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी चाफळ मठास शके १५९४ मध्ये जी भेट दिली, तिला अनुलक्षून आहे. त्यानंतर लगेचचछत्रपती शिवाजी महाराजांनी दत्ताजीपंत यांना पत्र लिहिले आहे. त्यात लिहिले आहे की, “चाफळ येथे रामदास गोसावी आहेत. श्रींचे देवालय केले आहे. तेथे कटकीचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती... चोरा चिलट्यांचा उपद्रव होऊ न देणे.” हे पत्र शिवाजीराजांनी शके १५९४ मध्ये जी चाफळला भेट दिली, त्यानंतर लिहिले आहे. भाटे-चांदोरकर यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे की, ‘भास्कर गोसावी शके १५८० मध्ये शिवाजी महाराजांकडे भिक्षेसाठी गेले असता महाराजांनी त्यांना रामदास कोठे राहतात? त्यांचे मूळ गाव कोणते? असे प्रश्न विचारले होते. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज शके १५८० ला रामदासांना ओळखत नव्हते,’ असे अनुमान काढले गेले. यावर देव व राजवाडे यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की, “भास्कर गोसावी हे खरोखरच रामदासांचे शिष्य आहेत किंवा नाही, याची परीक्षा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तसे विचारले असणे शक्य आहे. याचा अर्थ त्यांना रामदास माहीत नव्हते, असे अनुमान काढता येत नाही.”



देव व राजवाडे यांनी वाकेनिसी प्रकरणातील काल ग्राह्य मानून छत्रपती शिवाजी महाराज व रामदासस्वामी यांची भेट शके १५७१
(इ.स. १६४९) साली झाली. हे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वय २० वर्षांचे होते. रामदासस्वामी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा २१ वर्षांनी वडील होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या २० वर्षांच्या तरुणाने रामदासांसारख्या ज्येष्ठ पुरुषाचा अनुग्रह घेणे हे त्यांची उत्कंठा धर्मजिज्ञासा, सत्पुरुषांबद्दलची श्रद्धा दाखवतात. प्रो. भाटे-चांदेरकर ही भेट शके १५९४ (इ. स. १६७२) अशी सांगतात. कारण, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय कर्तृत्व सिद्ध झाले होते, तेव्हा रामदासांनी ते पाहून राजकारणावर काही लिहिले हे सांगायला अभ्यासक मोकळे! परंतु, आळतेकरदेखील म्हणतात की, शके १५९४ मध्ये समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही पहिलीच भेट नसली पाहिजे. कारण, शके १५८०च्या पत्रावरून महाराजांना समर्थकार्याची व चाफळच्या राममंदिराची माहिती होती. तेव्हा दरवर्षी रामनवमी उत्सवासाठी २०० होन पाठवणारे धार्मिक श्रद्धाळू शिवाजी महाराज १४ वर्षे भेट घेतल्याशिवाय राहतील, हे संभवनीय नाही.



या वादाचे मूळ रामदासस्वामी व छत्रपती शिवाजी महाराजां हे कोण कोणामुळे प्रभावीत झाले
, असे असेल तर श्री. म. माटे यांची याविषयी टिप्पणी खूप काही सांगून जाते. माटे लिहितात, “छत्रपती शिवाजी महाराजांची व रामदासांची गाठ इ. स. १६४९ साली पडली का १६७२ साली पडली, यावर रामदासांच्या आक्षेपकांनी अवडंबर रचले आहे. त्यापैकी कोणत्याही सालीच काय, पण कधीही त्यांची गाठ पडली नव्हती, असा पक्ष पत्करायला मी तयार आहे. गाठ हवी होती कशाला? रामदास झाले नसते तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली असती व शिवाजी महाराज झाले नसते तरी रामदासांनी हेच राजकारण वाङ्मय लिहिले असते. एकाला स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती दोन पिढ्या घरातून मिळत होती आणि दुसऱ्याला राजकारण प्रतिपादनाची स्फूर्ती भारतभ्रमंतीतून प्राप्त झाली होती.” या वादातील मतितार्थ एवढाच की, रामदास व शिवाजी महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्वे स्वयंभू व परिपूर्ण होती. दोघे एकत्र आले हे महाराष्ट्राचे भाग्य. मग त्यांची भेट इ. स. १६७२ साली असो, नाहीतर १६४२ साली असो.


-सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@