अखंड भारतासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |



'आयुष्यात काय मिळवले?' या प्रश्नाचे उत्तर 'आयुष्यात रा. स्व. संघ विचारांच्या प्रेरणेने जगलो, देशाच्या अखंडतेसाठी खारीचा वाटा उचलतो,' असे निरलसपणे म्हणणारे आणि जगणारे मोहन अत्रे...

 

संघटन हा काही व्यक्तींचा रक्तगट असतो. संघटन करणे, माणसं जोडणे आणि त्यांना ध्येयाप्रति बांधून ठेवणे हा या लोकांचा गुणधर्म असतो. तोच गुणधर्म तोच रक्तगट मोहन अत्रे यांचा आहे. मनाचा, विचारांचा आणि कृतीचाही स्वयंसेवक हीच त्यांची ओळख. आज 'इतिहास भारती'च्या दिघोशी येथील वनवासी क्षेत्रातील उपक्रमाचे ते निवासी प्रचारक आहेत. 'अखंड भारत व्यासपीठ' या संस्थेचे ते संघटक-संस्थापक आहेत. 'इतिहास संकलन समिती'चे ते कोकण प्रांत सदस्य आहेत. 'सांस्कृतिक भारत' या त्रैमासिकाचे व्यवस्थापक आहेत. एक संघटनशील, मनमिळाऊ आणि तितकेच विनयशील व्यक्तिमत्त्व म्हणून मुंबई, ठाण्यात ते परिचित. त्यांचे कर्तृत्व लौकिकार्थाने मोजता येत नसेल. पण, त्यांचे संघटन कौशल्य मात्र खरोखरच मानण्यासारखे.

 

मोहन अत्रे यांचे कुटुंब मूळ पुण्याचे. मात्र, कुळ कायद्यात शेतजमीन गेली आणि अत्रे कुटुंबाने पुणे सोडले. दिगंबर अत्रे आणि सुशिला अत्रे हे दाम्पत्य मुंबईच्या लालबाग परिसरात आले. गिरणनगरी लागलबाग. त्या परिसरात अत्रे आणि त्यांची पाच अपत्ये गोडीगुलाबीने राहत. संस्कारशील आणि धार्मिक असलेल्या सुशिलाबाईंनी मुलांवर संस्कार करताना कोणतीही कसर ठेवली नाही. ती मोहन यांना सांगे, "मोठ्यांच्या चुका काढण्याचा तुला अधिकार नाही. कारण, तू लहान आहेस आणि लहानांची चूक तू सहन केली पाहिजेस. सुधारली पाहिजेस. कारण, तू मोठा आहेस." यामुळे संस्कारामुळे मोहन कुणालाही उलट बोलणे, तोडून बोलणे, वादविवाद करणे यापासून दूर राहिले ते आजपर्यंत. वडील दिगंबर हे स्वातंत्र्य सैनिक. देशसेवा, देशनिष्ठेचे बाळकडू त्यांच्याकडूनच मोहन यांना मिळालेले.

 

मोहन अत्रेंनी एखादी गोष्ट सांगितली तर ती करायला हवी. कारण, मोहन अत्रे या व्यक्तीचा त्यात काही स्वार्थ नसणारच. मात्र, ती गोष्ट नक्कीच समाजासाठी, देशासाठी हितकारक असेल, असा विश्वास त्यांच्याबद्दल सर्वांनाच. अर्थात, हा विश्वास खूप अमूल्य असतो. तो सगळ्यांच्याच भाग्यात नसतो. पण, मोहन अत्रे यांच्याबद्दल लोकमानसात इतका विश्वास असण्याचे कारण की बेतास बेत आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी मोहन यांनी कष्टाची परिसीमा केली. विक्रोळीमध्ये राहत असताना सकाळी ४ वाजता उठून दुधाच्या केंद्रावर दूधवितरण करायचे. वितरणाचे पैसे घाटकोपरला मुख्य केंद्रावर जाऊन भरायचे. तेथून मुलुंडला कामाला जायचे. सकाळी १० ते ६ नोकरी करायची. दरम्यान, पत्नी जेवणाचे डबे बनवून ठेवायची. ते डबे मुलुंडला नेऊन द्यायचे.
 

