गोपीनाथ मुंडे : भावणारा झंझावात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |

munde_1  H x W:



आज १२ डिसेंबर. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणात तीन दशकांपेक्षा अधिक काळ ज्यांनी अधिराज्य गाजविले, त्या धाडसी, अभ्यासू, ओबीसी राजकीय नेत्याच्या सामाजिक समरसतेच्या संकल्पनेवर प्रकाश टाकणारा हा लेख...


संघ स्वयंसेवक, विद्यार्थी परिषद कार्यकर्ता ते भाजप नेते असा राजकीय प्रवास असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा जन्म परळी तालुक्यातील ‘नाथ्रा’ या गावी एका ऊसतोड कामगाराच्या घरात झाला. महाविद्यालयीन जीवनात प्रमोद महाजनांसारखा धुरंधर राजकीय नेत्यांचा परिचय झाला आणि त्यांच्या जीवनाची दिशा ठरली. संघ स्वयंसेवक, विद्यार्थी परिषद ते भाजप नेते असा त्यांचा प्रवास सामान्य माणसाला आश्चर्यकारक तितकाच प्रेरणादायी असा आहे.

कोणताही राजकीय वारसा नसलेल्या या नेत्याने शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध विधानसभा सभागृहात आणि सभागृहाबाहेर लढा उभारला. ‘शिवनेरी ते शिवतीर्थ’ अशी संघर्ष यात्रा करून त्यांनी पवारांविरुद्ध सर्व महाराष्ट्र पेटविला आणि १९९५ साली महाराष्ट्रातील ४० वर्षांची सत्ता उलथवून भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले. शरद पवारांसारख्या बलाढ्य मराठा नेत्याला टक्कर देताना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची नेतृत्व, धाडस, अभ्यासूवृत्ती पाहिली, अनुभवली आणि ‘जनतेच्या प्रश्नांवर लढणारा एक संघर्षशील धाडसी नेताअशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. तीच प्रतिमा अखेरपर्यंत कायम राहिली.

बहुजनांचा नेता

गोपीनाथ मुंडे एका सर्वसामान्य कुटुंबातून आले असल्यामुळे त्यांना दलित-ओबीसी, गरीब, उपेक्षित भटक्या-विमुक्त व शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण होती. त्यांचं वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि अभ्यासूवृत्ती, साहसी व धाडसी स्वभाव हेरून भाजप नेत्यांनी त्यांची त्यांच्या अवघ्या ३५व्या वर्षी १९८६ साली महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुणाला अधिक बळ मिळाले. आधीच लढाऊ व संघर्षशील वृत्तीचे मुंडे अधिक आक्रमक व लढाऊ बनले. शरद पवारांच्या भ्रष्ट कारभारावर व त्यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या कथित संबंधावर मुंडे यांनी वारंवार आघात केले. त्यासाठी ‘शिवनेरी ते शिवतीर्थ’ अशी संघर्ष यात्रा काढून काँग्रेस सरकारची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत अन्यायावर प्रहार करणारा धाडसी बहुजन नेता अशी प्रतिमा निर्माण झाली. पहिले शेतकरी कर्जमुक्तीचे आंदोलन करून त्यांनी शेतकर्‍यांच्या मनात ‘शेतकर्‍यांचा कैवारी’ असे स्थान निर्माण केले.

या सर्व गोष्टींचे पर्यावसान १९९५च्या सत्तातंरात झाले. महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव होऊन भाजप-शिवसेनेचे सरकार आले. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात पूर्वी बाळासाहेब सावंत, नाशिकराव तिरपुडे इ. उपमुख्यमंत्री झाले होते. परंतु, गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या कार्यशैलीमुळे उपमुख्यमंत्रिपदाची गरिमा वाढवली. पूर्वी नगण्य असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाची मुंडेंनी आपल्या सभागृहातील कार्यकर्तृत्वाने प्रतिष्ठा वाढवली.

गोपीनाथ मुंडे भाजप प्रदेशाध्यक्ष होईपर्यंत भाजप ‘शेठजी-भटजींचा पक्ष’ अशी प्रतिमा होती. गोपीनाथ मुंडे हा बहुजन-ओबीसी चेहरा असल्यामुळे व दलित ओबीसी, भटके-विमुक्त यांच्याशी त्यांची असलेली जवळीक व त्यांच्या प्रश्नांची असलेली जाण, त्यामुळे दलित, ओबीसी, वनवासी, भटके-विमुक्त यांना भाजप आपला पक्ष वाटू लागला. भाजपची जातीवादी प्रतिमा पुसून मुंडेंनी भाजप वाडी-वस्ती-तांड्यावर नेला. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात फार मोठा जनाधार मिळाला.

