रात्रीची ऐतिहासिक कसोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |



भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी विराजमान झाला आणि रात्र-दिवस (डे-नाईट) कसोटी भारतात खेळविण्याचा ऐतिहासिक निर्णय त्याने घेतला. कसोटी क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गांगुली याने घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. भारतीय धरतीवर याआधी एकदाही आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले नव्हते. कोलकात्यातील 'ईडन-गार्डन' मैदानावर येत्या २२ नोव्हेंबरपासून हा सामना खेळविला जाणार आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध होणारी ही कसोटी ऐतिहासिक मानली जात आहे. क्रिकेटच्या खेळाचे स्वरूप वर्षानुवर्षे बदलत गेले तरी भारतात कधीही या खेळाची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. टी-२० क्रिकेटचे युग सुरू झाल्यानंतरही भारतात कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकून आहे. केवळ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठीचे खेळाडू आजही भारतात तयार होत आहेत. केवळ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट बोर्ड कसोटी सामन्यांसाठीही आग्रही राहिले आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटचे अस्तित्व भारतात टिकून आहे. मात्र, असे असतानाही भविष्याच्या दृष्टीने दिवस-रात्र कसोटी सामना खेळविण्यात येणार असल्याचे बीसीसीआय सांगत आहे. याचे कारणही तसेच आहे. कसोटी सामना हा पाच दिवसांचा असतो. अनेकदा दिवसाच्या वेळी पाऊससदृश्य वातावरणामुळे पुरेसा उजेड नसल्याने कसोटी सामन्यांदरम्यान अडचणी येतात. प्रत्येक दिवशी ९० षटकांचा खेेळ न झाल्यास कसोटी क्रिकेटचे सामने अनिर्णित राहतात. सामन्यांतील चुरसच नाहीशी झाल्याने असे सामने क्रिकेटप्रेमींच्या पसंतीस उतरत नाहीत. परिणामी, कसोटी क्रिकेटचे अस्तित्व अनेक देशांतून नाहीसे होत चालले आहे. याउलट कसोटी क्रिकेट जर दिवस-रात्र अशा दोन्ही वेळेस खेळवले गेले तर खेळाडूंनाही ते खेळणे सोयीस्कर ठरते. थकवा कमी प्रमाणात जाणवतो आणि खेळही पूर्ण होतो. त्यामुळे अनेक देशांनी कसोटी क्रिकेट दिवस-रात्र खेळविण्यास पसंती दर्शवली आहे. त्यामुळे भारतानेही केलेल्या या नव्या प्रयोगाचे स्वागतच करायला हवे.

 

'गुलाबी' आव्हान

 

दिवस-रात्र कसोटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला असला तरी हा सामना खेळताना भारतीय संघाला आगामी काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची पद्धत दिवसकालीन कसोटीपेक्षा पूर्णपणे निराळी आहे. दिवसा चालणार्‍या कसोटी सामन्यांत टणक लाल चेंडू वापरण्याची आत्तापर्यंत परंपरा आहे. मात्र दिवस-रात्र चालणार्‍या कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरण्यात येतो. या गुलाबी रंगाच्या चेंडूची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी हा चेंडू मोठ्या प्रमाणात स्विंग होतो. तेजीने स्विंग होण्याचे प्रमुख वैशिष्ट्य असणारा हा चेंडू खेळण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. भारताआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांच्या क्रिकेट नियामक मंडळाने याआधी दिवस-रात्र कसोटी सामने खेळविले आहेत. तेथील जलद आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर हा गुलाबी चेंडू गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर हा गुलाबी चेंडू काय कमाल करतो, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. परदेशांत प्रामुख्याने सामन्यांदरम्यान 'ड्युक्स' आणि 'कुकबुरा' कंपन्यांचे चेंडू वापरले जातात. भारतात मात्र 'एसजी' या कंपनीचे चेंडू वापरले जात असून कोलकात्यातील ईडन-गार्डनवरील मैदानावर हा चेंडू काय कमाल करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरी प्रमुख बाब म्हणजे, रात्रीच्या वेळी सामन्यादरम्यान होणारा दवाचा परिणाम (ड्यू फॅक्टर) फार महत्त्वाचा मानला जातो. 'ड्यू फॅक्टर'दरम्यान हा चेंडू कितपत वळेल, फिरकी गोलंदाजांना त्याची मदत होईल की नाही, की केवळ तेज गोलंदाजांनाच याचा फायदा होईल आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत हा गुलाबी चेंडू हाताळलेला नाही. केवळ बोटांवर मोजण्याइतक्याच खेळाडूंना हा गुलाबी चेंडू हाताळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे अधिकाधिक सराव सामने खेळून गुलाबी चेंडू हाताळण्याचे आव्हान भारतीय संघापुढे असेल. गुलाबी चेंडू आणि दिवस-रात्र कसोटी सामन्यांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असली तरी भारतीय संघापुढे हे नक्की मोठे आव्हान आहे. मात्र, कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील संघही पूर्णपणे तयारी करत असून ते हे आव्हान पेलण्याची क्षमता राखतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


- रामचंद्र नाईक 

@@AUTHORINFO_V1@@