संघर्षनायिका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019   
Total Views |



कोणालाही शिशुवर्ग वा डे-केअर सुरू करायचे असल्यास त्यास पूर्ण मार्गदर्शन करण्याची तृप्ती प्रधान-दिघे यांची तयारी आहे. किंबहुना, महिला सक्षमीकरणासाठी 'अच्छे बच्चे प्ले ग्रुप-नर्सरी-डे केअर'च्या शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.


सहा वर्षांची असताना तिचे आई-बाबा अपघातात गेले. या जगाची पुरेशी ओळख होण्याअगोदरच डोक्यावरचं छप्पर अन् पायाखालची जमीन नियतीने हिसकावून नेली होती. आता या पोरक्या झालेल्या मुलांचं पालन-पोषण कोणी करायचं यासाठी नातेवाईकांनी बैठक घेतली. भावाची जबाबदारी आत्याने तर तिची जबाबदारी काका-काकूने घेतली. पुढची सगळी वाट निव्वळ खाचखळग्यांचीच होती. मात्र, तिने यावर मात केली. लहानपणीच मातृत्व हरपलेल्या तिला व्यवसाय गवसला तो मात्र मातृत्वाने काळजी घेणाऱ्या क्षेत्राचा. शिशुवर्ग आणि लहान बाळांचं संगोपन करणाऱ्या 'अच्छे बच्चे प्ले ग्रुप-नर्सरी-डे केअर' या केंद्राची ती आज संचालिका आहे. ही संघर्षमय गोष्ट आहे तृप्ती प्रधान-दिघे यांची.

 

भास्कर प्रधान हे तृप्तीचे वडील आणि मीना प्रधान या तृप्तीच्या आई. एका घरगुती सिलिंडरच्या स्फोटात तृप्तीचे आई-बाबा गेले. तृप्ती अवघी सहा वर्षांची होती. दुसऱ्या वर्गात शिकत होती ती. आता कुठे आई-बाबांचं प्रेम तिला मिळणार, त्या अगोदरच काळाने आपला डाव साधला होता. तृप्ती, तिचा भाऊ या दोघांना नियतीने पोरकं केलं होतं. अंत्यसंस्काराचे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर तृप्तीच्या नातेवाईकांची गोलमेज परिषदेसारखी एक बैठक झाली. त्यामध्ये तृप्तीचा सांभाळ काका-काकू करेल अन् भावाचा सांभाळ आत्या करेल, असे ठरले. तृप्ती काकाकडे कोलाड या शहरात आली. दुसरी ते पाचवी तिथेच तिचं शिक्षण झालं. अडीच वर्षे ती तिथे राहत होती. मात्र, काका-काकूंच्या सापत्न वागणुकीला ती कंटाळली होती. जेव्हा तिच्या आत्याला हे कळले तेव्हा आत्याने तिला आपल्यासोबत नेले. नुकतेच मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेले आत्याचे पती अलिबागजवळच्या नांदगाव येथे निवृत्तीचं जीवन जगत होते. नांदगावला नववीपर्यंत शिक्षण झाल्यावर आत्या गोरेगावला राहण्यास आली. सोबत तृप्ती होतीच. दहावीनंतर बारावीपर्यंतचं तिचं शिक्षण पाटकर महाविद्यालयातून झालं. बारावीनंतर मात्र तिने पदवीपर्यंतचं शिक्षण दूरस्थ शिक्षण पद्धतीने मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं. बीएची पदवी तिने प्राप्त केली. दरम्यान, टीचर्स ट्रेनिंग कोर्स तिने पूर्ण केला. त्या अभ्यासक्रमाच्या जोरावर तिला शहापूर येथे शिशुवर्ग शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. लहान मुलांसोबत रमण्याचा तिचा स्वभाव तिचं बलस्थान होता. यानंतर कल्याण-डोंबिवली मनपा येथे सुरू झालेल्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेच्या शिशुवर्गाची ती पहिली शिक्षिका. आयएएस होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. तिचा अभ्यास पण सुरू होता. मात्र, आयुष्याचीच एवढी मोठी परीक्षा सुरू होती की, बाकी सगळ्या परीक्षा त्यापुढे फिक्या होत्या.