महाराष्ट्राची नस माहीत असलेला नेता

गोपीनाथ मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रवासाची पुरेशी साधनं नसतानाही बस-रेल्वेने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. भाजप संघटनेचा विस्तार केला. विविध जातीजमातींच्या कार्यकर्त्यांशी त्यांची जवळीक निर्माण झाली. ओबीसी, वनवासी, दलित, भटके-विमुक्त जातींना गोपीनाथ मुंडे ‘आपला माणूस‘ वाटू लागले. गोपीनाथ मुंडेच्या निर्भीड, धाडसी व अभ्यासू वृत्तीमुळे मागासवर्गींयांप्रमाणेच मध्यमवर्गीयांनाही मुंडे भावू लागले. मुंडे बहुजनांचे नेते झाले.

सामाजिक समरसतेचा पाईक

मुंडेंना दलित-शोषित-पीडित, ओबीसी व भटके-विमुक्त समाजाबद्दल कणव होती. ते त्यांच्या भावभावनांशी एकरूप झालेले होते. म्हणून हे लोक आपल्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब गोपीनाथ मुंडेंमध्ये पाहत होते, आणि मुंडेंनीही संघात मिळालेल्या सामाजिक समरसतेच्या बाळकडूचा पुरेपूर उपयोग आपल्या राजकीय जीवनात केला. भाजपमध्ये माळी, धनगर व वंजारी समाजाची मोट बांधली. पुढे ही संकल्पना ‘माधव‘ या नावाने अस्तित्वात आली आणि या संकल्पनेचा भाजप संघटनात्मक विस्तारासाठी फार मोठा फायदा झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या या सामाजिक समीकरणामुळे भाजप महाराष्ट्रात मोठा झाला. आज भाजपतील ओबीसींवरील अन्यायाबाबत जी चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांच्या या सामाजिक समीकरणाचा ऊहापोह करणे मला क्रमाप्राप्त वाटते.

सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते

गोपीनाथ मुंडे हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना पक्षपातीपणा कधीच केला नाही. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती त्यांनी पाहिली होती, म्हणूनच त्यांनी विरोधी पक्षनेता असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा आग्रह धरला. त्यासाठी सभागृहात आवाज उठविला. त्यांच्या मराठा समाजाच्या मागणीला मूर्तरूप देण्याचे दिव्य युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडून गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांना आदरांजली वाहिली.

धनगर समाजाच्या आरक्षण संदर्भातही मुंडे आग्रही होते. बारामती येथे धनगर समाजाचे उपोषण सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठविताना त्यांनी फडणवीसांना सांगितले होते, “बारामतीला जा. धनगर समाजाची आरक्षणाची न्याय मागणी आहे. आपलं सरकार आल्यावर त्यांना आपण आरक्षण देऊ!‘’ गोपीनाथ मुंडे यांचा हाच आदेश घेऊन फडणवीस बारामतीला गेले आणि त्यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. फडणवीसांनी आरक्षण देण्याचे प्रयत्न केले. परंतु, काही संविधानात्मक बाबी पूर्ण न झाल्यामुळे धनगरांना अजून आरक्षण मिळालेले नाही. आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगरांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. पाहू ते दिलेली आश्वासनं किती पाळतात ते.

वर्तमानाच्या संदर्भात...

गोपीनाथ मुंडे हे एक वादळ, एक झंझावात होता. तारेतारकांइतकी प्रचंड लोकप्रियता मिळविलेले मुंडे हे एकमेव राजकीय नेते होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे गोपीनाथ मुंडेंवर नितांत प्रेम होते. १९९९ साली युती सरकार बनवताना भाजपचे आमदार कमी असतानाही त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करा, असे सांगितले होते. दुर्दैवाने, युतीचे सरकार बनू शकले नाही, तो भाग वेगळा. गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र वेगळे असू शकले असते.

नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. इंदूरच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यासपीठावरील शीर्षस्थ नेत्यांना त्यांनी नमस्कार केला. त्यातील दोनच नेते असे होते की, नितीनजींनी ज्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि दुसरे होते गोपीनाथ मुंडे. नितीन गडकरी यांना गोपीनाथजींबद्दल नितांत आदर व अभिमान होता. त्यांचे मतभेद होते. परंतु, मनभेद नव्हते. दलित, उपेक्षित ओबीसी भटके- विमुक्त समाजात आणि भाजप कार्यकर्ते, नेते व विरोधी पक्षातही तितकीच लोकप्रियता असलेले गोपीनाथराव हे एकमेव राजकीय नेते होते. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रातील राजकीय विश्वाचं फार मोठं नुकसान झालं आहे. म्हणून म्हणावसं वाटतं ‘गोपीनाथजी परत यामहाराष्ट्राच्या राजकारणाला तुमच्या सामाजिक भानाची नितांत गरज आहे.

- गणेश हाके

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@