द्रष्टा राष्ट्रनेता : डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे - भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2019
Total Views |


munje_1  H x W:



मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम उपाख्य बा. शि. मुंजे यांच्या १४७व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दि. १०, ११ आणि १२ डिसेंबर रोजी गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यासमधील कुर्तकोटी सभागृहात संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घडामोंडीवर आधारीत तीन लेखांपैकी आजचा पहिला लेख...



स्वतःचा व्यवसाय काही वर्षे म्हणजे जवळपास चार
-पाच वर्षे मेहनतीने सुस्थापित करून नंतर राष्ट्र उभारणी व राजकारण यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारा, जम बसलेला व्यवसायही सोडून देणारा मध्य प्रांतांतला किंवा अखिल भारतातील पहिला आणि एकमेव राष्ट्रनेता म्हणजे डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे. त्या काळातील सर्व राष्ट्रपुरुष, राष्ट्रीय नेते राष्ट्रीय सभेचे काम किंवा राजकारण आपला व्यवसाय सांभाळूनच करत असत. त्या काळातील या सर्वसाधारण नियमाला अपवाद म्हणजे डॉ. मुंजे. लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातून ‘राजकारण’ हा फावल्या वेळेत करण्याचा उपद्व्यापापासून राष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग आहे व त्याकरिता, त्यामुळे सर्वस्व पणाला लावणे ही जीवननिष्ठा आहे. हे तत्त्व आपल्या जीवनात बाणवत व्यवसायाचादेखील त्याग करण्याची धडाडी अंगी असलेला द्रष्टा नेता म्हणजे डॉ. मुंजे. अंगभूत धडाडी व हाती घेतलेल्या कार्यासाठी इतर सर्व बाबी गौण मानून आपल्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे मध्य प्रांतांतील राष्ट्रीय नेत्यांमधून लोकमान्यांच्या जवळच्या प्रभावळीत दादासाहेब खापर्डे यांच्या बरोबरीने स्थान मिळवणारा असा हा नेता.



मध्य प्रांतांतील नेमस्त राजकारण्यांचे वर्चस्व काही वर्षांत मोडीत काढून लोकमान्य टिळकांची स्वदेषी
, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही चतुःसुत्री भारताच्या मध्यप्रांतांत ठायी ठायी पोहोचवत डॉ. मुंजेंनी जहाल राष्ट्रवादी विचारांचा भक्कम गड उभारण्यात अल्पावधीत यश प्राप्त केले. लोकमान्य टिळक व प्रभू रामचंद्र यांना आपल्या जीवनाचे आदर्श मानणार्‍या डॉ. मुंजेंनी जीवनात कुठल्याही प्रसंगी विवेकाची कास मात्र सोडली नाही. ‘राष्ट्र प्रथमहा विचार ठेवताना आपल्याला न पटणार्‍या मुद्द्यांवर टिळक किंवा गांधीजींसारख्या नेत्यानांही विरोध करण्याची व त्यासाठी जनमानसात एकाकी पडणे किंवा तात्कालिक अप्रिय होणे ही बाब डॉ. मुंजेंनी सहजतेने स्वीकारली. त्यांच्या या स्वभावविशेषाची जाण आपणास दोन अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रसंगांतून समजून येते.



पहिला प्रसंग म्हणजे १९१६ साली झालेला
लखनौ करार’ होय. राष्ट्रीय चळवळीत हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व्हावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी त्यावेळी प्रचंड मेहनत घेतली. स्वाभिमानी व स्वदेशनिष्ठ दृष्टिकोन बाळगणार्‍या मुस्लीम तरुणांना व हिंदूंना एकत्र आणून ब्रिटिश शासनावर वा शासन निर्णयावर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने टिळकांच्या पुढाकराने लखनौ काँग्रेसमध्ये सुप्रसिद्ध ‘लखनौ करार’ घडवून आणला गेला. या संधीसाठी लोकमान्य टिळकांनीदेखील फार मोठी किंमत देऊ केली होती. लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व, स्वतंत्र मतदारसंघ व मुस्लीम हितसंबंध संरक्षणार्थ इतर काही सवलती टिळकांनी या करारान्वये मान्य केल्या. त्याकाळी या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या यशामुळे सर्वच भारतीयांचे डोळे दीपून गेले होते. त्याकाळी तर्ककठोर लोकमान्यांना विरोध करणे अतिशय कठीण गोष्ट होती. टिळकांचेच आदर्श जगणार्‍या डॉ. मुंजेंनी या कराराला कडाडून विरोध केला व अप्रियता सहन करूनही ‘लखनौ करार’ही लोकमान्यांची मोठी चूक आहे, हे वारंवार छातीठोकपणे प्रतिपादन केले. अर्थात, हे झाल्यावरदेखील टिळकांच्या प्रभावळीतील त्यांचे स्थान अबाधितच राहिले.



