अंधेरा छटेगा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Nov-2019
Total Views |




अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा, यातून काँग्रेस-रा. काँग्रेस, समाजवादी, साम्यवादी वगैरे वगैरे सर्वांच्या रूपातील अंधःकार दूर होईल आणि राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ विचारांचा अरुणोदय होईल, हीच आकांक्षा बाळगलेली आहे. म्हणूनच भाजपचे कमळ आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाने एकत्र येऊन सत्ता हाती घेण्याचा मनसुबा बाळगणार्‍या काँग्रेसच्या पंजाला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला सत्तेबाहेरच ठेवले पाहिजे. तेच दोन्ही पक्षांच्या, त्यांच्यावर प्रेम करणार्‍या कोट्यवधी जनांच्या हिताचे ठरेल.



अंधेरा छटेगा

सूरज निकलेगा

कमल खिलेगा

भारतीय जनता पक्षाचे संस्थापक, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० साली एका जनसभेला संबोधित करताना वरील काव्यपंक्तीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मनात दुर्दम्य आशावादाचा वन्ही चेतवला. तद्नंतर निवडणुका आल्या आणि गेल्या, सरकारे आली आणि गेली, पण एका निश्चित ध्येयाने वाटचाल करणार्‍या भाजपने आणि पक्ष कार्यकर्ते-नेत्यांनी सर्व अडथळ्यांचा, संकटांचा धीराने सामना केला. त्यातूनच राष्ट्रवादी-हिंदुत्वनिष्ठ विचारांचे पहिले पंतप्रधान म्हणून अटलजींनी शपथ घेतली. परंतु, राजकारणातील घात-विश्वासघाताने केवळ एका मताने त्यांना पंतप्रधानपद गमवावेही लागले. तरीही न डगमगता नावाप्रमाणेच अटळ राहत ते पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले आणि पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. पुढे अटलजी २००४ पर्यंत देशाच्या सर्वोच्चपदी राहिले. केवळ दोन खासदारांपासून सुरू झालेला भाजपचा प्रवास २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकहाती केंद्रीय सत्तेपर्यंत आणि २०१९ साली मोदी-अमित शाह यांच्या कुशल रणनीतीच्या जोरावर ३००+ जागांपर्यंत पोहोचला. देशातल्या सर्वाधिक राज्यांत भाजपची सरकारे आली, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतही भाजपचा झेंडा फडकला. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा.



गेली पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहून राज्यातील जनतेच्या प्रश्न व समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्याच्या इच्छाशक्तीने फडणवीस यांनी काम केले
. ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने फडणवीसांच्या कारभाराचा हवाला देत मते मागितली. निकालानंतरही भाजपच राज्यातला सर्वांत मोठा पक्ष ठरला व त्याने १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या. पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदी आलेल्या नेत्याने स्वतःच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवून १०० पेक्षा अधिक जागी विजयपताका फडकविण्याचा हा विक्रमच. २६ टक्क्यांच्या आसपास मते मिळवून इथे भाजपचा स्ट्राईक रेट सुमारे ७० टक्क्यांच्याही पुढे होता. म्हणजेच राज्यातील जनतेनेही सर्वाधिक पसंती भाजपलाच दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत राबविलेल्या नवनवीन कल्पक योजनांना, आखलेल्या कृतीकार्यक्रमांना जनतेने स्वीकारल्याचा हा दाखला होता. म्हणजे शेतकर्‍यांसाठीची जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, छोट्या व मध्यम बंधार्‍यांची उभारणी, तसेच रस्ते-महामार्ग, रेल्वे-मेट्रोचे जाळे, गुंतवणुकीसाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र, फूड पार्क, पायाभूत सुविधांचा विकास आणि माओवादी-नक्षलवाद्यांना घातलेले वेसण, मोडून काढलेली गुंडगिरी या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली ही पोचपावतीही होती.



निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राज्यातली परिस्थिती एकदम बदलली
, आता त्यावर फार काही भाष्य करण्याची वेळही नाही. परंतु, गेल्या १४-१५ दिवसांत हिंदुत्वासाठी एकत्र आलेल्या दोन पक्षांतील बेबनाव त्यांना विचारधारेपोटी मतदान करणार्‍यांना वेदना देणाराच राहिला. आयुष्यभर राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ विचारांचा दिवा हाती घेऊन विरोधकांच्या विरोधाला न जुमानता देशभक्तांचे, स्वदेशप्रेमींचे, संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍यांचे सरकार सत्तेवर यावे यासाठी धडपडणार्‍या प्रत्येकाच्या हृदयाला पीळ पाडणारा हा काळ होता. कारण मतदारांनी दिलेला जनादेश हा केवळ भाजप व शिवसेनेला दिलेला नव्हता तर राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ विचाराने राज्य चालावे, यासाठी दिलेला होता. भाजप व शिवसेनेच्या मतांची एकत्रित टक्केवारी काढली तर ती ४२ टक्के इतकी होते. म्हणजेच इतक्या टक्के लोकांना महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकावा आणि विकासाची गंगा वाहावी, अशीच अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत तरी तसे काही घडले नाही, ही महाराष्ट्राच्या, राज्यातल्या जनतेच्या, मतदारांच्या, राष्ट्रवादी-हिंदुत्वनिष्ठ विचारधारेच्या, विकासाच्या पथिकांच्या दृष्टीने दुर्दैवी घटनाच म्हटली पाहिजे. तरीही सारे काही संपलेले नाही.



त्याचे कारण असे की
, महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे इंजिन म्हटले जाते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशातील सर्वाधिक औद्योगिकरण, पर्यायाने सर्वाधिक कर संकलन होणारे राज्यही महाराष्ट्रच आहे. अशा सर्वच मुद्द्यांच्या म्हणजे राष्ट्रवाद असो वा हिंदुत्व, औद्योगिकरण असो वा आर्थिक विकास, यासाठी राज्यात एका मजबूत आणि स्थिर सरकारची आवश्यकता आहे आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी तसे सरकार स्थापन करण्याचा कौल भाजप व शिवसेना महायुतीलाच दिलेला आहे. इथेच एका विचारांच्या या दोन्ही पक्षांनी एकत्र आल्याशिवाय राज्याला स्थिरता मिळू शकत नाही, ही बाब स्पष्ट होते. म्हणूनच आजची राजकीय परिस्थिती कशीही असो, भाजप व शिवसेनेने मिळून सरकार स्थापन करायला हवे. सुरुवातीला अटलजींच्या कवितेचा उल्लेख केला तो यासाठीच. शून्यातून सुरुवात करून देशावर सत्ताधिकार राबविणारा अटलजींचा, त्यांच्या पक्षाचा विचार आणि बाळासाहेबांचा विचार एकच होता. दोन्ही पक्षांनी एकच लक्ष्य समोर ठेऊन युती केली आणि ती टिकवलीही. आताच्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीत तर या दोन्ही विचारांनी एकत्र येण्याची अपरिहार्य गरज आहे. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा, यातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, साम्यवादी वगैरे वगैरे सर्वांच्या रूपातील अंधःकार दूर होईल आणि राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ विचारांचा अरुणोदय होईल, हीच आकांक्षा बाळगलेली आहे. म्हणूनच भाजपचे कमळ आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाने एकत्र येऊन सत्ता हाती घेण्याचा मनसुबा बाळगणार्‍या काँग्रेसच्या पंजाला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला सत्तेबाहेरच ठेवले पाहिजे. तेच दोन्ही पक्षांच्या, त्यांच्यावर प्रेम करणार्‍या, त्यांच्या विचारांप्रति कळकळ वाटणार्‍या, निष्ठा वाहणार्‍या कोट्यवधी जनांच्या हिताचे ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@