नमन नटवरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |

mansa_1  H x W:



कोकणासारख्या विकसनशील प्रदेशातील नाट्यप्रेमींना ‘आकर्षणा’पासून ‘आराधने’कडे आणण्याचं कार्य अविरतपणे करणारे नाटककार, दिग्दर्शक, लेखक आणि ‘रंगभूमीचे सेवेकरी’ प्रदीप शिवगण यांच्याविषयी...



बर्‍याच रंगकर्मींचं आवडतं वाक्य असतं की, मी रंगभूमीची अमुक अमुक वर्षं सेवा केली आहे. पण, एवढी वर्षं रंगभूमीची सेवा करायला किंवा तिच्याकडून आपली सेवा करून घ्यायला कुठून तरी योग्य सुरुवात व्हावी लागते. कोकणासारख्या वैभवसंपन्न, विकसनशील प्रदेशात ही भावी रंगकर्मी घडवण्याची योग्य सुरुवात प्रदीप शिवगण करत आहेत.

प्रदीप यांचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावचे. उत्तम रंगकर्मी असणार्‍या प्रदीप यांनी प्रथमत: विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. शालेय स्तरापासून नाटकांमध्ये त्यांचे मन रमू लागले. ही छोटीशी सुरुवातच पुढे त्यांना उत्तम दिग्दर्शकापर्यंत घेऊन गेली. महाविद्यालयामध्ये असताना त्यांनी युवा महोत्सव, नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. बक्षिसांचीही कमाई केली. विज्ञान शाखेत शिकत असतानाही त्यांची ओढ मात्र नाट्यकलेकडे होती. स्वत:ची ही आवड ओळखून त्यांनी ‘नाट्यशास्त्र’ विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले. अर्थातच, हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना घरातून विरोध झाला. पुढे विज्ञान शाखेतील पदवीच्या आधारे त्यांनी कोल्हापूरमध्येच ’मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून नोकरी पत्करली खरी, पण नोकरीसोबतच नाट्यशास्त्राचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही आवर्जून पूर्ण केले. पुढे प्रदीप नोकरीच्या निमित्ताने मुंबईत दाखल झाले. छोट्या-मोठ्या नोकर्‍या करत असतानाही त्यांनी आपली नाटकाची आवडही जोपासली. ’चार दिवस सासूचे’, ’साहेब’ अशा मालिकांमध्ये लहान-लहान भूमिकाही साकारल्या. ’सोकाजीराव टांगमारे’ हे त्यांनी केलेले पहिले व्यावसायिक नाटक. शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात ’गेस्ट लेक्चरर’ म्हणूनही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सर्व संघर्षाचे फलित म्हणजे, आज ते रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या ’रमेश कीर कला अकादमी’चे विभाग प्रमुख आहेत.


2_1  H x W: 0 x


मूळ कोल्हापूरचे असले तरी प्रदीप यांना कोकणातील जीवन कायम खुणावत राहिले
. कल्पनारम्य नाटकांपेक्षा त्यांना वास्तवदर्शी नाटके कायम भावली. त्यातूनच निर्मिती झाली ’कोकणातल्या झ्याकन्या’ , ’ती आमच्या गावची’ या वेबसीरिजची. या वेबसीरिज किंवा त्यांची संकल्पना असलेली नाटके पाहिली की, कोकणातील ग्रामीण संस्कृतीचा त्यांच्यावर असणारा प्रभाव अगदी सहज जाणवतो.

चित्रपटसृष्टी म्हटलं की, मुंबई, पुण्याशिवाय पर्याय दिसत नाही. परंतु, प्रदीप यांनी या समजुतीला छेद देत कोकणातील कलाकारांना सोबत घेऊन कोकणातच चित्रीकरण आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करून ’भोवनी’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाची संकल्पना, दिग्दर्शन, लेखन स्वत: त्यांनी केले असून पूर्णपणे कोकणात तयार झालेला ’भोवनी’ हा पहिलावहिला मराठी चित्रपट असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

प्रदीप यांनी दिग्दर्शित केलेली आणि पटकथा लिहिलेली नाटके बघितली तर कोकणातल्या स्वप्न उराशी बाळगणार्‍या तरुणाला ते न्याय देताना दिसतात. ’रापण’, ’भीती आणि भिंती’, ’पत्रं तुझी... माझी’, ’इयत्ता? उत्तर शून्य!’, ’यकृत’, ’ढेकर आख्यान’, ’यातनाघर’ , ’घाशीराम कोतवाल’, ’नवीन ओळख’ अशी अनेक नाटके त्यांनी कोकणातल्या कलाकारांना घेऊन केली. इतकेच नाही, तर त्या नाटकांमध्ये आपल्या लेखणीने आणि अभिनयाने अधिकच खुलवले. अभिनय कार्यशाळा, लघुचित्रपट निर्मिती कार्यशाळा, फिल्म कोर्सेस यांचे आयोजन ‘रमेश कीर कला अकादमी’तर्फे केले जाते. तसेच या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, म्हणूनही ते प्रयत्नशील असतात.


3_1  H x W: 0 x

प्रदीप यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी मोठी आहे. त्याची ’नांदी’ म्हणजे कोल्हापूर येथे झालेल्या नाट्यस्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकाला सहा पुरस्कार मिळाले. आजपर्यंत या पुरस्कारांचे जवळ जवळ १५० अंक पूर्ण झालेले आहेत. सतीश आळेकरांसारख्या ज्येष्ठ रंगकर्मींकडून कौतुकाची थाप मिळालेल्या प्रदीप यांना वाचनाचा आणि चित्रपट बघण्याचा छंद आहे. यात केवळ ’वाचणे’, ’बघणे’ नाही तर ते ‘जाणून घेणे’ आहे. त्यांचा स्वत:चा दीड हजार पुस्तकांचा आणि १२०० चित्रपटांचा स्वत:चा संग्रह आहे. त्यांनी राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत अभ्यासपूर्ण शोधनिबंधाचे वाचनही केलेले आहे.

पुढील दोन-तीन महिन्यात त्यांनी दिग्दर्शित केलेले आरती प्रभू लिखित ’एक शून्य बाजीराव’ हे नाटक सादर होणार आहे. तसेच ’आईनस्टाईन’ हे नाटक मराठीमध्ये ते स्वत: सादर करणार असून ’मागच्या बेंचवर’ ही त्यांची नवी संकल्पना असलेली वेबसीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोकणात नाट्यसंस्कृतीला नवीन वळण देणारे प्रदीप शिवगण यांचे कार्य नक्कीच सकारात्मक बदल घडवणारे आहे.

- वसुमती करंदीकर

 
@@AUTHORINFO_V1@@