सुप्रजा भाग-२०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |
 
 
 
 

स्तन्यातील दोषानुसार 'दुष्टी'ची लक्षणे, चिन्हे मागील लेखात बघितली. त्यावरील चिकित्सा आणि आहारीय उपाय आज जाणून घेऊया.

 

आधीच्या लेखांतून आपण बघितले की, बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी स्तन्य किती महत्त्वाचे आहे. स्तन्याचे प्रमाण (Quantity) किंवा त्या 'दुष्टी' (विकृती- Quality) मध्ये बिघाड झाल्यास बाळाची वाढ संपूर्णतः होत नाही. 'स्तन्यदुष्टी'ची विविध कारणे आपण बघितलीत आणि शारीरिक, मानसिक कष्ट, चुकीचा आहार, अपूर्ण विश्रांती इ. या सगळ्यात आहारामुळे होणारा बिघाड हल्ली प्रकर्षाने दिसतोय. 'काय खावे' याबरोबरच कुणी खावे, किती खावे आणि कधी खावे, या बाबीही लक्षात घेणे गरजेच्या आहेत.

 

आपण जो आहार घेतो त्यातूनच शरीरात विविध धातू निर्माण होतात, शक्ती मिळते आणि प्रसुतीमध्ये स्तन्यनिर्मिती होते. वात, पित्त आणि कफ हे शरीराचे आधारभूत स्तंभ आहेत. ते निरोगी तर व्यक्ती निरोगी आणि या त्रिदोषांमध्ये बिघाड तर आजार, असे समीकरण आहे. आहाराने जसे शरीराचे पोषण होते, तसेच शरीरात विकृतीही घडू शकते. हे आहाराचे सामर्थ्य आहे. स्तन्यातील दोषानुसार 'दुष्टी'ची लक्षणे, चिन्हे मागील लेखात बघितली. त्यावरील चिकित्सा आणि आहारीय उपाय आज जाणून घेऊया.

 

वातामुळे 'दृष्टी' असल्यास रूक्षता, खरता, मुरडा येणे इ. घडते. या सर्व तक्रारींवर खालील आहारातील बदल बाळंतिणीने करावे. पिण्याचे पाणी हे कोमटच असावे. ते थोडी सुंठ किंवा तूप घालून प्यायल्यासही चालेल. जेवताना भाताच्या पहिल्या घासात तूप आणि हिंग घालावे आणि ते आधी खाऊन मग बाकीचे जेवावे. जेवण ताजे व गरम असावे. याने वात आटोक्यात ठेवण्यास मदत होते. ओव्याचा अर्क पाण्यातून घेतल्यास पोटदुखी, चमका इ. विकार कमी होतात. जेवणानंतर बाळंतशेप, ओवा इ. घालून मुखवास करावा. याने पचनास मदत होते. खूप रूक्ष, शुष्क, अन्न खाऊ नये. वजन वाढेल या भीतीने आहारातील स्निग्धांश संपूर्ण बाद केला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून वातवृद्धी होते.

 

आहारातून मोड आलेली कडधान्यं टाळावीत. खाल्लीच तर मूग आणि मटकी ही कडधान्यं खावीत, पण तीसुद्धा मोड न आलेली. राजमा, छोला, वाटाणा इ. पदार्थ संपूर्णत: टाळावेत. पचायला जड असणारे पदार्थ (पनीर, चीज इ. तसेच मांसाहार) हे दिवसा (दुपारच्या जेवणात) थोड्या प्रमाणात घ्यावे रात्री टाळावे. ओवा, आलं-लिंबू, लसूण, तूप-जिर्‍याची फोडणी इ. पचन सुधारण्यासाठी उपयोगी आहेत. वाताचा त्रास होत असल्यास बाळंतिणीने आपल्या आहारातून यापैकी एखाद्या जिन्नसचा अवश्य अवलंब करावा. तसेच अंघोळीसाठी गरम पाणी घ्यावे. अंगाला तेल लावून मग अंघोळ करावी आणि किमान पहिले दोन महिने पाण्याशी कमीत कमी संपर्क होईल, याची काळजी घ्यावी. बाळंतिणीच्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार वरील उपायांचा फायदा होतो.

