तामिळनाडूमध्ये द्रमुकचे नतद्रष्ट राजकारण !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019   
Total Views |




कवी तिरुवल्लुवर यांच्याबद्दल केवळ तामिळनाडूमधील जनतेलाच अभिमान नाही, तर सर्व भारतीयांनाही तेवढाच अभिमान आहे. पण, काही अपप्रवृत्ती यासंदर्भात अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये राजकीय मंडळी पुढे आहेत, हे सांगायलाच नको!

 

तामिळनाडूमध्ये सध्या अण्णाद्रमुक पक्ष सत्तेवर असून आगामी निवडणुकीत त्या पक्षाच्या हातून सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या द्रमुककडून भाषिक मुद्दा उपस्थित करून भावनिक राजकारण खेळणे सुरूच असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच सत्ता मिळणार असल्याचे गृहीत धरून त्या पक्षाची पावले पडत आहेत. तामिळनाडू राज्यात भाषिक मुद्दा हा अत्यंत संवेदनशील असल्याचा अनुभव देशाने अनेक वेळा घेतला आहे. त्यावरून तीव्र आंदोलनेही झाली आहेत. तोच भाषिक मुद्दा पुढे करून जनतेला आपल्या बाजूने वळविण्याचा द्रमुकचा प्रयत्न चाललेला आहे. द्रमुकच्या हाती आणखी असाच एक मुद्दा लागला असून त्यावरून जनतेला भडकविण्याचे द्रमुकचे प्रयत्न सुरू आहेत.

 

द्रमुकला भाषिक मुद्दा लावून धरण्यासाठी कोणतेही निमित्त पुरते, हेही या निमित्ताने दिसून आले. तामिळनाडू सरकार वाहतूक नियमांचे भंग करणार्‍यांना दंड आकारल्यानंतर जी पावती देते, त्यावर तामिळ भाषेतील मजकूर नसल्याबद्दल द्रमुक पक्ष संतापला आहे. त्या पावतीवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये मजकूर आहे, पण तामिळमध्ये नाही, एवढे एक निमित्त द्रमुकला मिळाले असून त्या पावतीमध्ये वेळीच बदल न केल्यास सरकारला तीव्र आंदोलनास तोंड द्यावे लागेल, असा इशारा द्रमुक नेते एम. के. स्टालिन यांनी दिला आहे. तामिळनाडू राज्यामध्ये भाषिक मुद्दा हा अत्यंत कळीचा असल्याचे लक्षात घेऊन त्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या पोळीवर तूप वाढून घेण्याचा द्रमुकचा प्रयत्न असल्याचे यावरून दिसून येते. भाषिक मुद्द्यापुढे नवीन वाहतूक कायदाही दुय्यम असल्याचे द्रमुकला वाटते. तामिळ भाषेची उपेक्षा केल्याने, स्वाभिमानाला धक्का पोहोचला असल्याची आवई उठवून जनतेला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न यामागे आहे, हे सांगायला नको!

 

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आगामी निवडणुकीत सत्तेवर येण्याची स्वप्ने द्रमुक पाहत आहे. अशी स्वप्ने पाहण्यात काही चुकीचेही नाही. तसेच तामिळ भाषेचा आग्रह धरण्यात चुकीचे काही नाही, पण त्यासाठी आपल्याच देशात मोठ्या प्रमाणात बोलल्या जात असलेल्या हिंदी भाषेचा दुस्वास करण्याचे काही कारण नाही. तामिळनाडूमधून द्रमुकचे ३९ खासदार निवडून आले. द्रमुकच्या धोरणानुसार या खासदारांनी तामिळ भाषेमध्ये शपथ घेतली, पण अशी कृती करून हिंदी भाषा लादली जाण्याच्या प्रयत्नास आम्ही खीळ घातली, असा डांगोरा पिटण्याचे कारण नाही. भाषाभगिनी असलेल्या हिंदी भाषेविरुद्ध आपण जे वातावरण निर्माण करीत आहोत, त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यामध्ये आपल्याकडून बाधा निर्माण केली जात आहे, हे स्टालिन यांच्यासारख्या राजकारणी नेत्यांच्या कधी लक्षात येणार? आपल्या अशा राजकारणामुळे देशाच्या ऐक्यास तडा पोहोचत आहे, हे या नेत्यांच्या कधी लक्षात येणार? अन्य काही मुद्दे हातात नसले की भावनिक मुद्दे उपस्थित करायचे आणि त्यावरून जनतेला आपल्याकडे वळवायचे, अशा राजकारणापासून तामिळनाडू मुक्त व्हायला हवा. संकुचित विचार न करता संपूर्ण राष्ट्राचा विचार करणार्‍यांचा प्रभाव त्या राज्यामध्ये वाढला की, अशा विचारसरणीस आपोआप पायबंद बसेल.

