शुभेच्छांची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |


 


उद्धव ठाकरेंना शुभेच्छांची गरज आहेच, कारण महायुतीत असताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासमोर जे मांडले गेले, ते वास्तव हेच होते की, ही लढाई आपण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढवित आहोत. पण, तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. कौतुकास्पद म्हणजे त्यांनी ती खरीही करून दाखविली. मात्र, ज्या प्रकारे ती खरी केली गेली तो मार्ग मात्र शिवसेनेसाठी घातक ठरू शकतो.


शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यानंतर ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या त्या सर्वश्रुत आहेत. त्याचेच फलित म्हणून ही 'तिघाडी' आकाराला आली. आता यात अनेक लहानसहान पक्ष आणि अपक्ष सामील होतीलच. सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना मन:पूर्वक शुभेच्छा! सध्या जे काही घडते आहे, ते पाहिल्यानंतर आपल्या या कधीकाळी हिंदुत्ववादी असलेल्या मित्राला शुभेच्छांची गरज आहेच, हे ध्यानात येईल. गेल्या महिन्याभरापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला सर्वात जवळचा पक्ष म्हणजे शिवसेनाच. राजकीय पक्षांमध्ये असलेली साटीलोटी जगजाहीर असतात. लोकांनी दिलेला जनादेश शुद्ध स्वरूपाचा नसला की, राजकीय पक्षांना स्वत:च्या अस्तित्वासाठी राजकारणापलीकडची मैत्री शोधत बाहेर पडावेच लागते. भारतीय जनता पक्षानेही ते केले आहे. त्यामुळे आपला तो चांगलाच आणि इतरांचा तो वाईट असे मानण्याचे कारण नाही. मात्र, आपला तो आपला का? याचे उत्तर भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्यांना चांगले ठाऊक आहे. आपल्याला दोन वेळचे फुकट जेवण, मोफत घरे, मोफत वीज अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडून भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हा वर्ग नाही. राष्ट्रवादाचे व हिंदुत्वाचे काही समान मुद्दे आहेत ते भाजपने सोडवावे, अशी त्यांची अपेक्षा असते. थोडेफार विलंबाने का होईना, ते सोडवताना भारतीय जनता पक्ष आजही दिसतो. लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाचे निकष पूर्ण करणारा कुठलाही पक्ष हा अन्य कुठल्याही पक्षापेक्षा वेगळा नाही. महाराष्ट्रातले सध्या चार प्रमुख पक्षही त्याचप्रमाणे आहेत. मात्र, या पक्षांच्या पाठीमागे जे लोक उभे राहतात, ते ज्या कारणांमुळे उभे राहतात, तोच खरा या पक्षांचा आत्मा असतो. आज भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी जे लोक एकत्र आले आहेत, त्यांची स्थिती मोठी मजेशीर आहे. कुठलाही एक उदात्त हेतू समोर ठेवण्यापेक्षा फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देणे, हाच या सगळ्यांचा हेतू! त्यासाठी काय वाट्टेल ते करायला ही मंडळी तयार आहेत.

 

ज्या शेतकऱ्यांचा कैवार घेत या मंडळींनी हा सारा खेळ चालविला आहे, त्यांच्याशी यांचे काही देणेघेणेच नाही. फडणवीस जे दोन-तीन दिवस मुख्यमंत्री होते, त्या काळात त्यांनी पाच हजार कोटींहून अधिकचा मदतनिधी जाहीर केला. आता सत्ता ताब्यात घेण्याआधीच यांची रडारड सुरू झाली आहे. शरद पवारांनी तर सरळ, 'आधी पाहू कोणाचे किती काय द्यायचे?' असा पवित्रा घेतला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने तर असा काही शब्दच दिलेला नव्हता. त्यामुळे आता त्यांनी तो पाळण्याचा प्रश्नच नाही. उद्धव ठाकरेंचे 'निकटवर्तीय' म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर यांनी तर त्याहून अधिक मजेशीर भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला केंद्र सरकारची मदत लागणार आहे." याचा सरळ अर्थ यातून जो काही लावयाचा, तो लावला पाहिजे. कर्जमाफीचे एक मॉडेल यापूर्वी राज्यात राबविले गेले होते. सरसकट माफी ही भ्रष्टाचाराची मोठी संधी होती. उत्पन्नांचे नवे ठोस मार्ग नसलेल्या कुठल्याही सरकारला याच मार्गाने जावे लागेल. मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी जे जमेल ते केले. परंतु, महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच इतक्या भीषण होत्या की, आजची संकटे निर्माण झाली आहेत. शेतकऱ्यांना आशेला लावून राजकारण करण्याची एकही संधी या मंडळींनी सोडलेली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारण तापविण्याचाच अधिक होता. उद्धव ठाकरेंना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राजकीय संकटे किती असतील, हा मोठा प्रश्नच आहे आणि तो किती गंभीर आहे याची चुणूक अजितदादांनी शपथविधीच्या सकाळीच दिली होती. भाजप आपल्याला चांगले वागवित नाही, याचा संदेश शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या शिताफीने पसरविला होता. भाबडे शिवसैनिक याला बळीही पडले होते. मात्र, त्याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर पाट लावणे त्यांना पचले आहे, असे मुळीच नाही. एका निष्ठावान शिवसैनिकाने दिलेला शिवसेनेचा राजीनामा हे त्याचे प्रतीक आहे. इतकी वर्षे शिवसेनेने जे राजकारण केले, ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधातच होते.

 

ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचे शर्थीचे प्रयत्न केले, त्या भुजबळांबरोबरच आज उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. सत्तेसाठी निवडणुका लढविणाऱ्या पक्षाच्या पलीकडे शिवसेना एका भावनेवर चालत आली व फोफावली आहे. सत्तेच्या समीकरणात हा सगळा शिवसेनाप्रेमी सहानुभूतदार कसा विचार करेल, याचे उत्तर आता थेट दोन वर्षांनी मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यासाठी मोठा निकष ठरेल. शिवसेनेच्या सत्तेच्या हव्यासापायी काँग्रेससारखा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आज सत्तेत येऊन बसला आहे. मुंबईकरांनी तर काँग्रेसला 'पक्ष' म्हणून केव्हाच नाकारले आहे. महापालिकेत आज जे काही काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहेत, ते त्यांच्या वैयक्तिक बळावर आहेत. ज्या प्रकारे लोकांनी काँग्रेसला नाकारले, तसेच शिवसेनेला नाकारण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेत शिवसेना मोदींच्या नावावर निवडून आली होती. आज सत्ता सोनिया व पवारांच्या नावे मिळाली आहे. ही 'तिघाडी' जनता कशी स्वीकारेल, हाच येणाऱ्या काळातला प्रश्न असेल. महायुतीत असताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासमोर जे मांडले गेले, ते वास्तव हेच होते की, ही लढाई आपण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढवित आहोत. पण, तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. कौतुकास्पद म्हणजे त्यांनी ती खरीही करून दाखविली. मात्र, ज्या प्रकारे ती खरी केली गेली, तो मार्ग मात्र शिवसेनेसाठी घातक ठरू शकतो.

@@AUTHORINFO_V1@@