मंदिर भी बनेगा तो बनेगा धुमधामसे।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2019
Total Views |





स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेली अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची नीती पुढेही तशीच सुरू राहिली. त्यामुळे १५२८ पासून सुरू असलेल्या अयोध्येच्या श्रीरामजन्मस्थान मुक्तीच्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. १५२८ पासून सातत्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष अविरत सुरू होता. त्यात कुठेही खंड पडला नाही.


एखाद्या राष्ट्राची भूमी बळकावली गेली तर शौर्याने ती पुन्हा प्राप्त करता येऊ शकते
. राष्ट्राची संपत्ती नष्ट झाली तर परिश्रमाने ती पुन्हा निर्माण करता येईल. देशाची राजसत्ता पराभूत झाली तर पराक्रमाची शर्थ करून ती पुन्हा मिळविता येऊ शकते, पण जर का राष्ट्राचे स्वत्व, अस्मिता, स्वाभिमान आपण गमावला तर कोणतेही शौर्य, पराक्रम, परिश्रम तो परत आणू शकत नाहीत. म्हणूनच भारतातील वीर पुरुषांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही अनेक संकटांशी झुंजत आपल्या राष्ट्राचे स्वत्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. याच राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणाचे आणि पुनर्निर्माणाचे प्रतीक म्हणजे श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माणाचा संकल्प. म्हणूनच आपले माजी पंतप्रधान अटलजी आपल्या एका कवितेत म्हणतात, “यह राष्ट्र केवल जमीन का टुकड़ा नही, यह तो जीताजागता राष्ट्रपुरुष है। यह वंदन की भूमी है, यह अभिनंदन की भूमी है। यह अर्पण की भूमी है। यह तर्पण की भूमी है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदू बिंदूगंगाजल है। हम जियेंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए।”



१९४७ साली इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त झाला
, पण त्याचवेळी भारताची फाळणी झाली. देशातील जनतेने मनावर दगड ठेवून हे विभाजन स्वीकारले. देशातील जनतेला वाटले, उर्वरित हिंदुस्थानात का होईना आपल्या स्वत्वाची, अस्मितेची प्रतिष्ठापना होईल. सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुढाकाराने सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या निर्णयाने भारतीय मन सुखावले. त्याला वाटले, आता या देशातील गुलामीची चिन्हे पुसली जाणार आणि देशाच्या स्वाभिमानाचे रक्षण होणार. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही आणि स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेली अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची नीती पुढेही तशीच सुरू राहिली. त्यामुळे १५२८ पासून सुरू असलेल्या अयोध्येच्या श्रीरामजन्मस्थान मुक्तीच्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. १५२८ पासून सातत्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष अविरत सुरू होता. त्यात कुठेही खंड पडला नाही. १९८३ साली तामिळनाडूतील मीनाक्षीपुरम येथे झालेल्या हिंदूंच्या सामूहिक धर्मांतरणाचे पडसाद सर्व देशभर उमटले. या घटनेच्या संदर्भात जनजागरण करण्याच्या हेतूने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून एकात्मता यात्रेचे आयोजन करण्यात आले. भारतमाता आणि गंगामाता ही दोन प्रतिके घेऊन निघालेल्या एकात्मता यात्रेला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.



मीनाक्षीपुरमची घटना आणि त्यानंतर निघालेल्या एकात्मता यात्रेच्या अभूतपूर्व यशस्वी आयोजनानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली १९८४ मध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले
. त्यावेळी धर्मसंसदेच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची घोषणा करण्यात आली आणि एका अर्थाने वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या राष्ट्रीय अस्मितेच्या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्याच काळात माझा विश्व हिंदू परिषदेच्या कामाशी संबंध आला. १९८४ नंतर बघता बघता या आंदोलनाची धार वाढत गेली. श्रीराम जानकी यात्रांनी संपूर्ण उत्तर भारत ढवळून निघाला. १९८९ ला हरिद्वारच्या संत संमेलनात श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी लागणार्‍या विटांचे पूजन देशातील प्रत्येक गावात व्हावे आणि पूजित शिला (वीट) अयोध्येला पाठवावी, असा एक कार्यक्रम संतांनी जाहीर केला. मी त्यावेळी प्रभादेवी येथील आदर्श नगर वसाहतीत राहात होतो. माझ्याकडे वरळी नगरात संपन्न करावयाच्या कार्यक्रमांची जबाबदारी होती. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याच कामाचा अनुभव माझ्या गाठीशी नव्हता.