दिवस पूर्ण कामात. मात्र, त्या कामाच्या रहाटगाडग्यातही समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि समाजाच्या भल्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात कायमच होता. तो विचार नुसाता विचार न ठेवता ते त्यासाठी कामही करायचे. कुटुंबाचा भार वाहणे गरजेचे होतेच, पण त्यामध्येही त्यांनी क्षणभरही राष्ट्रविचारांपासून फारकत घेतली नाही. पनवेल आणि धुळे जिल्ह्यात प्रचारक म्हणून जाताना मोहन यांच्या घरी वैचारिकदृष्ट्या जरी अनुकूल वातावरण असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रतिकूलच वातावरण होते. शिकलेल्या मोहनने नोकरी करावी, घराची जबाबदारी घ्यावी हे घरातल्यांना वाटणे साहजिकच. मोहननाही हे कळत होते. त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला की नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करायचा. कुटुंबापुरते अर्थार्जन करायचे आणि बाकीचा वेळ समाजसेवा, राष्ट्रहितासाठी द्यायचा. अक्षरश: त्या अनुक्रमानेच ते आजही जगतात.

 

रा. स्व. संघाच्या विविध जबाबदार्‍या सांभाळत ते परिसरातील लोकांना एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करतात. लोकांना एकत्र करायचे तर ते समाजासाठी, देशासाठी हा दृष्टिकोन मात्र कायम. त्यातूनच त्यांनी प्रेरणा मंडळ स्थापन केले. त्या मंडळाच्या माध्यमातून ते परिसरात विविध विषयावर जागृती करू लागले. देशासंदर्भातील विविध विषयांवर काम करू लागले. राजदूत म्हात्रे यांची हत्या झाल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थेतूनच त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढली. 'अखंड भारत व्यासपीठ' या संस्थेची निर्मितीही याच उद्देशाने की देश अखंड होता, तो खंडित झाला, पण तो पुन्हा अखंड व्हावा. मोहन म्हणतात, "अखंड भारत म्हणजे केवळ भूमींचे तुकडे एक होणे नाही, तर भारतीय संस्कृतीने ज्यांना म्हणून बांधलेले आहे तो सर्व भूभाग अखंड भारत आहे. पाकिस्तान हा भारताचा भूभाग होता आणि आहे. अनैर्सिकदृष्ट्या तो भारतापासून वेगळा झाला आहे. पण सांस्कृतिकदृष्ट्या तो भारताचाच भाग आहे. तो पुन्हा भारताशी जोडला जाणारच. हे काही स्वप्नरंजन नाही तर कधीना कधी खरे होणारे वास्तव आहे."

 

या वास्तवापुढची आव्हाने कोणती यावरही मोहन यांनी बराच अभ्यास केलेला. त्या अभ्यासातूनच त्यांनी बहुचर्चित पुस्तक लिहिले- 'आव्हान अखंड भारतनिर्मितीचे.' या पुस्तकाच्या रूपाने मोहन यांनी समाजासमोर देशाच्या अखंडतेला बाधक असलेल्या अनेक घटकांचे विश्लेषण केले. हे सगळे करत असताना मोहन अखंडपणे समाजात फिरत होते. त्यांचा विचारपरिवार वाढत गेला. त्यांची प्रेरणा काय? ते म्हणतात, "रा. स्व. संघ तृतीय वर्ष शिक्षित असलेल्या मोहन यांचा शिवराय तेलंग, दत्ताजी भाले, भास्क र मुंडले, संभाजी भिडे, राजाभाऊ कशाळकर, अनंत देवकुळे, सुधीर फडके, विनय देशपांडे ते भैय्याजी जोशी या सार्‍यांशी संपर्क आला. धुळ्याला एक-दोन तालुक्याचे मोहन प्रचारक असताना भैय्याजी जोशी धुळे जिल्ह्याचे प्रचारक होते. त्यावेळच्या आठवणी सांगताना मोहन सांगतात की, "अत्यंत सहज साध्या पद्धतीने हे सर्व मान्यवर आपले विचार मांडत. त्यांचे वागणेही असे की जणू आपले घरचेच कुणी आपल्याला चार हिताच्या गोष्टी सांगते. पण, ते हित केवळ वैयक्तिक नसे, तर समाज आणि देशाच्या हितासंदर्भातले असते." या सगळ्यांच्या मिळालेल्या सहवासामुळेच मनात देश आणि समाजाबद्दलची तळमळ मोहन यांचा श्वासच बनून गेली. लोक पैसे कमावण्यासाठी जीवाचे रान करतात. मात्र, मोहन यांनी समाजहिताने भारावलेले लोक मिळवण्यासाठी जीवाचे रान केले.
@@AUTHORINFO_V1@@