 

तामिळनाडू राज्यात सध्या अन्य एका विषयाची चर्चा सुरू आहे. ती चर्चा आहे प्रसिद्ध तामिळ संत कवी तिरुवल्लुवर यांच्यासंदर्भातील. कवी तिरुवल्लुवर यांच्याबद्दल केवळ तामिळनाडूमधील जनतेलाच अभिमान नाही, तर सर्व भारतीयांनाही तेवढाच अभिमान आहे. पण, काही अपप्रवृत्ती यासंदर्भात अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये राजकीय मंडळी पुढे आहेत, हे सांगायलाच नको!

 

तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाने थोर कवी तिरुवल्लुवर यांचे एक रेखाचित्र ‘पोस्ट’ केल्यानंतर त्या राज्यातील द्रमुक आणि साम्यवादी नेत्यांची माथी भडकली. कवी तिरुवल्लुवर यांचे जे चित्र ‘पोस्ट’ करण्यात आले आहे, त्यामध्ये कवी तिरुवल्लुवर यांच्या अंगावर भगवी वस्त्रे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावर भस्म लावलेले ते दिसतात. त्यावरून भाजप या कवीचे भगवेकरण करीत असल्याचे आरोप करण्यात येऊ लागले आहेत. ‘हिंदू संतकवी’ असे त्यांना गणून या महान कवीस संकुचित केले जात आहे, असे आरोप द्रमुक आणि साम्यवादी करू लागले आहेत. समाजमाध्यमांवर त्यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने कवी तिरुवल्लुवर यांचे अवमूल्यन करण्याचे न थांबविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्या पक्षांकडून देण्यात आला आहे.

 

संतकवी तिरुवल्लुवर यांच्यावरून द्रमुक आणि साम्यवाद्यांची जी आदळआपट चालू आहे, त्यामागे राजकारणाशिवाय अन्य काहीही नाही हेच दिसून येते. तिरुवल्लुवर यांची महती संपूर्ण राष्ट्र जाणून आहे. या महापुरुषाचे नित्यनियमाने स्मरण करणारे लाखो लोक आहेत. तामिळनाडूसह देशाच्या कानाकोपर्‍यातील व्यक्तींना कवी तिरुवल्लुवर यांच्याबद्दल आदर आहे. अशा महान संतावरून राजकारण खेळण्याचा अश्लाघ्य प्रयत्न तामिळनाडूमधील राजकारणी करीत आहेत.
 

या संदर्भात जो अपप्रचार केला जात आहे, त्यास तामिळनाडूच्या भारतीय जनता पक्षाने तेवढेच जोरदार उत्तर दिले आहे. कवी तिरुवल्लुवर यांच्यावरून राजकारण करणार्‍या स्टालिन यांनी, या कवीच्या रचनांपैकी काही ओळी कोणतीही चूक न करता आणि न अडखळता म्हणून दाखविल्यास जी ‘पोस्ट’ टाकण्यात आली आहे, ती मागे घेण्यात येईल, असे आव्हान भाजपने दिले आहे. तिरुवल्लुवर या महान संतकवीबद्दल केवळ तामिळनाडूलाच नव्हे, तर समस्त भारतीयांना अभिमान आहे. त्यामुळे असे काहीतरी निरर्थक वाद मुद्दाम निर्माण करून जनतेला भ्रमित करण्याचे दिवस संपलेले आहेत, हे कोणीतरी द्रमुक आणि साम्यवादी नेत्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे. समाजात भेद निर्माण करून, एकमेकांविरुद्ध लढवून राजकारण खेळणार्‍या पक्षांना आणि नेत्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. यावरून तरी तेथील नेत्यांना शहाणपण येईल, अशी अपेक्षा करावी काय?

 

तामिळनाडूमध्ये भाषिक मुद्द्यावरून आणि संतकवी तिरुवल्लुवर यांच्या रेखाचित्रावरून जे खालच्या पातळीवरील राजकारण खेळले जात आहे, त्याची कल्पना या उदाहरणांवरून यावी. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करून राष्ट्रीय ऐक्यास बाधा निर्माण करण्याचे प्रयत्न कशाप्रकारे सुरू आहेत, याची यावरून कल्पना यावी. राष्ट्रीय एकात्मतेवर दृढ विश्वास असलेली प्रत्येक व्यक्ती असे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही!

@@AUTHORINFO_V1@@