महा‘ज्ञान’कवी अक्किथम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




मल्याळम कवी अक्किथम नंबुद्री यांची अत्यंत प्रतिष्ठेच्या ५५व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...


मल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम यांची २०१९ या वर्षीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ५५व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली
. अक्किथम अच्युथन नंबुथिरी असे त्यांचे पूर्ण नाव असून ते ‘अक्किथम’ या नावाने सुपरिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाट्य, टीकात्मक निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहित्याच्या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.


अक्किथम अच्युथन नंबुद्री यांचा जन्म १८ मार्च
, १९२६ रोजी दक्षिण भारतातील केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील ‘कुमारनल्लूर’जवळ येथे झाला. ते सध्या ९६ वर्षांचे आहेत. ‘अक्किथम’ हे त्यांचे कौटुंबिक आहे. त्यांच्या कुटुंबातील अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तीला स्वाभाविकच इच्छा होती की, अक्किथम हा एक महान वैदिक विद्वान होईल. अक्किथम आठ वर्षांचे असल्यापासूनच वडिलांनी त्यांना ‘ऋग्वेद’ शिकविण्यास सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे अक्किथम यांनी त्यावेळी संस्कृत भाषेत मल्याळम श्लोक लिहायला सुरुवात केली. संस्कृत, ज्योतिष व संगीत या विषयातील शालेय शिक्षणानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पण पदवी अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला नाही. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘उन्नी नंबुद्री’ मासिकाचा संपादक म्हणून केली, ज्यांचा उपयोग त्यांनी सामाजिक कार्यासाठी व्यासपीठ म्हणून केला. त्यांनी ‘मंगलोदयम्’ आणि ‘योगक्षेत्रम्’ मासिकांमध्ये ‘साहाय्यक संपादक’ म्हणूनही काम केले. १९५६ मध्ये ते ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या कोझिकोड केंद्रामध्ये पटकथा लेखक म्हणून रुजू झाले. त्याठिकाणी त्यांनी १९७५ पर्यंत काम केले आणि त्यानंतर त्यांची बदली आकाशवाणीच्या ‘थ्रिसुर’ केंद्रात झाली. १९८५ला ते आकाशवाणीमधून सेवानिवृत्त झाले.



‘श्रीमद् भागवता’चे त्यांनी केलेले भाषांतर हे त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. १४ हजार ६१३ श्लोकांच्या या अनुवादाचा हा २ हजार ४०० मुद्रित पृष्ठांचा ग्रंथ आहे. वेद आणि त्या संबंधित समस्यांना लोकप्रिय करण्यासाठी ‘अनादी’ या मासिकात त्यांची मोठी भूमिका होती. ते योगक्षेत्र सभेचे थ्रिसुर येथील सदस्य असल्याने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. या ठिकाणी महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. केरळच्या नंबुदीरी ब्राह्मणांमध्ये सामाजिक सुधारणांसाठी काम केले. तिरुनाया, कडावलूर आणि थ्रिसूर येथील प्रसिद्ध वैदिक अभ्यास केंद्रांच्या सहकार्याने वैदिक अभ्यासाला चालना देण्याचे काम केले. ते पंचल, तिरुवनंतपुरम येथे झालेल्या वैदिक विधीमागील प्रबळ पाठीराखे होते. ब्राह्मणेतर लोकांमध्येदेखील वैदिक ज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी उत्साहाने युक्तिवाद करून रुढीवादी नसलेल्या आधुनिक विचारसरणीसाठी त्यांनी युक्तिवाद केला. ते यात यशस्वीदेखील झाले. अक्किथम नेहमीच अस्पृश्यतेच्या पारंपरिक सामाजिक प्रथेच्या विरोधात होते. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध महत्त्वपूर्ण लढा ठरलेल्या ‘पलीयम सत्याग्रह’मध्ये भाग घेतला होता.



५०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात अक्किथम यांच्या साहित्य कृतींबाबत रसिकांमध्ये आकर्षण निर्माण झाले
. ‘इरुपथं नूतनडींत इतिहासांम’ (२० व्या शतकातील महाकाव्य) हे खंडकाव्य म्हणजे मल्याळम साहित्यातील पहिल्याच आधुनिक कवितांपैकी एक आहे. या पुस्तकाला १९५२ मध्ये ‘संजयन’ पुरस्कारही मिळाला. त्यांच्या काव्यसंग्रह, नाटकं आणि लघुकथांची सुमारे ४५ पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. ‘बलिदर्शनम’, ‘अरंगेताम’, ‘निमिषा क्षेत्रम’, ‘इडिनजू पॉलिंजा लोकम’, ‘अमृताघटक’ आणि ‘कालिककोटिल’ हे त्यांचे काही काव्यसंग्रह आहेत. ‘उपनयन’ आणि ‘समवर्तनम’ या दोन शोध निबंधांचे गद्यातील संग्रह त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाचे नमुने म्हणता येतील. देशबंधू चित्तरंजन दास यांनी लिहिलेल्या ‘सागर संगीत’ नावाच्या पुस्तकाचा अनुवाद अक्किथम यांनी मल्याळम भाषेत केला. अक्किथम यांच्या साहित्याचा देशी आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. १९५२ मध्ये अक्किथम यांना ‘संजयन’ तर १९७२ मध्ये ‘बलिदर्शनम’या कवितेला ‘केरळ साहित्य अकादमी पुरस्कार’ देण्यात आला. १९७३ मध्ये त्यांना दोन मोठे सन्मान मिळाले ते म्हणजे ‘बलिदर्शनम’साठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ आणि ‘निमिषा क्षेत्रम’साठी ‘ओडक्कुझल पुरस्कार.’



१९९४ मध्ये त्यांना
‘आसन स्मारक कविता पुरस्करम’साठी निवडले गेले आणि दोन वर्षांनंतर १९९६मध्ये ‘ललितांबिका अंतर्जनाम स्मारक साहित्य पुरस्कारसाठी त्यांची निवड झाली आणि त्यानंतर १९९७ मध्ये त्यांना ‘वल्लथोल पुरस्कार’ मिळाला. ‘मातृभूमी पुरस्कार’, ‘वायलर पुरस्कार’ आणि कबीर सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. २०१७ मध्ये त्यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते तो पुरस्कार स्वीकारण्यास जाऊ शकले नाही. नंतर हा पुरस्कार त्यांना सरकारमार्फत पलक्कडच्या जिल्हाधिकार्‍यांनी सुपूर्द केला. त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करणारी ‘अरिकील अक्किथम’ ही ई. सुरेश दिग्दर्शित डॉक्युमेंटरी आहे, ज्यामध्ये या महान कवीच्या जीवनाची माहिती त्यांची मुलगी ‘श्रीजा’च्या दृष्टिकोनातून सादर केली आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी श्रीदेवी यांच्यासह दोन मुले व चार मुली आहेत. प्रख्यात चित्रकार अक्किथम नारायणन हे त्यांचे धाकटे भाऊ आहेत. वयाच्या ९६व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या महान कवी आणि साहित्यिकाला दै. मुंबई तरुण भारतचा मनाचा मुजरा!


- गायत्री श्रीगोंदेकर 


 

@@AUTHORINFO_V1@@