 

स्तन्यदुष्टी जर पित्तामुळे झाली असेल तर बाळंतीण आणि बाळाला उष्णतेचा अधिक त्रास होतो. अंगावर पुरळ येणे, घाम खूप येणे, अति उकडणे, लघवी जास्त पिवळी होणे आणि जळजळणे इ. लक्षणे असू शकतात. अशा वेळेस बाळंतिणीने तिखट, मसालेदार, चमचमीत, स्पायसी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. सॉस (टॉमेटो, सोया, शेजवान) इ. अजिबात घेऊ नये. आंबट आणि खारट पदार्थ जेवढे वर्ज्य करता येतील तेवढे उत्तम. मीठाऐवजी सैंधवचा वापर करावा. दही, शेंगदाणे, तूरडाळ खाऊ नये. घावन, पोळी, भातावर भरपूर लोणकढे घरी कढवलेले तूप घ्यावे. फळांमध्ये पपई आणि आंबट फळे (संत्र, किवी, अननस) टाळावीत. शरीराची उष्णता कमी ठेवण्यासाठी दुधातून तूप घालून प्यावे. टाळूवर आणि पायांना खोबरेल तेल लावावे. डोळ्यांना आणि हातापायांना जर जळजळ होत असेल, तर चंदनाचा लेप लावावा. भिजवलेल्या मनुका खाव्यात. गुलकंद, धणे-जिर्‍याचे पाणी, कोकम सरबत घ्यावे. जागरण टाळावे. लोणचं -पापड अजिबात खाऊ नये. उन्हातून जाणे टाळावे आणि भडक रंगाचे कपडे, सिन्थेटिक कपडे घालू नये. चिडचिड होईल, राग येईल अशा परिस्थिती टाळाव्यात. कोहळा इ. फळभाज्या घ्याव्यात.

 

'स्तन्यदुष्टी' जर कफामुळे होत असेल, तर ते पचायला जड होते. बाळंतीण जर अधिक काळ झोपत असेल, शिळं अन्न खात असेल, जेवल्यानंतर पुन्हा त्यावर खात असेल, ब्रेड, पाव, चीझ, श्रीखंड, पनीर इत्यादीचा अधिक आहारातून समावेश असेल, तर कफामुळे स्तन्यात 'दुष्टी' निर्माण होऊ शकते. अंगात आळस भरतो. काही करू नये, फक्त झोपून राहावे असे वाटू लागते. मन खिन्न होते. कुठल्याच गोष्टीत उत्साह वाटत नाही. डीप्रेशन येते. तिन्ही (वात, पित्त व कफ) दोषांमुळे जेव्हा विकृती येते असे म्हटले जाते, त्याचा अर्थ असा की, 'दुष्ट' झालेले, बिघडलेले त्रिदोष शरीरात असंतुलन निर्माण करत आहेत, रोग निर्माण करत आहेत. कारण, शुद्ध त्रिदोष हे शरीराचे आधार आहेत, त्यावर आरोग्य अवलंबून आहे. ते विकृती कधीच उत्पन्न करत नाहीत.

 

कफाच्या दुष्टीवर सुंठ मधातून घेणे हा साधा-सोपा उपाय आहे. शिळंपाक खाऊ नये. जेवल्या-जेवल्या झोपू नये. पोटाला तडस लागेल इतके जेवू नये. गरम पाणी प्यावे. पचायला हलका आहार घ्यावा. थोडी हालचाल शरीराची असावी. फक्त जेवणे आणि झोपणे असा दिनक्रम नसावा. आल्याचा रस मधातून घेतल्यासही कफ कमी होण्यास मदत होते. वरील सर्व आहारीय बदलांनी दोषांच्या विकृतीवर, बिघाडावर नियंत्रण आणता येऊ शकते काही वेळेस औषधोपचारांची गरज भासते. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यांनीच औषधे घ्यावीत. वर्तमानपत्रात, मासिकात, जाहिराती बघून वा सखोल माहिती नसलेला व्यक्तींच्या सल्ल्याने औषधे घेऊ नयेत.

 

बाळाची वाढ टप्प्या-टप्प्याने होत असते. उत्तम आहारावर पुढचे Milestones अवलंबून असतात. पूरक वातावरण आणि आहार असल्यास बाळाला रोज टॉनिकचीही गरज भासत नाही. लहानपणी शरीराची प्रतिकारशक्ती कमी असते. पचनशक्ती ही नाजूक असते. ते पूर्णतः बाळ आपल्या वाढीसाठी मातेवर व अन्य परिवारातील सदस्यांवर अवलंबून असते. लहानपणी लागलेल्या सवयी (चांगल्या असतील किंवा वाईट) त्या सोडविणे खूप कष्टाचे होते.

 

आत्तापर्यंत बाळाचे आरोग्य आणि स्तन्याचे महत्त्व यावर आपण वाचले. बालकांच्या वाढीसाठी केवळ आहारच नव्हे, तर आचरण आणि सकारात्मक वातावरण असणेही गरजेचे आहे. सध्या असणारे मोबाईलचे वेड, लहानपणीच बाहेरचे अतिप्रमाणात खाणे, पार्टीज आणि गेम्स इ. पूरक सवयी नाहीत. सर्वांगीण वाढीसाठी या सर्व गोष्टींबद्दलही विचार होणे गरजेचे आहे. पुढील लेखमालेतून बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी पूरक आहार इ. बद्दल जाणून घेऊया.

 


(क्रमश:)

- वैद्य किर्ती देव

[email protected]

9820286429

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@