माझा त्यापूर्वी संघाच्या कामाशीही संबंध नव्हता
. अशा स्थितीत हे कसे करता येईल, असे भलेमोठे प्रश्नचिन्ह मनात घेऊन संघपरिवारातील कार्यकर्त्यांची एक बैठक वरळीतील बीडीडी चाळीतील संघ कार्यालयात बोलावली. बैठकीत विषय मांडला. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ‘हे कसे होणार?’ हाच भाव होता. शेवटी न राहून एका कार्यकर्त्याने विचारले, “शिक्षक, या विटांचे पूजन करायला कोण येणार? आपण लोकांना गृहीत धरत आहोत का?” खरेतर मलाही मनातून असेच वाटत होते. पण, प्रमुख असल्यामुळे उसना आव आणून म्हटले, “आपल्या अधिकार्‍यांनी याचा नक्कीच विचार केला असेल, आपण १०० टक्के प्रयत्न करायचे. अगदीच जमले नाही तर आपल्या स्वतःच्या घरी सत्यनारायण पूजेचे आयोजन करुन त्या ठिकाणी या वीटेचे पूजन करू.” प्रयत्न करायचा, असे ठरवून बैठक संपली. वरळीतला पहिला कार्यक्रम जुनी प्रभादेवीजवळ असलेल्या नारीयलवाडी वस्तीत घेतला. कमलाशंकर मिश्रा हे टॅक्सी ड्रायव्हर आणि रामभवन बिंद हा बॉम्बे डाईंग मिलमध्ये काम करणारा कामगार या दोघांनी जबाबदारी स्वीकारली. वस्तीतील छोट्या मंदिरातच शिलापूजन कार्यक्रम ठरला.



माझ्या मनात धाकधूक होती
. त्याच मनःस्थितीत मी त्या वस्तीत गेलो आणि पाहातो तर काय, संपूर्ण वस्ती शिलापूजन कार्यक्रमाला आली होती. भाषा, प्रांत, पंथ, संप्रदाय सारे भेद गळून पडले होते. मी हिंदू! मी श्रीरामभक्त! या भावनेने सर्व आबालवृद्ध सहभागी झाले होते. श्रीरामनामाने दगड तरंगल्याचे ऐकले होते पण यावेळी श्रीरामाच्या नावाने संपूर्ण हिंदू समाज एकवटला होता. पूजनानंतर रामभवन बिंद यांनी पूजित शिला (वीट) आपल्या डोक्यावर घेतली आणि वाजतगाजत रामनामाच्या घोषात वस्तीतील जवळपास ३०० नागरिकांची मिरवणूक निघाली. जुनी प्रभादेवी ते जांबोरी मैदान असे जवळपास चार किमीचे अंतर पायी चालत पूजित शिला अयोध्येला पाठविण्यासाठी आमच्या स्वाधीन केली. देशभरात सर्वच ठिकाणी हाच अनुभव होता. वरळी कोळीवाडा तर काँग्रेसचा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला. सतत ४० वर्षे कम्युनिस्ट नगरसेवक मणिशंकर कवटे त्या मतदार संघातून निवडून येत होते. संघ परिवारातील एखादा कार्यकर्ता दिसला तर कुठूनतरी आवाज येई. जनसंघ -हवातंग. अशा वरळी कोळीवाड्यातील हनुमान मंदिरात शिलापूजन कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर त्या शिलेची मिरवणूक निघाली. पालखी मंदिरातून बाहेर पडताच कोळी-महिला पुरुषांची एकच झुंबड उडाली. पालखी खांद्यावर घेण्यासाठी पुढे होते काँग्रेसचे नेते वसंत नाखवा आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते भालचंद्र गावडे. त्या मिरवणुकीचे वर्णन करण्याकरिता माझ्याकडे शब्द नाहीत. तो कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेचा, संघ परिवाराचा नव्हताच. तो संपूर्ण समाजाच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम होता.



