शिवसेनेला मदत करण्यास सोनियांचा नकार का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019
Total Views |



मुंबई (राजेश प्रभु साळगांवकर) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपा महायुतीपासून शिवसेना फुटून राज्यात शिवसेनेचे सरकार भाजपाशिवाय स्थापन व्हावे म्हणून जोरदार प्रयत्न चालवले असले तरी त्यांना सोनीया गांधींनी याकामी मदत करण्यास नकार दिल्याचे पक्के वृत्त 'मुंबई तरूण भारत'च्या हाती आले आहे. शरद पवार आणि शिवसेना हे दोघेही विश्वासपात्र नाहीत, असे सोनिया गांधींचे म्हणणे आहे असे सोनिया गांधींच्या एका निकटवर्तीय नेत्याने 'मुंबई तरूण भारत'ला सांगितले. त्यातून पुन्हा शरद पवार यांनी मंत्रीपदांऐवजी विधानसभा अध्यक्षपदाचा आग्रह धरलेला असल्याने त्यांच्या हेतूवर काँग्रेसला शंका आहे.

 

शरद पवार यांनी काल सोमवारी नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सोनीया गांधी यांना महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार बनविण्यास पाठिंबा मागितल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. मात्र शिवसेनेला महाराष्ट्रात सरकार बनविण्यास पाठिंबा देण्यास सोनिया गांधी यांनी स्पष्ट नकार दिल्याचे, कॉन्ग्रेसमधील नवी दिल्लीस्थित सूत्रांनी सांगितले. तर महाराष्ट्रातील प्रदेश स्तराच्या काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास आणि योग्य वेळेची वाट पाहण्यास सांगितले आहे.

 

शरद पवार आणि शिवसेना दोघांवर सोनियजींचा विश्वास नाही

शिवसेनेसोबत सरकार बनविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक असली तरी या दोघांसोबत सरकार बनविण्यास किंवा त्यांना बाहेरून पाठिंबा देण्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तयार नाहीत असे त्यांच्या निकटवर्तीय नेत्याने सांगितले. उद्धव ठाकरे हिंदुत्ववाला अधिक महत्व देऊन कधीही भाजपसोबत परत जाऊ शकतील, त्यामुळे तात्कालिक फायद्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे राष्ट्रीय पातळीसाठी योग्य राहणार नाही, असे सोनिया गांधी याना वाटते. तसेच शरद पवार हे केवळ पवार कुटुंबियांना ईडी च्या तडाख्यातून वाचविण्यासाठी भाजप सरकार बनण्यापासून रोखावें इतक्याच कारणाने शिवसेनेच्या पाठी उभे आहेत, असेही सोनिया गांधी यांचे मत आहे, असे या नेत्याने सांगितले. त्याचबरोबर तळागाळातील गावागावातील काँग्रेस संघटन संपविण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न लपून राहिलेला नाही असेही राज्यातील आणि दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना वाटते आहे.

 

सोनिया गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना पवारांपासूनच जास्त सावध राहण्याच्या सूचना केल्याचे कळते. तसेच जर राष्ट्रवादी शिवसेना एकत्र सरकार बनवत असतील तर त्यात काँग्रेस कुठल्याही पसिस्थितीत सामील होणार नाही हे सोनिया गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे बजावल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. मात्र महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेते भाजपला संपविण्याचा ही सर्वात उत्तम संधी आहे असे मानत आहेत असेही काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

 

राष्ट्रवादीला हवे केवळ विधानसभाध्यक्षपद

शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याऐवजी शरद पवार यांनी अल्पमतातील शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देत केवळ विधानसभा अध्यक्षपदाचा आग्रह शिवसेना आणि काँग्रेस श्रेष्ठींकडे धरला आहे. त्यामुळे त्यांना स्थिर सरकार चालू द्यायचे नाही असे काँग्रेस श्रेष्ठींचे मत असल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसच्या शंका वाढल्या असून या सर्व प्रकारात केवळ बघ्याची भूमिका घ्यावी असे दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी तूर्तास ठरवले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@