लग्नपरीक्षा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019   
Total Views |



लग्न हा जोडप्यांना पोरखेळ वाटू नये आणि त्यांनी स्वत:च्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नये, म्हणून इंडोनेशियाच्या मानव विकास आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लग्नापूर्वी जोडप्यांसाठी एक तीन महिन्यांचा कोर्स अनिवार्य केला आहे.


करनी है शादी पर किस्मत नही खुलती

ताजमहल है बनवाना

मुमताज नही मिलती,

खुली किस्मत एक दिन

और हो गयी शादी

अब तो तमन्ना है ताजमहल बनाने की,

हाय रे किस्मत, अब मुमताज नही मरती

 

विवाहितांना (खासकरून पतीदेवांना) या शायरीतील खट्याळ तिरकसपणा समजला असेलच. कारण, लग्न म्हणजे नुसता गोड गोंडस बाहुलाबाहुलीचा भातुकलीतला संसार आणि 'मज्जानी लाईफ' निश्चितच नाही. लग्न ही खरंतर दोन भिन्न स्वभावधर्माच्या व्यक्तींनी प्रेमापोटी आयुष्यभरासाठी केलेली एक तडजोडच. याच प्रेमाखातर मग कधी एक पाऊल मागे टाकत नमते घ्यावे लागते, तर संसारगाडा हाकण्यासाठी प्रसंगी आव्हानांना सामोरे जात उंबरठाही ओलांडावा लागतो. व्यक्ती, प्रसंग, कुटुंब आणि इतरही स्थिती-परिस्थितीनुसार प्रत्येकाचे लग्न, नातेसंबंध भिन्न ठरतात. परंतु, लग्नानंतरच्या पतीपत्नीच्या बऱ्याच समस्या 'सर्वसाधारण', अगदी 'वैश्विक'ही म्हणता येतील. 'सगळं काही आलबेल' अशी जोडपी मुळात शोधूनही सापडणे कठीणच! त्यामुळे गैरसमज, वादविवाद, भांडणतंटे, रुसवेफुगवे हे लग्नाबरोबर आपसूकच खात्यात जमा होणारे 'पार्ट अ‍ॅण्ड पार्सल.' म्हणूनच नाही का विवाहाला 'बंधनात अडकणे' म्हणतात. परंतु, मतभेद, मनभेदाच्या या कुरबुरी बरेचदा मर्यादा ओलांडतात. या पवित्र नात्यावर न्यायालयाची मोहोर उमटवून लगेच विभक्ती आणि मुक्तीचा मार्ग स्वीकारलो जातो. विवाहाची नाजूक 'काडी' सहजासहजी 'मोड'ते. 'मी, माझे आयुष्य' सर्वोपरी मानून हल्ली अगदी सहज 'मूव्ह ऑन' केले जाते. भारतापेक्षाही पाश्चिमात्त्य देशांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण आजही जास्त आहेच. त्या अनुषंगाने इंडोनेशिया सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.

 

लग्न हा जोडप्यांना पोरखेळ वाटू नये आणि त्यांनी स्वत:च्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नये, म्हणून इंडोनेशियाच्या मानव विकास आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लग्नापूर्वी जोडप्यांसाठी एक तीन महिन्यांचा कोर्स अनिवार्य केला आहे. विशेष म्हणजे, जर जोडपी हा कोर्स उत्तीर्ण करू शकली नाहीत, तर त्यांना लग्नाची गाठ बांधता येणार नाही. आता इंडोनेशिया सरकारचा हा निर्णय निश्चितच नागरिकांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप वगैरे वाटू शकतोच. त्यात दुमतही नाही. कारण, एखादे एकमेकांवर अतोनात प्रेम असणारे जोडपे या कोर्समध्ये अनुत्तीर्ण झाले तर...? मग पुढे काय? त्यांना पुन्हा संधी मिळणार का? असे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. पण, यामागील इंडोनेशिया सरकारचा उद्देश हा राष्ट्रहितैशी आणि कुटुंब कल्याणाचाच म्हणावा लागेल. हा कोर्स म्हणजे नुसते विवाहपूर्व समुपदेशन नाही. या कोर्समध्ये आरोग्य, रोगराई, बालसंगोपन यांसारख्या लग्नानंतरच्या विविध महत्त्वाच्या पैलूंवर जोडप्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. विशेष म्हणजे, या कोर्ससाठी एक दमडीही सरकारतर्फे आकारली जाणार नाही. जोडप्यांनी शारीरिक तसेच भावनिकदृष्ट्या सक्षम व्हावे, लग्नापूर्वी त्यांना त्यांच्या सर्व जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यावी, हा यामागील सरकारचा निखळ हेतू. यामुळे जोडपी नातेसंबंधांना अधिक गांभीर्याने घेतील आणि घटस्फोटांचे प्रमाण कमी होईल, अशी सरकारची आशा. हा प्रयोग पुढील वर्षीपासून इंडोनेशियामध्ये देशपातळीवर राबविल्यानंतर त्याचे परिणाम पाहणे निश्चितच उत्कंठावर्धक ठरेल.

 

त्यातही हा कोर्स उत्तीर्ण झालेल्यांचा भविष्यात कधीही घटस्फोट होणार नाही, याचीही शाश्वती कोणीही देऊ शकत नाहीच. पण, किमान एकमेकांना प्रत्यक्षात समजून घेण्याची, पारखण्याची संधी इंडोनेशियाच्या युवक-युवतींना या कोर्सच्या निमित्ताने मिळेल, हे मात्र नक्की. इंडोनेशियाने हे पाऊल उचलले, म्हणून लगेच भारतातही असेच काही व्हावे, अशी कदापि अपेक्षा अथवा दोन्ही देशांची तुलना अजिबात करण्याचे कारण नाही. तसे करणेच मुळात अव्यवहार्य ठरेल. पण, भारतीय तरुण-तरुणींनी, त्यांच्या पालकांनी किमान विवाहापूर्वी प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबीची अगदी खोलवर चर्चा करून, विचारांमध्ये, संवादात अगदी स्पष्टपणा ठेवून भावनाविवश न होता मुलामुलींच्या विवाहाचा अंतिम निर्णय घ्यावा, अथवा लग्न खरंच आयुष्यभर अशा जोडप्यांना एक दैनंदिन 'परीक्षा' वाटली तर आश्चर्य नको!

@@AUTHORINFO_V1@@