मूलभूत सुविधा पुरविण्यावर प्रथम लक्ष केंद्रित करावे : महापौर सतीश कुलकर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |



नाशिक : "नाशिक शहरातील रहिवाशांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूलभूत सुविधा पुरविण्यावर प्रथम लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने कामकाज करावे," असे निर्देश नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले. शहरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांचे शासकीय निवासस्थान 'रामायण' येथे विद्युत, भुयारी गटार व मलेरिया विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या बैठका महापौरांनी घेतल्या. या बैठकीस उपमहापौर भिकूबाई बागूल, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेविका स्वाती भामरे, नगरसेवक शाम बडोले, संजय बागूल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

विद्युत विभागाच्या झालेल्या बैठकीस अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी उपस्थित होते. या बैठकीत प्रथम अधिकाऱ्यांना असणाऱ्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. त्यानंतर विद्युत विभागाला खालील मुद्द्यानुसार काम करण्याचे निर्देश यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले. त्यात शहरातील सर्व नादुरुस्त पथदीप त्वरित सुरू करावेत, सगळ्या पथदीपावर एलईडी लाईट लावण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, विद्युत विभागाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रभागनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप करून त्यामध्ये नगरसेवकांचा समावेश करावा, जेणेकरून प्राप्त झालेली तक्रार सोडविण्यास मदत होईल.

 

भुयारी गटार योजना विभागाच्या बैठकीस पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी उपस्थित होते. विभागाला खालील मुद्द्यानुसार काम करण्याचे निर्देश यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले. त्यात नाले व उपनद्या स्वच्छतेसाठी दोन रोबोट मशीन घेणे, भूमिगत गटारे स्वच्छता करताना गाळ काढण्याच्या दृष्टीने व साठलेले पाणी निचरा होण्यासाठी प्रत्येक विभागात नवीन चार रिसायकलिंग मशीन खरेदी करणे, अशी विविध प्रकारची कामे करण्याचे निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले. मलेरिया विभागाच्या झालेल्या बैठकीस वैद्यकीय अधिकारी नितीन रावते, डॉ. अर्चिता साळुंखे उपस्थित होते. नाशिक शहर व परिसरात डेंग्यू -मलेरिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टीने सर्वांनी काम करावे, औषधांची फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यासाठी मोहीम राबवावी, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये डेंग्यू व तत्सम आजारांबाबत जनजागृती करणे या विविध मुद्द्यांवर काम करण्याचे निर्देश या बैठकीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले.

@@AUTHORINFO_V1@@