स्वतंत्र मतदारसंघ मान्य करणे आणि लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व देण्याने मुस्लीम समुदाय कायम आक्रमक राहील, तसेच हिंदू-मुसलमानांमध्ये या करारामुळे कायमस्वरूपी दुहीचे बीज पेरले जाईल व समाज कधीही एकात्म राहू शकणार नाही,”हे डॉ. मुंजेंचे प्रतिपादन होते. काळाच्या पुढे जाऊन केलेले हे प्रतिपादन व ‘लखनौ करारा’चे परिणाम आपण आजही अनुभवत आहोत. सन १९०० मध्ये दक्षिण आफ्रिकेत बोअरयुद्धाचा अनुभव घेतलेल्या डॉ. मुंजेंना आंतरराष्ट्रीय राजकारण व बदल त्या जागतिक परिस्थितीचा अत्यंत काटेकोर अंदाज असावा. कारण, १९१८ मध्ये ‘मॉन्टेग्युचेम्स फोर्ड सुधारणा’ जाहीर झाल्या, ही स्वराज्याची जाणीव किंवा अंदाज डॉ. मुंजेंसारख्या द्रष्ट्यानला फार लवकर झाला होता. त्यामुळे या सुधारणा आपण देशात राबवाव्यात या टिळकांच्या मताशी डॉ. मुंजे संपूर्ण सहमत होते. भविष्यात मिळू घातलेल्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने समाज व एतद्देशीय लोकांची मानसिकता तयार करण, हे अतिआवश्यक आहे, याचा त्यांना अंदाज होता. हे त्यांच्या पुढील काळातील वाटचालीवरून सहज कळू शकते. स्वतःच्या मताशी पूर्ण प्रामाणिक राहून सुस्पष्ट प्रतिपादन हे डॉ. मुंजेंचे वैशिष्ट्य, पुढे ‘यंग इंडिया’ या वर्तमानपत्रात बडग्या आणि मारबतीच्या निमित्ताने झालेल्या दंगलीसंदर्भात झालेल्या टीकाटिप्पणीतही स्पष्ट होते.



एका चर्चेत उपरोक्तसंदर्भात गांधीजींनी
“डॉ. मुंजेंचा अहिंसेवर विश्वास नाही, ते नागपुरात मुसलमांनाविरुद्ध लढत आहेत,” अशी टिप्पणी केली. त्याही वेळी “माझा अहिंसेवर विश्वास आहे, मी कोणावरही स्वतःहूनही हल्ला करणार नाही. कोणी माझ्यावर हल्ला केल्यास मी दोन लाठ्या शांततेने खाऊन घेईन, पण नंतरच्या लाठीला मात्र निकराने प्रतिउत्तर देईन,” असे स्पष्ट शब्दात गांधीजींसमोर प्रतिपादित केले. बुळी असलेली अहिंसेची संकल्पना, हिंदू-मुस्लीम ऐक्याचा दांभिकपणा असल्या भाबड्या गोष्टी या राष्ट्राला हानिकाराक ठरतील, हे डॉ. मुंजेंच्या दूरदृष्टीला आधीच दिसले होते. त्यावरची उपाययोजनादेखील त्यांच्या मनात सुस्पष्ट होती. प्रश्नमीमांसा व निराकरण करणारा आणि आपला राष्ट्रीय वारसा समृद्ध करणारा असा हा नेता होय. आपल्या मताशी सहमत नसणार्‍या लोकांना गांधीजींकडे सन्मान्य स्थान नसे व गांधीजींशी अहिंसेच्या मुद्द्यावर मतभेद म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वपक्षीय काँग्रेसबरोबर संबंधविच्छेद याची डॉक्टरांना पूर्ण जाणीव होती. परंतु, अहिंसेसंबंधी बोटचेपे धोरण ठेवणे व राष्ट्रहिताशी तडजोड करणे हे डॉ. मुंजेंना मान्य नव्हते. त्यामुळे पुढील संपूर्ण आयुष्यात त्यांना गांधीजींच्या जवळच्या नेत्यामध्ये स्थान मिळाले नाही व त्याचे त्यांनी वैष्यम्यही मानले नाही. राष्ट्रहित सतत नजरेसमोर ठेवून एतद्देशीय सैनिकी शिक्षणाचा पाया रचणार्‍या डॉ. मुंजेंनी पुढे केंद्रीय असेम्ब्लितदेखील मोलाची कामगिरी बजावली. गोलमेज परिषदेतील त्यांचे योगदान व हिंदू संघटक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी याचा मागोवा पुढील दोन लेखांद्वारे घेण्याचा प्रयत्न करूया.

(क्रमशः)

- डॉ. विवेक राजे

@@AUTHORINFO_V1@@