क्रिकेटपटू संदीप पाटील झाले 'बिबट्या'चे पालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019   
Total Views |

नॅशनल पार्कमधील 'तारा' बिबट्याला घेतले दत्तक

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या बिबट्या निवारा केंद्रामधील 'तारा' नामक मादी बिबट्याला नवीन पालक मिळाले आहेत. भारतीय संघाचे माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या कुटुंबाने 'तारा'ला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले आहे. यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या 'वन्यप्राणी दत्तक योजने'ला बळकटी मिळाली असून पाटील कुटुंबियांच्या सहभागाने समाजातील आणखी प्रसिद्ध व्यक्ती या योजनेसाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

 

 
 

गेल्या सात वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 'वन्यप्राणी दत्तक योजना' राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिंजराबंद अधिवासातील म्हणजेच 'व्याघ्र-सिंह सफारी' 'बिबट्या निवारा केंद्रा'तील प्राण्यांना दत्तक देण्यात येते. दत्तकत्वाचा कालावधी वर्षभराचा असतो. याकरिता राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून काही रक्कम आकारण्यात येते. यामध्ये दत्तक प्राण्याचा वर्षभराचा वैद्यकीय आणि उदरभरणाच्या खर्चाचा समावेश असतो. राष्ट्रीय उद्यानाच्या या योजनेमधील पालकांच्या यादीत आता माजी क्रिकेटपटू संदीप पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश झाल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक / संचालक अन्वर अहमद यांनी दिली. काही दिवसांपूर्वी पाटील कुटुंबीयांनी २० महिन्यांच्या 'तारा' नामक मादी बिबट्याला दत्तक घेतल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी 'तारा'ला अभिनेता सुमीत राघवन यांनी दत्तक घेतले होते. त्यांचा वर्षभराचा दत्तक कालावधी संपुष्टात आल्यावर आता पाटील कुटुंबीयांनी 'तारा'ची जबाबदारी स्वीकारली आहे. तर, मी लवकरच दुसरा बिबट्या दत्तक घेणार असल्याची माहिती सुमीत यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'ला दिली.


 
 संदीप पाटील आणि कुटुंबीय 
 
 

गेल्या कित्येक वर्षांपासून मला वन्यप्राण्यांची आवड आहे. १८ वर्ष केनियामध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना तिथल्या वन्यप्राणी अनाथालयांची माझी जवळीक निर्माण झाली होती. आता सेवानिवृत्तीनंतर वन्यप्राणी संवर्धनासंबंधीची आवड जोपासण्याच्या निमित्ताने मी आणि माझ्या कुटुंबियांनी 'तारा'ला दत्तक घेतल्याची माहिती संदीप पाटील यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. माझी सून 'सना' हिला 'तारा'चा खेळकर स्वभाव आवडल्याने मुलगा चिरागच्या मदतीने आम्ही तिचे पालकत्व स्वीकारल्याचे पाटील यांनी सांगितले. तारा ही २० महिन्यांची असून तिचा स्वभाव खेळकर असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यक अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. लहानपणापासूनच तिला माणसांची सवय झाल्याने तिचा स्वभाव खेळकर आहे. हा खेळकर स्वभावाच सर्वांना आकर्षित करत असल्याचे, डाॅ. पेठे म्हणाले.

 

'तारा'ची पार्श्वभूमी

१९ डिसेंबर, २०१७ मध्ये अहमदनगर येथील एका गावातील उसाच्या शेतात 'तारा' आणि 'सूरज' या पिल्लांचा जन्म झाला होता. मात्र, ऊसतोडणीच्या वेळी माणसांना पाहून बिथरलेली त्यांची आई आपल्या दोन पिल्लांना त्याच ठिकाणी टाकून पसार झाली. वन विभागाने या पिल्लांना त्या ठिकाणी तीन दिवस ठेवून त्यांची आई येण्याची वाट पाहिली. परंतु, मादी बिबटय़ा तिथे फिरकलीच नाही. त्यामुळे या दोन्ही पिल्लांना राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले. राष्ट्रीय उद्यानात ही पिल्ले दाखल झाल्यानंतर ती अशक्त होती. डाॅ.पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय उद्यानाच्या 'बिबट्या रेस्क्यू टीम'च्या संदस्यांनी मेहनतीने पिल्लांची योग्य काळजी घेण्यात आली. 'सूरज' आणि 'तारा' काही काळ उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयातही दाखल होते. डॉ. पेठे यांनी 'तारा'ला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून वाचवले. गेल्या वर्षी तिला बिबटय़ा निवारा केंद्रात सोडण्यात आले.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@