दि
. ९ नोव्हेंबर, १९८९ रोजी अयोध्येत प्रस्तावित श्रीराम मंदिराचा शिलान्यास करण्याचे ठरले. ठरलेल्या दिवशी शिलान्यास व्हावा म्हणून देशभरातील नागरिकांनी सकाळी ११ वाजता अयोध्येच्या दिशेने पुष्प अर्पण करावीत, असे आवाहन संतांनी केले होते, मी त्यावेळी कॅनरा बँकेच्या वरळी शाखेत कार्यरत होतो. त्या शाखेत एकूण ८० चा स्टाफ होता. यात मी एकटाच भारतीय मजदूर संघाशी संलग्न एनओबीडब्लू संघटनेचा सदस्य होतो. अन्य सर्व कम्युनिस्ट प्रणित एआयबीईएचे सदस्य होते. त्या युनियनचे पुढारी वसंत जमदाडे आणि मेघश्याम वैती या दोघांना विनंती केली. ठरलेल्या दिवशी सकाळी ११ वाजता सर्वच्या सर्व ८० जण शाखेच्या बाहेर आले. हातात अक्षता आणि फुले घेऊन ती अयोध्येच्या दिशेने अर्पण केली. धर्म ही अफूची गोळी आहे, असे मानणार्‍या कम्युनिस्ट विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या मनातील श्रीराम जागृत करण्याचे काम या आंदोलनाने केले होते.



दि
. ३० ऑक्टोबर, १९९२ रोजी धर्मसंसदेचे अधिवेशन भरले. ६ डिसेंबर, १९९२ ला कारसेवा सुरू करण्याची घोषणा झाली. ‘लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगे,’ या निर्धाराने कारसेवकांचे जथ्थे अयोध्येच्या दिशेने निघाले. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंगांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे शासन होते. देशाच्या मंदिर भी बनेगा तो बनेगा धुमधामसे। कानाकोपर्‍यातून लक्षावधी कारसेवक अयोध्येत येत होते. अयोध्येच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते कारसेवकांनी फुलून गेले होते. देशी-विदेशी पत्रकार आपापले कॅमेरे सरसावून सज्ज होते. न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. ‘तारीख पे तारीख’ असा खेळ सुरू होता. शेवटी २८ नोव्हेंबर, १९९२ रोजी उच्च न्यायालयाने प्रतिकात्मक कारसेवा करण्याचा आदेश दिला. कोणत्याही प्रकारच्या निर्माण कार्यावर प्रतिबंध केला. या निर्णयामुळे संपूर्ण रामभक्तांमध्ये क्षोभ पसरला. आम्ही सारे कारसेवक क्षुब्ध होतो. आता रिकाम्या हाताने परत येणार नाही, असे सांगूनच आम्ही घरून निघालो होतो. प्रतिकात्मक कारसेवेने आम्ही आमच्या गावी-शहरांत कोणत्या तोंडाने जाणार, असाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. शेवटी ६ डिसेंबरचा दिवस उजाडला. वादग्रस्त वास्तूसमोरील भव्य व्यासपीठावर स्वामी वामदेव महाराज, महंत अवैद्यनाथ, साध्वी ऋतंभरादेवी, लोकनेते अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मा. शेषाद्रीजी असे सर्व मान्यवर स्थानापन्न झाले होते.



