राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : फडणवीस सरकारच्या कार्यकाळाची मुदत संपत आली तरीही नव्या सरकारचा शपथविधी होण्याची तूर्त काही चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास ८ नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. यापूर्वी राज्याचे वित्तमंत्री व भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी तशी शक्यताही व्यक्त केली आहे. "राज्यात यापूर्वी अशी परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. पुरोगामी महाराष्ट्रात अशी स्थिती उत्पन्न होऊ नये मात्र, शिवसेनेकडून सत्तापेच कायम ठेवला गेल्यास ही शक्यता नाकारता येत नाही.", असे मुनगंटीवार म्हणाले होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यात नवे सरकार स्थापन होईल, याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत, असे म्हटले होते. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करताना दिसत आहेत. मुंबईत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. यात अजित पवार, बाळासाहेब थोरात, सुनील तटकरे, नवाब मलिक, अशोक चव्हाण आदी नेत्यांचा सामावेश आहे. शरद पवार हे दुपारनंतर मुंबईत दाखल होणार आहेत. सोनिया गांधींच्या भेटीतून पवारांना फारसे काही हाताशी लागले नसल्याची चर्चा दिल्लीत आहेत. अशातच पवारांना स्वतःच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करून पुन्हा दिल्लीवारी करायची आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. नवे सरकार भाजपचेच असेल, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री व भाजप अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. दिल्लीतील हालचालींना चारही पक्षांच्या गोटात वेग आला असला तरीही या साऱ्यावर सध्याच्या सरकारची मुदत ही दोन दिवसांवर आली आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, तसे झाल्यास ही राज्याच्या इतिसाहातील ऐतिहासिक घटना ठरण्याची शक्यता आहे.




@@AUTHORINFO_V1@@