‘मानव-वन्यप्राणी’ संघर्ष वेळीच टाळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019   
Total Views |





मानव-वन्यप्राणी संघर्षाची दुखरी नस वेळीच पकडणे आवश्यक आहे. त्यामागील कारणांचा योग्य वेळीच शोध घेऊन त्यावर उपाययोजना राबविल्यास वन्यप्राणी तिरस्काराचा भडका उडणार नाही.


महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने वाघ आणि बिबट्या या दोन वन्यजीवांभोवती केंद्रित आहे
. गेल्या आठवड्यात राज्यात या दोन्ही जीवांसंदर्भात महत्त्वाच्या घटना घडल्या. एक घटना मराठवाड्यातली, तर दुसरी सातार्‍यामधील. घडलेल्या घटनांचे कंगोरे निरनिराळे असले, तरी त्यांना ‘मानव-वन्यजीव’ संघर्षाची किनार होती. या संघर्षाला वेळीच व्यसन न घातल्यास किंवा तो शिगेला पोहोचल्यास त्याचे काय परिणाम उद्भवू शकतात, याची प्रचिती या घटनांमुळे आली. प्रसंगी वनविभाग आणि प्राण्यावर अभ्यास करणार्‍या संशोधन संस्थेचे अपयशही निदर्शनास आले. तसेच वन्यप्राण्यांविषयी मानवी स्वभावातील विषण्णताही दिसून आली.



गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात ४० वर्षांनी वाघाचे दर्शन घडले
. टिपेश्वर अभयारण्यात जन्मास आलेल्या ‘सी १’ या वाघाने हिंगोली गाठले. यादरम्यान त्याने २०० किमीचा प्रवास केला. ‘भारतीय वन्यजीव संशोधन संस्थान’ने (डब्ल्यूआयआय) वाघाच्या गळ्यामध्ये अडकवलेल्या ‘रेडिओ ट्रान्समीटर’मुळे ही माहिती समोर आली. आईपासून विलग झाल्यानंतर स्वत:च्या हद्दीच्या शोधार्थ तो स्थलांतर करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा वाघ मराठवाड्यात दाखल झाल्यावर वनविभागाने तो स्थलांतर करत असल्याची माहिती उघड केली. हिंगोलीत दाखल झाल्यावर त्याने सुकळी गावातील चार ग्रामस्थांवर हल्ला केला. शेतीकामासाठी शिवारामध्ये गेलेल्या ग्रामस्थांना वाघाच्या स्थलांतराविषयी काहीच कल्पना नव्हती. वनविभागाने गावात वाघाच्या स्थलांतराविषयी माहिती देणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. परिणामी ‘मानव-व्याघ्र’ संघर्षाची घटना घडली. सातार्‍यामधील घटनेत विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू ओढवला. कर्‍हाड तालुक्यातील तुळसण गावात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने गावातील काही पाळीव प्राण्यांना ठारही केले होते. त्यामुळे गावकर्‍यांच्या मनात बिबट्याविषयी चीड होती. गेल्या आठवड्यात हा बिबट्या शिवारात तडफडताना आढळला. वनविभागाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्याच्या पोटात खाण्याद्वारे विष गेल्याचे आढळून आले. या दोन्ही घटनांमध्ये वनविभाग आणि तत्सम संशोधन संस्थेने वेळीच हस्तक्षेप केला असता, तर मानव-वन्यप्राणी संघर्ष नक्कीच टाळता आला असता.



संघर्ष टाळता आला असता
!



या दोन्ही घटनांमध्ये निर्माण झालेला मानव
-वन्यप्राणी संघर्ष वेळेत टाळता आला असता. वाघाच्या गळ्यात अडकवलेल्या रेडिओ ट्रान्समीटरद्वारे त्याच्या ठिकाणाची (लोकेशन) माहिती दिवसातून दोन वेळा संबंधित संशोधन संस्थेला प्राप्त होते. या माहितीमध्ये १० ते १२ तासांचा कालावधी असतो. ‘सी १’ वाघ हिंगोलीत दाखल झाल्यावर त्याची मूळ ठिकाणाची माहिती वेळीच मिळाली असती, तर त्या परिसरातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देणे सोयीचे झाले असते. मात्र, वनविभागाने वा डब्ल्यूआयआयने याविषयी काहीच कल्पना दिली नाही. आपल्या परिसरात वाघाचे अस्तित्व आढळत नसल्याने ग्रामस्थ निर्धास्तपणे शिवारात गेले. प्रसंगी त्यांच्यावर वाघाचा हल्ला झाला. ही घटना घडल्यानंतर डब्ल्यूआयआयचे संशोधक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाच्या ठिकाणासंबंधीची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर विभागाकडून आसपासच्या गावांमध्ये वाघापासून सावध राहण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.



त्यामुळे हेच काम वेळीच केले असते
, तर ‘मानव-व्याघ्र’ संघर्ष घडला नसता. सातार्‍याच्या घटनेमध्ये थेट वनविभागाला दोषी ठरविता येणार नाही. मानवी स्वभावात वन्यप्राण्यांविषयी निर्माण होणारी तेढ काही वेळा अशा घटनांना कारणीभूत ठरते. ‘प्राणी’ हा आपला नसून तो वनविभागाचा आहे, अशी भावना जेव्हा जनमनात निर्माण होते, तेव्हा मानव-वन्यजीव संघर्ष टिपेला पोहोचतो. याचे रूपांतर सूडबुद्धीत होते. वन्यप्राण्याला विष देऊन मारल्याची शक्यता असलेली ही घटना पहिलीच नाही. यापूर्वीदेखील विदर्भातील एका शेतकर्‍याने वाघाने गाय मारल्याच्या सूडबुद्धीने त्याला विष देऊन ठार केल्याची घटना घडली आहे. वन्यप्राणी संघर्षाविषयी समाजमनात पेटलेली आग सहसा विझत नाही. त्यासाठी जनजागृती हाच उपाय अवलंबणे आवश्यक असतो. बर्‍याच वेळा जनजागृतीमुळे वन्यप्राण्यांविषयीची आग काही प्रमाणात शमते. परंतु त्याकरिता देखील मानव-वन्यप्राणी संघर्षाची दुखरी नस वेळीच पकडणे आवश्यक आहे. त्यामागील कारणांचा योग्य वेळीच शोध घेऊन त्यावर उपाययोजना राबविल्यास वन्यप्राणी तिरस्काराचा भडका उडत नाही.

@@AUTHORINFO_V1@@