 

याचदरम्यान डोंबिवलीमध्ये एक प्ले-ग्रुप सुरू करण्याचा प्रस्ताव तिच्याकडे आला. २५०० चौरस फूट जागेत हा प्ले-ग्रुप उभा राहिलेला. त्याच्या पूर्ण उभारणीत तृप्ती प्रधानांचा मोलाचा वाटा होता. हा प्ले-ग्रुप उभारल्यानंतर तृप्तीमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जर इतर कोणासाठी प्ले-ग्रुप तयार करू शकतो तर ते आपण आपल्यासाठीसुद्धा करू शकतो. एव्हाना इतक्या खडतर आयुष्यात बचतीचं महत्त्व तिला पटलेलं होतं. या बचतीमधून तिने डोंबिवलीमध्येच एक जागा भाड्याने घेतली. अगदी स्वयंपाक खोलीसह संपूर्ण जागेचं तिने अशाप्रकारे इंटिरियर केलं की कोणतंही मूल त्या जागेच्या प्रेमात पडेल. 'चाईल्ड केअर' या नावाने प्ले-ग्रुप आणि डे-केअर सेंटर सुरू झालं. मायेच्या ममतेने सांभाळ करणाऱ्या पाच महिला कर्मचाऱ्यांनिशी हे शिशु केंद्र सुरू झालं. अगदी तीन महिन्यांच्या तान्ह्या बाळापासून इथे मुलं यायला लागली. काहीच दिवसांत लहान मुलांसाठी हे दुसरं घरच बनलं. काही वर्षांनी 'अच्छे बच्चे प्ले ग्रुप-नर्सरी-डे केअर' असं त्याचं सुंदर नामकरण झालं. दरम्यान, तृप्ती प्रधानांचा आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रद्युम्न दिघे यांच्यासोबत विवाह झाला. अपूर्व, आदिती आणि अस्मी अशी तीन गोंडस मुलांच्या त्या माता आहेत.

 

'अच्छे बच्चे प्ले ग्रुप-नर्सरी-डे केअर'चा विस्तार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. निव्वळ शिशुवर्ग चालविणे आणि लहान मुलांचा सांभाळ करणे एवढंच त्यांचं लक्ष्य नाही, तर खऱ्या अर्थाने मुलांचे आई-बाबा आणि मुलं यांच्यामध्ये मायेचा दुवा साधणे, त्यांच्यातील हा मायेचा ओलावा दृढ करून देशाची सकस अशी भावी पिढी तयार करणे, हा 'अच्छे बच्चे'चा मुख्य उद्देश आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, या संस्थेने अत्यंत अनोख्या पद्धतीने व्हॅलेन्टाईन डे साजरा केला होता. पालकांना सांगितले की, त्यांना 'सरप्राईज गिफ्ट' आहे. पालक आल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना औक्षण केले. स्वत:च्या चिमुकल्या हातांनी तयार केलेली शुभेच्छापत्रे आपल्या आई-बाबांना दिली. या सगळ्या पालकांसाठी हा एक भावूक क्षण होता. मुलं सुदृढ व्हावीत यासाठी ही संस्था पोषक आहारसुद्धा मुलांना पुरविते. या सर्व सुविधांमुळे 'अच्छे-बच्चे' हे डोंबिवलीतल्या या मुलांसाठी दुसरं घर झालं आहे. कोणालाही शिशुवर्ग वा डे-केअर सुरू करायचे असल्यास त्यास पूर्ण मार्गदर्शन करण्याची तृप्ती प्रधान-दिघे यांची तयारी आहे. किंबहुना, महिला सक्षमीकरणासाठी 'अच्छे बच्चे प्ले ग्रुप-नर्सरी-डे केअर'च्या शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. 'खडतर' हा शब्ददेखील सौम्य वाटावा, असं आयुष्य अनुभवलेल्या तृप्ती प्रधान-दिघेंची ही जीवनकथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. खऱ्या अर्थाने त्या प्रेरक आहेत.

@@AUTHORINFO_V1@@