लग्नपत्रिकेला हायटेक बनविणारा डिजिटल दवंडीकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2019   
Total Views |




प्राचीन काळी गावात दवंडी देऊन लग्नासाठी निमंत्रित केले जाई. विशेषत: राजघराण्यातील लग्नाची निमंत्रण देण्याची ती पद्धत होती. दवंडी ऐकून लोक लग्नाला जात. पुढे दवंडीची जागा लखोट्याने घेतली. लखोट्याची जागा लग्नपत्रिकेने घेतली. आता तर पत्रिका व्हॉट्सअ‍ॅप, मोबाईल अ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांद्वारे पाठवल्या जातात. एका मराठी युवा उद्योजकाने मात्र डिजिटल लग्नपत्रिका संकेतस्थळाच्या रूपाने तयार केली आहे. त्याच्या मते अशा प्रकारची मराठी समाजातील लग्नाची ही पहिलीच पत्रिका आहे. हा अनोखा प्रयोग त्याने स्वत:च्या लग्नपत्रिकेपासूनच सुरू केला आहे. या युवा उद्योजकाचे नाव आहे प्रतीक ढोले. 'सिल्व्हरहॅश डिजिटल मार्केटिंग' या संस्थेचे ते संचालक आहेत.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्ती घेतलेले श्रावण ढोले आणि पेशाने शिक्षक असलेल्या श्रद्धा ढोले यांचा प्रतीक हा मुलगा. विरारच्या उत्कर्ष विद्यालयातून त्याने शालेय शिक्षणाचे धडे घेतले. दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पार्ल्याच्या भगुबाई पॉलिटेक्निक महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका संपादन केली. यानंतर अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी प्रतीकने थेट इंग्लंड गाठले. तेथील कॉव्हेन्ट्री विद्यापीठातून त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. आपल्या देशापासून दूर गेल्याने त्या देशातील संस्कृती, तंत्रज्ञान हे त्याला जवळून अभ्यासता आले. २०१५ साली प्रतीक भारतात आला. सोबत घेऊन आला एक आयडिया. आयडिया होती गाड्यांच्या तंत्रज्ञानाची. 'नवीकरन प्रायव्हेट लिमिटेड' नावाने कंपनी स्थापन करून प्रतीक व्यवसाय करू लागला.

 

पहिल्यांदाच अश प्रकारची बिझनेस आयडिया राबविताना वेळ लागत होता. याचदरम्यान त्याची लहानपणीची मैत्रीण असलेली गौरवी वर्तक हिच्याशी एका वेगळ्या व्यवसायासंदर्भात बोलणं झालं. गौरवीने 'इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्स' विषयातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली होती. त्यानंतर 'ऑपरेशन' या विषयामध्ये 'एमबीए' ही पदव्युत्तर पदवीसुद्धा प्राप्त केली. गौरवी आणि प्रतीक यांनी एकत्र येऊन डिजिटल मार्केटिंगला नवीन आयाम देण्यासाठी कंपनी स्थापन केली. 'सिल्व्हरहॅश डिजिटल मार्केटिंग' असं या कंपनीचं नाव. याच काळात प्रतीकनेसुद्धा दूरशिक्षण पद्धतीद्वारे एका ख्यातनाम संस्थेतून ई-कॉमर्स विषयात एमबीए पूर्ण केलं. आता दोघेही व्यावसायिक भागीदार म्हणून काम करू लागले. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ), सर्च इंजिन मार्केटिंग (एसईएम), सोशल मीडिया मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, वेबसाईट डेव्हलपर अशा विविध सेवा ते 'सिल्व्हरहॅश' अंतर्गत देतात.

 

याचा लाभ इव्हेंट कंपन्या, गायक, काही स्टार्ट-अप्स, रेस्टॉरंट, लाईफस्टाईल, रिअल इस्टेट या क्षेत्रातील ग्राहकांनी घेतला आहे. दहाजणांची टीम 'सिल्व्हरहॅश'चा डोलारा सांभाळत आहे. त्यानंतर गौरवी आणि प्रतीक यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरातल्या सदस्यांनी होकारही दिला. मात्रआपलं लग्न संस्मरणीय व्हावं, या हेतूने त्यांनी लग्नपत्रिका डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल मार्केटिंगचे कौशल्य वापरून निव्वळ डिजिटल न करता तिचं एका संकेतस्थळामध्ये रूपांतर केलं. यामध्ये एका लग्नाची थोडक्यात गोष्टच जणू सांगितलेली आहे. लग्नाअगोदरचे फोटोज, लग्नसमारंभासंदर्भातील विविध विधी, हळदीचा कार्यक्रम या सगळ्यांचे नोटिफिकेशन्स नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला वेळोवेळी मिळणार आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्यांच्या संकेतस्थळावर पोहोचता येते. लग्नपत्रिकेवरचा बारकोड मोबाईलमध्ये स्कॅन केल्यानंतर लग्न व स्वागत समारंभाची छायाचित्रे थेट आता मोबाईलमध्ये पाहता येणार आहेत. ही खरंच एक अभिनव कल्पना, प्रतीक आणि गौरवी हे युवा उद्योजक स्वत:च्या लग्नापासून सुरू करत आहेत.
 

इतर विवाहेच्छुक जोडप्यांसाठीदेखील अशाप्रकारचे तंत्रज्ञान ते उपलब्ध करून देणार आहेत, ते देखील अगदी माफक दरात. अशाप्रकारचे लग्न म्हणजे टेक्नोसॅव्ही असणार्‍या या पिढीचं हे प्रतिनिधीत्वच म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे हे संकेतस्थळ कायमस्वरूपी उपलब्ध असल्याने बाळाचा जन्म, त्याचं पहिलं पाऊल, त्याचे पहिले बोल, त्याचा शाळेचा पहिला दिवस ते अगदी त्याचं लग्न असा नव्या पिढीचा आकारास येणारा इतिहास आणि अगदी पणजोबांपासूनचा उपलब्ध असणारा इतिहासदेखील या संकेतस्थळावर साठविता येणार आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या घराण्याचा इतिहास जगासमोर उलगडता येणार आहे. यापुढे तुमचं नाव सामान्य लोक फेसबुकवर शोधणार नाही तर ते गुगल करतील. त्यामुळेच पर्यावरणपूरक अशी ही पत्रिका ट्रेंडसेटर ठरेल, हे नक्की! लग्नपत्रिकेला हायटेक बनविणारे प्रतीक ढोले खर्‍या अर्थाने डिजिटल दवंडीकार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@