आचार्यांनी पवित्र कलश हातात घेऊन मंदिर निर्माणाचा संकल्प सोडला आणि मंचावर बसलेल्या लक्षावधी कारसेवकांच्या मुखातून निघालेल्या
जय श्रीराम’ घोषणेने सारा आसमंत दणाणून गेला. तेवढ्यात वादग्रस्त वास्तूच्या घुमटावर चढणारे एक-दोन कारसेवक दिसले. त्यांना बघताच अन्य कारसेवकांच्या संयमाचा बांध फुटला. श्रीरामाचा जयघोष करत सारी वानरसेना तुटून पडली. हातात मिळेल त्या हत्याराने त्या ढाँचावर तुटून पडले. प्रचंड शक्तीनिशी पडणार्‍या घणाच्या घावाने ४५० वर्षांची उद्दाम परंपरा डळमळू लागली. त्या गर्दीत एक पंधरा वर्षांची तरुणी बघता बघता दोरीच्या साहाय्याने घुमटावर चढली आणि कमरेला बांधलेला भगवा ध्वज तिने फडकावला. सभोवतालच्या लक्षावधी मुखांतून हर्षाचा चित्कार निघाला, “हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है।” या घोषणांनी सारे वातावरण रोमांचित झाले. इकडे सहस्त्रावधी हात आपल्या आंतरिक तिडकीने आघात करीत होते. एवढ्यात प्रचंड आवाज झाला. दुपारी दोनच्या सुमारास डाव्या बाजूचा घुमट बघता बघता कोसळला. साडेतीन वाजता उजवा घुमट आणि पाच वाजण्याच्या सुमारास मुख्य घुमट कोसळला. आम्हा कारसेवकांच्या अंगात हजारो हत्तींचे बळ संचारले होते. हजारो वर्षांच्या गुलामीच्या शृंखला तुटून पडल्या होत्या. मी आयुष्यात यापूर्वी कधीही इतका बेभान होऊन नाचलो नव्हतो. युगायुगातून एखाद वेळेस येणारी दिवाळी आम्ही अनुभवत होतो. स्वातंत्र्यापूर्वीचे आंदोलन माझ्या पिढीने पाहिले नव्हते. पण जनतेचा सहभाग म्हणजे काय याची अनुभूती मी घेत होतो. आयुष्य तृप्त होणे म्हणजे काय असते, याचा अनुभव आम्ही घेत होतो. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच आमची अवस्था झाली होती.



बाबरीचा विध्वंस झाला होता
. आम्ही तंबूत परतलो. कलंक पाडल्याची खूण म्हणून एक वीट सोबत घेतली होती. आम्हाला आदेश आला, ‘ताबडतोब अयोध्या खाली करा.’ रात्रीचे अकरा वाजले असतील. मुंबईतील एका राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आमच्या तंबूत आले, आमच्या कार्यकर्त्यांच्या हातातील वीट घेऊन त्यांनी फोटो काढला आणि निघून गेले. आम्ही निघण्याच्या तयारीला लागलो. १० तारखेला मुंबईत उतरलो. वर्तमानपत्रात बघतो तर काय आमच्याकडून वीट घेणार्‍या त्या कार्यकर्त्याचा फोटो व त्याखाली शिर्षक, ‘आम्ही कारसेवा केली. करून दाखवले.’ त्यांच्या नेत्याने घोषणा केली, “बाबरी ढाँचा पाडणार्‍या आमच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे.” वास्तविक असे म्हणणारे अयोध्येत कुणीच आले नव्हते. पण असो. आमचे संस्कार सांगत होते, ‘असू आम्ही पत्थर पायाचे. मंदिर उभविणे हेच अमुचे काम.’ श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. शेकडो वर्षांचे स्वप्न आता साकार होणार आहे. माझ्या तारुण्यात या आंदोलनात मला खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मिळाले, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता प्रतीक्षा आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची. सत्याचा विजय होणार, यात तिळमात्र शंका नाही. यावेळी साध्वी ऋतंभरांच्या भाषणातील ओळी आठवतात..

तंबू भी तनेगा तो तनेगा शानसे

बंबू भी लगेगा तो लगेगा शानसे

मंदिर भी बनेगा तो बनेगा धुमधामसे।

- मोहन सालेकर

@@AUTHORINFO_V1@@