‘ही’ मनाई योग्यच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2019
Total Views |





विश्वचषकाच्या सामन्यांनंतर
38 वर्षीय महेंद्रसिंह धोनी जरी क्रिकेटपासून दूर असला, तरी सध्याच्या घडीला तो भारतीय संघाचा एक खेळाडूच आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून त्याने निवृत्ती न घेतल्याने समालोचनासाठी नियमांनुसार त्याला केलेली ही मनाई योग्य ठरल्यास वावगे ठरणार नाही.



भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या
(बीसीसीआय) अध्यक्षपदी विराजमान झाला आणि दिवस-रात्र (डे-नाईट) कसोटी भारतात खेळविण्याचा ऐतिहासिक निर्णय त्याने घेतला. दिवस-रात्र कसोटी भारतीय धर्तीवर खेळविण्याची ही पहिलीच वेळ असल्याने याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. ऐतिहासिक कसोटीचे महत्त्व प्राप्त झालेला हा सामना क्रिकेट रसिकांना आनंदाची पर्वणी देणारा ठरावा, यासाठी बीसीसीआयही प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या सामन्यादरम्यान समालोचकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त काही समाजमाध्यमांवर पसरले आणि त्याच्या निवृत्तीबाबतच्या वावड्या पुन्हा जोमाने पसरण्यास सुरुवात झाली.



ऐतिहासिक क्रिकेट कसोटी असल्याने महेंद्रसिंह धोनीला काही वेळासाठी समालोचन करण्याची मुभा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती
. कसोटी संघातून धोनीने याआधीच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांदरम्यान तो आता समालोचकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, नियमांत बसत नसल्याने हे शक्य नसल्याचे कळताच महेंद्रसिंह धोनीच्या निकटवर्तीयांनी तो समालोचन करताना दिसणार नसल्याचे स्पष्ट केले. महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये राजीनामा दिला असला तरी तो बीसीसीआयचा एक करारबद्ध खेळाडू आहे. एकदिवसीय आणि टी-20 संघाचा तो खेळाडू असून अद्याप त्याने निवृत्ती पत्करलेली नाही. बीसीसीआयशी करारबद्ध असल्यास नियमानुसार त्याला समालोचन करता येत नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास आर्थिक भुर्दंड आणि सामन्यांच्या बंदीच्या शिक्षेची तरतूदही आहे. त्यामुळे धोनीने ही जोखीम पत्करलेली नाही. विश्वचषकाच्या सामन्यांनंतर 38 वर्षीय महेंद्रसिंह धोनी जरी क्रिकेटपासून दूर असला, तरी सध्याच्या घडीला तो भारतीय संघाचा एक खेळाडूच आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून त्याने निवृत्ती न घेतल्याने समालोचनासाठी नियमांनुसार त्याला केलेली ही मनाई योग्य ठरल्यास वावगे ठरणार नाही.



‘तिसरा डोळा’च सर्वश्रेष्ठ



क्रिकेट विश्वात सध्या
‘नो-बॉल’चे प्रकरण चांगलेच गाजत आहे. ‘नो-बॉल’बाबत पंचांनी दिलेले अनेक निर्णय आत्तापर्यंत वादग्रस्त ठरले असून याबाबत अचूक निर्णय देणारी एक स्वतंत्र प्रणाली असावी, असे मत आत्तापर्यंत अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी नोंदवले आहे. ‘नो-बॉल’चे निकष ठरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात आल्यानंतरही अचूक निर्णय देण्यात हे प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे जाणवून आल्यानंतर आगामीइंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेच्या सामन्यांदरम्यान ‘नो-बॉल’चा निर्णय देण्यासाठी चौथ्या पंचाची नियुक्ती करण्यात येणार असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येताच चौथ्या पंचाची खरंच गरज आहे का, याबाबत आता अनेकांनी आपली मते नोंदविण्यास सुरुवात केली आहे. ‘नो-बॉल’च्या निर्णयासाठी तिसरा पंचच (थर्ड अम्पायर) सर्वश्रेष्ठ असल्याचे बहुतांश जणांचे म्हणणे आहे.



चौथ्या पंचांपेक्षा तिसरे पंचच ही कामगिरी अधिक उत्तमरित्या पार पाडू शकतात
, असे मत काही माजी क्रिकेटपटू नोंदवत आहेत. क्रिकेट सामन्यांत आत्तापर्यंत मैदानावर दोन पंच उपस्थित राहण्याची परंपरा आहे. तिसरे पंच हे मैदानाबाहेरील स्टुडिओत बसून विविध तांत्रिक बाबी पडताळून आपले निर्णय जाहीर करत असतात. अलीकडे सुरू झालेल्या ‘रिव्ह्यू सिस्टिम’दरम्यान (निर्णय पुनर्पडताळणी) तर सामन्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे झाल्यास ‘मॅच रेफ्री’ (सामना निर्णय अधिकारी) यांचीही नियुक्ती करण्यात आलेली असते. तिसरे पंच निर्णय देताना सर्वात आधी ‘नो बॉल’ आहे की नाही, हे पाहूनच पुढील निर्णय जाहीर करतात. त्यामुळे तिसर्‍या पंचांनीच नो-बॉलचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी माजी क्रिकेटपटूंची आहे. सध्या तंत्रज्ञान इतके पुढे गेले असून गोलंदाजाने चेंडू टाकल्याच्या पाचव्या सेकंदानंतर तो नो-बॉल आहे की नाही, हे तिसर्‍या अंपायरला सहजासहजी कळू शकते. त्यामुळे मैदानावरील पंचांऐवजी तिसर्‍या अंपायरनेच हा निर्णय घेतलेला बरा. मैदानावरील पंचांना गोलंदाजाच्या पायाकडे लक्ष देऊन पुन्हा त्वरित फलंदाजाकडे लक्ष देणे सहजासहजी शक्य होत नाही. मैदानावरील पंचांच्या तुलनेत तिसर्‍या पंचांकडे या बाबी तपासण्यासाठी पुरेसा वेळ असून त्यांचाच याकडे ‘डोळा’ राहिल्यास निर्णयही अचूक लागतील आणि चौथ्या पंचांची गरज राहणार नाही.



-रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@