'कला पॉवर' स्कूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |



दि. २३ नोव्हेंबरला मला त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून या 'एहसास'च्या उद्घाटनाला बोलावलं होतं म्हणून खजिना, उदयोन्मुख कलाकारांचे पाळण्यातले पाय पाहायला मिळाले.


सध्या शैक्षणिक क्षेत्रात विविध स्पर्धात्मक अभ्यासक्रमांना उत्सवी स्वरूप आलेलं आपण पाहतो. मे-जून महिन्यात शालेय-महाविद्यालयीन वास्तूंना भारताच्या भावी नागरिकांच्या मांदियाळीमुळे ज्ञानजत्रेचं स्वरूप येतं. जागरूक पालकदेखील आपापल्या पाल्यांबरोबर या व अशा ज्ञानजत्रेचा आनंद घेत असतात. या विषयाला चर्चेला घेण्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं वाटतं. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील 'पवार पब्लिक स्कूल' ही प्रशस्त महाविद्यालयीन वास्तू. येथील अध्यापनाचे स्वरूप मला फार अनुकरणीय वाटले. तेच तेच विषय अभ्यासक्रमात असतात. ते टाळताही येत नाहीत आणि नाकारताही येत नाहीत. मग या विषयीच्या अभ्यासातून विरंगुळा कसा शोधायचा, असा प्रश्न महाविद्यालयीन अध्यापक व प्रशासनाला पडला असावा. मग विरंगुळा तर शोधायचा. परंतु, त्यातूनही विद्यार्थ्यांना काही ना काही तरी शिकायला मिळालं पाहिजे. हा व्याप्तीपूर्ण विचार करून त्या महाविद्यालयामार्फत आता दर दोन वर्षांनी कलाजत्रेचे-रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. हे वर्ष त्यांच्या 'पवार पब्लिक स्कूल'चे दहावे वर्ष आहे.

 

इतक्या कमी काळात पालक आणि विद्यार्थ्यांचे इतक्या प्रोत्साहनासह प्रतिसाद मिळविलेले महाविद्यालय क्वचितच पाहायला मिळेल. या विश्वस्तांचे हे महाविद्यालय आणि आणखी सात ठिकाणी शाखांचे जाळे आहे. प्रत्येक ठिकाणी 'इंटेक'नुसार विद्यार्थी आहेतच. परंतु, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी कलेची जोड घेऊन ते शिक्षणकार्य त्यांनी सुरू केले आहे, ते थक्क करणारे आहे. 'एक रंगीन एहसास' हे या कलामेळ्याचे नाव. महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक आणि महाविद्यालयातील कलाध्यापक यांच्या कलाकृती, क्राफ्ट्स, हॅण्डमेड शोभेच्या वस्तू आणि बरंच काही येथे पाहायला ठेवलेलं... 'पवार पब्लिक स्कूल'चं स्वरूप जणू 'कलर पावर स्कूल' झालेलं होतं. असे उपक्रम खरं म्हणजे प्रत्येक मोठ्या हायस्कूलमधून व्हावयासच हवेत, तरच कला महाविद्यालयांना कलाविषय उत्तमोत्तम व्हिज्युअल्स् म्हणजे कलाविद्यार्थी मिळतील, असे खात्रीने सांगता येईल. पालक संघटनेच्या उपाध्यक्षा वर्षा ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांसह सक्रिय सहभाग तर घेतला होताच. परंतु, अभिनंदनीय तसेच अनुकरणीय बाब अशी की, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रमिला कुडवा यांनी कलाकृतीच्या 'ऑक्शन'मध्ये 'बोली' लावून उपस्थितांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. अशा 'ऑक्शन'द्वारे मिळालेला निधी या हायस्कूलमार्फत, अनाथ, कर्करोगग्रस्त वा अन्य सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांना दिली जातो. ही फारच भावनिक आणि अनुकरणीय बाब आहे.

 
 
 

कला विभागाचे प्रमुख प्रा. जिग्नेश क्लेरा आणि त्यांचे सहाध्यायी यांची कलाध्यापन आणि कला प्रोत्साहन विषयीची आत्मीयता इतर समक्षेत्रीय व्यक्तींसाठी अनुकरणीय आहे. हे प्रदर्शन व हा मेळा जरी लाक्षणिक होता, एक दोन दिवसांपुरता होता तरी, या उपक्रमाची नोंद ही सर्वच महाविद्यालयांनी आणि जागरूक पालकांनी घ्यायला हवी, असे वाटते. दि. २३ नोव्हेंबरला मला त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून या 'एहसास'च्या उद्घाटनाला बोलावलं होतं म्हणून खजिना, उदयोन्मुख कलाकारांचे पाळण्यातले पाय पाहायला मिळाले.

 

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@