आजाराचे विश्लेषण भाग-७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |




आजाराच्या लक्षणांचे विश्लेषण व वर्गीकरण करताना डॉ. हॅनेमान व डॉ. केंट यांच्या पद्धतीने ते कसे करतात, हे आपण बघितले. आजच्या भागात आपण डॉ. बोनिंगहुसेन यांची पद्धत पाहणार आहोत. डॉ. बोनिंगहुसेन हे डॉ. हॅनेमान यांच्या अत्यंत जवळचे व अत्यंत हुशार अभ्यासू व संशोधक वृत्तीचे चिकित्सक होते. त्यांनी अनेक रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करून मग एक विशिष्ट अशी विश्लेषण पद्धत शोधून काढली. त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी सात मुद्द्यांवर भर दिला.

 

1) QUIS (क्विस): यामध्ये रुग्णाचे व्यक्तिमत्त्व, त्याचे वय, लिंग यानुसार व्यक्तिमत्त्वात होणारे बदल, शारीरिक व मानसिक ठेवण, स्वभाव विशेष यांचा अंतर्भाव केला गेला आहे. माणूस जेव्हा आजारी पडतो, त्यावेळी आरोग्याकडून अनारोग्याकडे जाताच त्याच्या शरीर, व्यक्तिमत्त्व मन यामध्ये जे बदल होतात, ते बदल हे प्रथम दर्जाची लक्षणे आहेत, असे डॉ. बोनिंगहुसेन यांनी अनुमान काढले.

 

2) QUID (क्विड): या दुसर्‍या मुद्द्यात प्रत्यक्ष आजाराबद्दल माहिती घेऊन त्याच्या लक्षणांचे विश्लेषण केले जाते. आजाराचे गुणधर्म काय आहेत, आजाराची तीव्रता किती आहे व तो जुनाट (Chronic) आहे की नवीन (Acute) आहे, हे पाहिले जाते. त्याचबरोबर आजारांची काही विशिष्ट अशी खास लक्षणे आहेत का, हेदेखील पाहिले जाते.

 

3) UBI (युबी) : या मुद्द्यात प्रत्यक्ष आजारामुळे शरीरातील कुठली संस्था व अवयव हा बाधित झाला आहे, याचा अभ्यास केला जातो. आजाराची मुख्य प्रखरता शरीरातील कोणत्या भागात व शरीरसंस्थेत आहे हे पाहिले जाते. कारण, याचा उपयोग हा औषध निवडीचा वेळेस होत असतो. होमियोपॅथीच्या औषधांच्या खजिन्यातून मग अशीच औषधे निवडली जातात, ज्यांचा प्रभाव हा आजारी अवयवांवर प्रामुख्याने असतो. यामध्ये शरीराच्या पेशी किंवा जर आजार मानसिक असेल, तर कितपत मानसिक हानी झाली आहे, ते पाहिले जाते.
 

4) QUIBIS AUXILUS - (क्युबिस ऑक्सीलस) : मूळ आजाराच्या लक्षणांच्या बरोबरीनेच रुग्ण अजूनही काही लक्षणे सांगत असतो, ज्या लक्षणांचा प्रत्यक्ष संबंध या मूळ लक्षणांशी जुळत असतो. अशा लक्षणांना ‘सहयोगी लक्षणे’ किंवा 'Accociated Symptoms' असे म्हटले जाते. या सहयोगी लक्षणांचा अभ्यासदेखील महत्त्वाचा असतो. म्हणून विश्लेषणात त्यांनाही महत्त्व दिले गेले आहे.

 

5) CUR (क्युर) : याचा अर्थ आजाराचे मूळ किंवा आजाराचे मुख्य कारण (cause of the disease) हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजार होण्यामागचे मुख्य कारण शारीरिक अथवा मानसिक हे शोधून काढले जाते व त्याचे विश्लेषण करण्यात येते.

 

6) QUOMODO (क्युमोड) : या मुद्द्यात आजाराला वाढविणारे किंवा कमी करणारे घटक अभ्यासले जातात, ज्यालाच आपण ‘मोडॅलिटीज्’ असे म्हणते.

 

7) QUANDO (क्वाँडो) : यामध्ये आजाराची लक्षणे बळावण्याची वेळ आजाराला वृद्धिंगत किंवा कमी करणारे घटक आहेत. त्यांच्या लक्षणांची प्रकट होण्याची वेळ व त्याचबरोबर नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो, जे घटक प्रत्यक्ष आजाराशी निगडित आहेत. अशा प्रकारे वर्गीकरण केले असता, रुग्णाकरिता औषध तंतोतंत मिळण्यास मदत होते.

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

9869062276

@@AUTHORINFO_V1@@